मनीष जैन यांना महावीर युवा गौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:01 PM2018-09-24T22:01:55+5:302018-09-24T22:04:24+5:30

महावीर युथ क्लब आणि महावीर वूमन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा २०१८ चा महावीर युवा गौरव पुरस्कार मनीष देवेंद्रकुमार जैन यांना प्रदान करण्यात आला. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित क्षमावाणी समारोहात संतांच्या सान्निध्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी क्लबतर्फे राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार चंदूपरचे डॉ. महावीर सोईतकर यांना तर जिल्हास्तरीय विशेष सन्मान पुरस्कार ८० वर्षीय कनकराय ऊर्फ कन्नुभाई सावडिया आणि आनंदराव सवाने यांना प्रदान करण्यात आले.

Manish Jain awarded Mahavir Yuva Gaurav Award | मनीष जैन यांना महावीर युवा गौरव पुरस्कार प्रदान

मनीष जैन यांना महावीर युवा गौरव पुरस्कार प्रदान

googlenewsNext
ठळक मुद्देसोईतकर, सावडिया, सवाने हेही सन्मानित : संतांच्या सान्निध्यात क्षमावाणी समारोह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावीर युथ क्लब आणि महावीर वूमन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा २०१८ चा महावीर युवा गौरव पुरस्कार मनीष देवेंद्रकुमार जैन यांना प्रदान करण्यात आला. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित क्षमावाणी समारोहात संतांच्या सान्निध्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी क्लबतर्फे राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार चंदूपरचे डॉ. महावीर सोईतकर यांना तर जिल्हास्तरीय विशेष सन्मान पुरस्कार ८० वर्षीय कनकराय ऊर्फ कन्नुभाई सावडिया आणि आनंदराव सवाने यांना प्रदान करण्यात आले.
क्लबतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्युषण पर्व समारोप आणि क्षमावाणी समारोह आयोजित करण्यात आला. मात्र यावर्षी समारोहाचे स्वरूप वेगळे होते. क्लबतर्फे यावेळी संतांच्या सान्निध्यात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून प्रोत्साहन देत सकल जैन सामूहिक क्षमावाणी पर्व आयोजित करण्यात आला. यानिमित्त प्रज्ञायोगी आचार्यश्री गुप्तीनंदीजी महाराज, आचार्यश्री देवेंद्रसागरसुरीश्वरजी महाराज आणि आर्यिकाश्री दृढमती माताजी हे ससंघ या समारोहात उपस्थित होते. यावेळी आचार्यश्री देवेंद्रसागरसुरीश्वरजी महाराज यांनी मार्गदर्शन करीत सर्वांना क्षमादानाची कामना केली. याप्रसंगी अखिल दिगंबर जैन सैतवाळ महासंघाचे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष सुरेश कहाते, जैन सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष मनीष मेहता, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सिस्टर एरमा, राजेंद्रकुमार जैन, संयम स्वर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल जैन, बचपन एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका शालू अवकाश जैन, जितेंद्र तोरावत, महिपाल सेठी, धनराज गडेकर, दिलीप जैन, दिलीप शिवणकर, आचार्यश्री गुप्तीनंदीजी गुरुदेव चातुर्मास समितीचे संयोजक नितीन नखाते, परवार मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जिनेंद्रकुमार जैन, विजयकुमार, महावीर युथ क्लबचे सचिव प्रशांत मानेकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष दिनेश सावळकर यांनी केले. यावेळी मनीष मेहता व नितीन नखाते यांनी मनोगत व्यक्त केले.
पुरस्कार वितरणापूर्वी सुनील आगरकर व वृषभ आगरकर यांच्या चमूने भक्तिधारा हा श्री रत्नत्रय भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. महावीर वूमन्स क्लबच्या अध्यक्षा वैशाली नखाते, सचिव सरिता सावळकर, उपाध्यक्षा दीपाली भुसारी व जयश्री भुसारी व सर्व सदस्यांनी मंगलाचरण केले. सामाजिक कार्यात सहभागी संतोष पेंढारी, संजय केलावत, विलास लारोकर, सौरभ कुहिटे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आदेश परिहार व मनोज बंड यांनी केले.

क्षमावाणीने मनुष्य देवत्व प्राप्त करतो
यावेळी आचार्यश्री गुप्तीनंदीजी महाराज यांनी उपस्थितांना क्षमावाणीवर मार्गदर्शन केले. क्रोध, मान, माया व लोभाचे ओझे मनावर असेल तर ईश्वराचा साक्षात्कार होणे शक्य नाही. ईश्वराच्या भेटीसाठी या चारही गोष्टींचा त्याग करावा लागेल. क्षमादान ही भारताची संस्कृती आहे, म्हणूनच क्षमावाणी पर्वाला विश्व मैत्री दिवस म्हणूनही साजरे केले जाते. आपण क्षमाधर्मावर विश्वास ठेवणारे आहोत. प्रत्येक प्राण्याप्रति क्षमा बाळगल्यास आत्मिक समाधान व सुख प्राप्त होते. आचार्यश्री यांनी ‘धरती से बडी होती है क्षमावाणी...’ ही स्वरचित कविता सादर करून महामानव पार्श्वनाथ यांनी क्षमावाणीमुळे तीर्थंकर रूप प्राप्त केल्याचे सांगत कोणताही मनुष्य देवत्व प्राप्त करू शकतो, असा संदेश दिला. आपणही कधी चुका करू शकतो, हे लक्षात घ्या. दुसºयाने मागण्याअगोदर क्षमा द्या व इतरांना क्रोध येण्यापूर्वी क्षमा मागा. संतांजवळ असलेल्या क्षमावाणीचा स्वीकार करा, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक कार्यात प्रोत्साहन देणाऱ्यांचा सन्मान के ल्याने त्यांनी क्षमावाणी समारोहाची प्रशंसा केली.

पर्युषण पर्व आत्मचेतना जागृत करणारा
तत्पूर्वी आर्यिकाश्री दृढमती माताजी यांनी पर्युषण पर्वाचे महात्म्य वर्णन केले. पर्युषण पर्व म्हणजे आपल्या आत्मचेतना जागृत करणारा, अध्यात्माचा संदेश देणारा पर्व आहे. अनैतिकतेतून परावृत्त करून नैतिकतेची शिकवण देणारा हा पर्व आहे. संतांच्या सान्निध्यात सामाजिक सेवकांचा सन्मान करून क्षमावाणी पर्व साजरा करणे ही अतिशय महत्त्वाची कल्पना आहे. गुरू आणि शिष्यांचे नाते अलौकिक असे आहे. आपण केवळ चालत असतो, मार्ग आणि आधार गुरूचा असतो. आपण जळत असतो, दिवा आणि प्रकाश गुरूचाच असतो. निर्मळ मनातून क्षमावाणी पर्व साजरा केला पाहिजे. क्षमावाणी पर्व अंत:करणातील द्वार उघडणारा असतो, त्यामुळे क्षमा धर्माचे व पर्युषण पर्वाचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. 

 

Web Title: Manish Jain awarded Mahavir Yuva Gaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.