लोकमत व्यासपीठ : प्रत्येक नागरिकाने पशु-पक्ष्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:56 PM2019-04-15T23:56:36+5:302019-04-16T00:01:02+5:30

उन्हाळ्यात जीवाची लाहीलाही होते. नागपूरचे तापमान ४४ अंशावर गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसोबत मुक्या पक्ष्यांनाही त्याच्या झळा लागत आहेत. परंतु पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाण्यासाठी ते भटकंती करतात. या कार्यासाठी पुढाकार घेऊन महात्मा बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेच्या वतीने मागील पाच वर्षांपासून नि:शुल्क पाणी पात्राचे वितरण करण्यात येते. या कार्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे, असे मनोगत महात्मा बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ व्यासपीठ मध्ये व्यक्त केले.

Lokmat platform: Every citizen has to take initiative for animal and birds | लोकमत व्यासपीठ : प्रत्येक नागरिकाने पशु-पक्ष्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे

लोकमत व्यासपीठ : प्रत्येक नागरिकाने पशु-पक्ष्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे

Next
ठळक मुद्देमहात्मा बहुउद्देशीय जनकल्याण संस्था : पाच वर्षांपासून पक्ष्यांसाठी पाणी पात्राचे नि:शुल्क वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्यात जीवाची लाहीलाही होते. नागपूरचे तापमान ४४ अंशावर गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसोबत मुक्या पक्ष्यांनाही त्याच्या झळा लागत आहेत. परंतु पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाण्यासाठी ते भटकंती करतात. या कार्यासाठी पुढाकार घेऊन महात्मा बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेच्या वतीने मागील पाच वर्षांपासून नि:शुल्क पाणी पात्राचे वितरण करण्यात येते. या कार्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे, असे मनोगत महात्मा बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ व्यासपीठ मध्ये व्यक्त केले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात महात्मा बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेच्या सचिव हंसाबेन पाघडाल, सहसचिव ज्योत्स्ना बाजारे, अम्रिता पाघडाल, रेशमा दलाल उपस्थित होत्या. महात्मा बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेची नोंदणी २०१० मध्ये करण्यात आली. समाजसेवा करण्याच्या मुख्य उद्देशाने संस्थेचा शुभारंभ झाला. सुरुवातीला वृद्धाश्रमात,अनाथाश्रमात साड्या वितरीत केल्या. वृद्धांना लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या वस्तू पुरविण्यात आल्या. मागील पाच वर्षांपासून संस्थेने उन्हाळ््यात पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत संस्थेने मंदिर, पोलीस स्टेशन, गार्डन, कॉलनी, ग्रामीण भागात पक्ष्यांसाठी पाण्याचे पात्र वितरीत करून त्यांची तहान भागविण्यास सुरुवात केली. संस्थेच्या वतीने स्वखर्चाने पाणी आणि दाणे टाकता येईल, अशा पात्रांचे वितरण सातत्याने करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ५०० पात्रांचे नि:शुल्क वितरण केले. त्यानंतरच्या वर्षात एक हजार, दीड हजार असा कार्याचा आलेख वाढला. या वर्षी दोन हजार पाणी पात्रांचे वितरण करण्याचे संस्थेने ठरविले आहे. या कार्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या हंसाबेन पाघडाल, ज्योत्स्ना बाजारे, अम्रिता पाघडाल, रेशमा दलाल यांनी यावेळी केले.
बेसात करणार एक हजार पात्रांचे वितरण
संस्थेच्या वतीने बेसा परिसरात पाणी पात्राचे वितरण केले. या उपक्रमाला तेथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रतिसादाने प्रेरित होऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बेसा परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्रित करून पक्ष्यांसाठी एक हजार पाणी पात्र वितरित करण्याचा मनोदय व्यक्त केला.
तुम्हीही होऊ शकता सहभागी
उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे हे मोठे कार्य आहे. हे कार्य एकट्या संस्थेच्या वतीने शक्य नाही. त्यामुळे या सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला, पुरुषांनी संस्थेशी प्लॉट नं. ३१, गायत्रीनगर, आदित्य विला, आयटी पार्क, जवळ नागपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
प्राण्यांसाठीही घेणार पुढाकार
उन्हाळ्यात चिमण्या, पक्ष्यांसोबत गायी, कुत्रे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. पाण्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागते. परंतु शहरातील कोणत्याच भागात या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. या प्राण्यांसाठी सिमेंटच्या टाक्या विविध चौकात लावण्यात येणार आहेत.
रिकाम्या बिसलेरी बॉटलचा सदुपयोग
अनेक नागरिक पाण्याची बॉटल विकत घेऊन ती रिकामी झाल्यानंतर फेकून देतात. परंतु या बॉटल एकत्रीत करून त्यात पाणी भरून झाकणाच्या बाजुने लहान छिद्र केल्यास लहान रोपट्यांना थेट मुळाशी पाणी देणे शक्य होते. यामुळे लहान रोपट्यांचे संवर्धन होऊन त्यांचे वृक्षात रुपांतर होण्यास मदत होते. त्यासाठी संस्थेच्या वतीने रिकाम्या पाण्याच्या बॉटलबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

Web Title: Lokmat platform: Every citizen has to take initiative for animal and birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.