Lok Sabha Election 2019; रामटेक खेचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:29 AM2019-04-07T11:29:11+5:302019-04-07T11:30:35+5:30

एकसंघ काँग्रेस रामटेकचा गड निश्चितच सर करेल, असा विश्वास रामटेक लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी व्यक्त केला.

Lok Sabha Election 2019; Congress workers mobilized to pull Ramtek | Lok Sabha Election 2019; रामटेक खेचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले

Lok Sabha Election 2019; रामटेक खेचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी, पीरिपासह सर्वांची साथ विकासाचा रोड मॅप मतदारापुुढे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेकचा गड सर करण्यासाठी अख्खी काँग्रेस एकवटली आहे. कार्यकर्त्यांच्या जोशातच विजय दडला आहे. कसलीही गटबाजी नाही. उलट माझ्या उमेदवारीमुळे सर्व गट एकत्र आले आहेत. एकसंघ काँग्रेस रामटेकचा गड निश्चितच सर करेल, असा विश्वास रामटेक लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गजभिये यांनी ‘लोकमत’ला भेट दिली. या वेळी ते म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना देशभरात साथ मिळत आहे. विदर्भात राहुल गांधी यांच्या सभांना होत असलेल्या गर्दीतच मोदी सरकारचा पराभव दडला आहे. यात रामटेक मतदार संघ मागे राहणार नाही. देशातील परिस्थिती बघता रामटेकच्या मतदारांनी कौल दिला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी संपला. नोटाबंदी, जीएसटीने बेरोजगारी वाढली. सामान्य माणसांचे कंबरडे मोडले. गरीब आणखी गरीब झाला. प्रत्येक गावात बेरोजगारांची फौज उभी आहे. शेतमालाला भाव नाही. ग्रामीण भागात आजही चांगल्या आरोग्य सुविधा नाही. सामान्य माणसांची सर्वत्र गळचेपी होत आहे. अशास्थितीत काँग्रेस त्यांच्या सोबत राहिली. आता शेतकरी, बेरोजगार आणि सामान्य नागरिकांनी मोदी सरकारला धडा शिकविण्याचा संकल्प केला आहे. रामटेक लोकसभा मतदार संघात सर्वत्र हेच चित्र आहे. शेतकरी आणि बेरोजगरांना बळ देण्यासाठी काँग्रेसजवळ व्हिजन आहे. आज प्रत्येक गावात प्रचार करताना मी काँग्रेसचे व्हिजन शेतकरी, बेरोजगारांपुढे ठेवत आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघात २३२४ बूथ आहेत. १३ तालुक्यातील १८०० गावात हा मतदार संघ विस्तारलेला आहे. मतदार संघाचा आवाका मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. मागील १२ दिवसांत मी मतदार संघ पिंजून काढला आहे. सर्वांना परिवर्तन हवे आहे.
रामटेक लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी माझ्याकडे व्हिजन डॉक्युमेंट आहे. तो मी मतदारांपर्यंत पोहोचवीत आहे. शेतकऱ्यांचा विकास, बेरोजगारांना नोकऱ्या आणि प्रादेशिक विकास हा माझा रामटेकच्या विकासाचा रोड मॅप आहे. देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर रामटेक मतदार संघात पर्यटन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती केली जाईल. यात व्याघ्र पर्यटन, वन पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाचा समावेश असेल.
वन पर्यटनाच्या विकासासाठी आदिवासींना ‘बेड आणि ब्रेक फास्ट’ या संकल्पनेतून रोजगार मिळू शकतो. यासाठी आदिवासी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. बुद्धिस्ट सर्किटच्या माध्यमातून जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पर्यटनावर अधिक भर देण्यात येईल. काँग्रेसने २००८ मध्ये कुही तालुक्यात ‘निम्झ’ची मुहूर्तमेढ रोवली होती. भाजप सरकारने हा प्रकल्प गुंडाळला. या प्रकल्पाला नवसंजीवनी देत दोन लाखाहून अधिक रोजगारांची निर्मिती करण्याचा माझा संकल्प आहे. उमरेड तालुक्यात टंगस्टन आणि मॅगनिज खाणीच्या प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळतील. कामठी शहराला सॅटेलाईट टाऊन म्हणून विकसित केल्यास विकास होईल. नागपूर-कामठी परिसरात टेक्सटाईल झोन उभारण्याचा मानस आहे. या सर्व कामासाठी माझ्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग करणार आहे. मेट्रो रिजनच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची कोंडी करण्यात आली. सरकारने मेट्रो रिजनच्या माध्यमातून विकासाचे गाजर दाखविले, मात्र कृती शून्य आहे. याबाबत कुणी का बोलत नाही?
राज्यात काँग्रेसला उभे करण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरताच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते ताकदीने काँग्रेसच्या कामाला लागले आहेत. पीरिपाचे जोगेंद्र कवाडे आणि काँग्रेस समर्थित पक्ष आणि संघटना परिश्रम घेत आहे. सर्वच नेते व कार्यकर्त्यांची ही मेहनत बघता यावेळी गडावर काँग्रेसचाच झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Congress workers mobilized to pull Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.