लोकसभा नागपूर १९८४; अपक्षांच्या भाऊगर्दीत प्रस्थापित पक्षांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:11 AM2019-03-20T11:11:53+5:302019-03-20T11:12:31+5:30

१९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती.

Lok Sabha Nagpur, 1984; Banvarilal Purohit wins | लोकसभा नागपूर १९८४; अपक्षांच्या भाऊगर्दीत प्रस्थापित पक्षांचीच सरशी

लोकसभा नागपूर १९८४; अपक्षांच्या भाऊगर्दीत प्रस्थापित पक्षांचीच सरशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: १९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती. निवडणुकांत इतर सर्व मुद्दे बाजूला पडले होते. तर दुसरीकडे प्रथमच निवडणुकांमध्ये अपक्षांचे प्रमाण हे २०हून अधिक दिसून आले. अनेक हौसे गवसेदेखील निवडणुकीत उतरले होते. मात्र अपक्षांच्या भाऊगर्दीत ९५ टक्क्यांहून अधिक मते ही तीन प्रस्थापित पक्षांच्याच पारड्यात गेली होती. मतदारांनी परत एकदा कॉंग्रेसवर विश्वास टाकला व बनवारीलाल पुरोहित हे पहिल्यांदाच लोकसभेत गेले.
१९८० ते १९८४ या कालावधीत देशात अनेक स्थित्यंतरे घडली. महाराष्ट्रात बॅ.अंतुले यांना तर न्यायालयीन आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला होता.
१९८४ साली इंदिरा गांधी यांची आॅक्टोबर महिन्यात हत्या झाली व डिसेंबर महिन्यात राजीव गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. विदर्भात कॉंग्रेसचे संघटन आणखी मजबूत झाले होते. कॉंग्रेसने बनवारीलाल पुरोहित यांना तिकीट दिले. तर खोरिपातर्फे श्याम खोब्रागडे यांनी अर्ज भरला होता. १९८० च्या निवडणुकीतदेखील श्याम खोब्रागडे हे उभे होते व ते दुसऱ्या स्थानी आले होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना जास्त अपेक्षा होत्या. तर भाजपातर्फे रामप्रकाश आहुजा हे मैदानात होते. भाजपाने पहिल्यांदाच नागपुरात आपला उमेदवार उतरविला होता. याशिवाय चंद्रकांता कांबळे, दिनकर बेंडेकर, टिकाराम पेंदाम, महेश पुरोहित, रामरतन जानोरकर, विठ्ठलदास दिवेचा, आनंदराव कुबेटकर, एन.एल.राव, कामरान खान, प्रकाश चाफले, प्रमोद पटेल, हरिभाऊ तभाने, रमण मूर्ती, भगवंतसिंह भसिन, अरविंद जोहरापुरकर, नत्थू शोरटे, राहुल रामटेके, शब्बीर अहमद, मुकुंद गजवे, बाळासाहेब अग्ने, विठ्ठलराव मासुरकर हे २२ अपक्षदेखील निवडणुकीत उतरले होते.
अपेक्षेप्रमाणे बनवारीलाल पुरोहित जिंकून आले. त्यांना ५२.९९ टक्के मते प्राप्त झाली. तर श्याम खोब्रागडे हे २९.४१ टक्के मतांसह परत दुसऱ्या स्थानी राहिले. १९८० च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या मतांमध्ये मात्र तीन टक्क्यांची वाढ झाली. भाजपाचे रामप्रकाश आहुजा हे १४.१५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी होते. या तीन उमेदवारांना मिळून ९६.५५ टक्के मते होती. तर २२ अपक्षांच्या पदरी केवळ ३.४५ टक्के मते आली.

काँग्रेसने विदर्भाचा बालेकिल्ला राखला
इंदिरा गांधी आपल्या मृत्यूच्या सात दिवस अगोदर विदर्भाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. २३ आॅक्टोबर रोजी त्या नागपुरात आल्या व तेथून चंद्रपूर जिल्ह्यातील सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गेल्या होत्या. ‘आज भारतावर विविध बाजूंनी संकटे येत आहेत. बाहेरच्यापेक्षा घरातून होणारी कटकारस्थाने जास्त धोकादायक आहे व हीच चिंतेची बाब आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी या शक्तींसोबत शेवटपर्यंत लढेल असे त्या चंद्रपुरात म्हणाल्या होत्या. त्यानंतर सातच दिवसात ३१ आॅक्टोबर रोजी राजधानीत त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर देशात एक सहानुभूतीची लाट आली. विदर्भात तर कॉंग्रेसला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या व कॉंग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख या क्षेत्राने कायम ठेवली.

Web Title: Lok Sabha Nagpur, 1984; Banvarilal Purohit wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.