केंद्राच्या कामांचे सामाजिक-आर्थिक ‘ऑडिट’ करा : नितीन गडकरींचे विरोधकांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 09:03 PM2019-01-19T21:03:36+5:302019-01-19T21:06:34+5:30

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी महाआघाडी तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कार्यांचे सामाजिक व आर्थिक ‘ऑडिट’ करावे, असे थेट आव्हानच दिले आहे. भाजपाला देशभक्तांची टोळी संबोधत त्यांनी कॉंग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळापेक्षा या सरकारने जास्त काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन केले. सोबतच नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहनदेखील केले. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

Make 'socio-economic' audit 'of central work: Nitin Gadkari challenges oppositions | केंद्राच्या कामांचे सामाजिक-आर्थिक ‘ऑडिट’ करा : नितीन गडकरींचे विरोधकांना आव्हान

केंद्राच्या कामांचे सामाजिक-आर्थिक ‘ऑडिट’ करा : नितीन गडकरींचे विरोधकांना आव्हान

Next
ठळक मुद्देभाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी महाआघाडी तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कार्यांचे सामाजिक व आर्थिक ‘ऑडिट’ करावे, असे थेट आव्हानच दिले आहे. भाजपाला देशभक्तांची टोळी संबोधत त्यांनी कॉंग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळापेक्षा या सरकारने जास्त काम करून दाखविले आहे, असे प्रतिपादन केले. सोबतच नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहनदेखील केले. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, खा.भूपेंद्र यादव, व्ही.सतीश, माजी मंत्री सत्यनारायण जटिया, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, दुष्यंत गौतम, नारायण केसरी, संजय पासराव प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपच्या सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पाच जागांना पंचतीर्थ म्हणून विकसित केले आहे. काँग्रेसने यासाठी काहीच केले नव्हते. नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी भाजपा शासनाने निधी दिला. लंडनमध्ये बाबासाहेबांचे घर विकत घेऊन त्याला राष्ट्रीय स्मारक बनविले. त्यांच्या जन्मस्थळाला आंबेडकरनगर असे नाव दिले. इंदू मिल येथे स्मारक बनविले जात आहे. दिल्लीत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र बनविण्यात आले. यशवंत स्टेडियमच्या जागेवरदेखील स्मारक तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. दुसरीकडे काँग्रेसने भंडाऱ्यात बाबासाहेबांना पराभूत करून लोकसभेत पोहोचू दिले नव्हते. भाजपा दलितविरोधी व उच्चवर्णीय पक्ष आहे, असा कॉंग्रेसकडून दुष्प्रचार होतो. मात्र प्रत्यक्षात भाजपा समता व समरसतेच्या मार्गावर चालत आहे, असे गडकरी म्हणाले.
गडकरींनी जातीबंधन तोडण्याचे आवाहन केले. भाजपा कुठलीही व्यक्ती नव्हे तर विचारधारेसाठी काम करणारा पक्ष आहे. भाजपा सत्तेत असेल तरी ‘डीएनए’ हा विरोधकांचा आहे. पक्ष विकासाला प्राथमिकता देत आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी दहशतवादाशी लढताना मोठे बलिदान केले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अनुसूचित जातींसाठी केलेले कार्य मांडले
यावेळी थावरचंद गहलोत व विनोद सोनकर यांनी केंद्र सरकारकडून अनुसूचित जातींच्या हितासाठी केलेल्या कार्यांचा आलेखच मांडला. केंद्राने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याला मजबुती प्रदान करण्यासाठी संविधान संशोधन केले. दुसरीकडे काँग्रेसने दलितांसाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी लावला. सुभाष पारधी यांनी स्वागतपर भाषण केले.
केंद्राच्या कार्यामुळे धसका घेतल्याने महाआघाडी
यावेळी गडकरी यांनी महाआघाडीवरदेखील प्रहार केला. केंद्राच्या कार्यांमुळे विविध विरोधी पक्ष एकत्रित आले. मात्र आम्ही ‘मर्द’ आहोत, सर्व एकत्र झाले तरी आम्ही त्यांना धूळ चारू व नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान करू, असे गडकरी म्हणाले. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पाच हजार कोटींची योजना आली होती. आम्ही निधी कुठे गेला, ते विचारत नाही, मात्र काम झाले नाही, हे वास्तव आहे. मोदी सरकारने हे काम हाती घेतले असून, मार्चपर्यंत ३० टक्के गंगा स्वच्छ होईल तर पुढील वर्षी १०० टक्के स्वच्छता येईल, असा दावा गडकरी यांनी केला.

 

Web Title: Make 'socio-economic' audit 'of central work: Nitin Gadkari challenges oppositions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.