भेदभावाच्या वातावरणाविरोधात साहित्यिकांनी बोलावे; ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:07 PM2018-12-17T12:07:28+5:302018-12-17T12:07:53+5:30

शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले.

Litterateur should speak against discrimination; Gyanpeeth winner Pratibha Rai | भेदभावाच्या वातावरणाविरोधात साहित्यिकांनी बोलावे; ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय

भेदभावाच्या वातावरणाविरोधात साहित्यिकांनी बोलावे; ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय

Next
ठळक मुद्देसुमतीताई-भालचंद्र व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात वाढणारा धार्मिक कट्टरवाद, हिंसात्मक वातावरणाला राजकीय शक्तींकडूनच मिळणारे प्रोत्साहन आणि याद्वारे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असल्याने प्रेमभावाची सामाजिक व्यवस्थाच ढासळत चालली आहे. अशावेळी लेखक, साहित्यिकांनी मूकदर्शक राहून चालणार नाही. शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले.
विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्यावतीने आयोजित सुमतीताई-भालचंद्र व्याख्यानमालेत ‘असीम है ये विश्व’ विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. सर्वोदय आश्रम, बोले पेट्रोल पंप, अमरावती रोड येथे या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, हे संपूर्ण विश्व अलौकिक अशा नैसर्गिक शक्तीने चालत आहे. या शक्तीला ईश्वर मानून वेगवेगळ्या धर्मियांनी वेगवेगळ्या नावाने संबोधले आहे. पण खरा ईश्वर कसा आणि कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही. मनुष्याने स्वत:च्या भल्यासाठी ईश्वर नामक शक्तीची निर्मिती केली, मात्र आता याच ईश्वराच्या नावाने एकमेकांविरोधात हिंसाचार केला जातो.
मनुष्य आणि इतर सर्व सजीवांना ईश्वराची नितांत आवश्यकता आहे. मात्र हा ईश्वर चांगल्यासाठी असावा. स्वर्ग-नरक या व्यर्थ कल्पना आहेत. खरा स्वर्ग या आपल्या पृथ्वीवरच आहे. या पृथ्वीलाच स्वर्ग बनविणाऱ्या ईश्वराची व तशा विचाराने चालणाऱ्या माणसांची नितांत आवश्यकता असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
दहशतवाद हा वाईटच आहे व देशाच्या संरक्षणासाठी त्याचा बीमोड करणे आवश्यकच आहे. मात्र एखादी व्यक्ती किंवा अल्पवयाचा तरुण या वाईट मार्गाकडे का जातो, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण जगातील प्रत्येकाला शांतपणे आयुष्य जगण्याची लालसा असते.
त्यामुळे हिंसाचार करणारे दहशतवादी कुठल्यातरी मातेचा पुत्र आहे व तो या मार्गाला का लागला याची कारणे शोधून त्या कारणाला नष्ट करणे आवश्यक आहे. शेवटी ‘वसुधैवकुटुंबकम’ या संकल्पनेप्रमाणे हे संपूर्ण जग आपले कुटुंब आहे, ही भावना महत्त्वाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लहानपणी मी वडिलांना, किती बांबू जोडून आकाशाच्या पार जाता येईल व ईश्वराला भेटता येईल असे विचारायचे. त्यांनी मात्र परीकथा सांगण्याऐवजी या केवळ कल्पनामात्र असल्याचे उत्तर दिले. माझे समाधान झाले नाही आणि तेव्हापासून मी ईश्वराचा शोध घेत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
आकाशाला मर्यादा आहेत असे म्हणतात, पण नैसर्गिक व वैज्ञानिकदृष्ट्या आकाश असिमीत आहे, त्यास अंत नाही. मग आपल्या विचारांना मर्यादा का असावी, असा प्रश्न करीत आपल्या कल्पनांना, विचारांना मर्यादित करू नका, त्यांना मुक्तपणे विहार करू द्या, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाटील यांनी तर संचालन अजेय गंपावार यांनी केले. डॉ. विलास देशपांडे यांनी
आभार मानले.

Web Title: Litterateur should speak against discrimination; Gyanpeeth winner Pratibha Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.