मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना!

By यदू जोशी | Published: July 12, 2018 05:58 AM2018-07-12T05:58:14+5:302018-07-12T06:06:07+5:30

मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे.

Mantralaya Rampant Case: Even after finding the report, finding the mouse! | मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना!

मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना!

Next

 मुंबई : मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. हे कंत्राट दोन वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष झाले होते की नाही, हे आज तपासणे शक्य नाही. मात्र, विभागाने उपलब्ध करून दिलेल्या फोटोंवरून अशा गोळ्या टाकल्या असल्याचे दिसते असा अफलातून निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या विषारी गोळ्या सहा महिन्यांत टाकायच्या असे निविदेत नमूद होते. मात्र हे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यास कंत्राटदारास सांगण्यात आले आणि कंत्राटदार विनायक मजूर सहकारी संस्थेने हे काम सात दिवसांतच केले, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. हे सात दिवस नेमके कोणते होते याबाबत विसंगती आढळून येते, असेही दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या (नवी मुंबई) अधीक्षक अभियंत्यांच्या चौकशी अहवालात नमूद केले आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रालयातील उंदीरमार प्रकरण गाजले होते. त्याच्या चौकशीच्या अहवालाची प्रतच ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी टाकण्यात आल्या होत्या, पण किती उंदीर मेले याची माहिती अहवालात देण्यात आलेली नाही.
मंंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. ही बाब दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे मंत्रालयात खरेच ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या टाकल्या होत्या की नाही हे पाहणे आता शक्य नाही. मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फोटोंवरून काम झाल्याचे दिसून येते, असा तर्क देत चौकशी अहवालात अधिकारी व कंत्राटदारांचा बचाव केल्याचे दिसून येते.
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर हे विषारी गोळ्या टाकून मारल्याचे सांगत इतके उंदीर मेलेले कुणी पाहिले, एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी गोळ्या मंत्रालयात आणताना गृह व सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेतली होती का, असे सवाल केले होते़ लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. भाजपा आमदार चरणदास वाघमारे यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीचा आधार खडसे यांनी घेतला होता.

विषारी गोळ्या टाकल्या तरी कधी?

चौकशी अहवालात असे म्हटले आहे की, मोजमाप पुस्तक बघितले तर विषारी गोळ्या टाकल्याचे काम १३ मे २०१६ रोजी संपले असे नमूद आहे. मात्र दुसºया ठिकाणी हे काम
४ आॅक्टोबर २०१६ रोजी संपल्याचे म्हटले आहे. दुसºया व अंतिम देयकावर काम पूर्ण केल्याची तारीख २४ मार्च २०१७ ही आहे.

फोटोवरून काढला अजब निष्कर्ष

उंदीर मारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करून दिलेली रक्कम आणि मंत्रालयात गोळ्या ठेवतानाचे चौकशी यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आलेले फोटो यावरून ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे दिसून येते असा अजब निष्कर्ष अधीक्षक अभियंत्यांनी काढला आहे. गोळ्या टाकतानाचे फोटो अहवालात जोडले आहेत पण त्यावरून ३ लाख १९ हजार ४०० इतक्याच गोळ्या टाकल्याचे कसे सिद्ध होते, असा प्रश्न उपस्थित होतो.

Web Title: Mantralaya Rampant Case: Even after finding the report, finding the mouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.