अचलपूर येथील हत्याप्रकरण

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्याला निर्दोष सोडण्याचा आदेश दिला आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे.

रूपचंद चंदेले (५५) असे आरोपीचे नाव असून तो अचलपूर येथील रहिवासी आहे. लल्लूप्रसाद चंदेले असे मयताचे नाव होते. ते नगर परिषदेत अधिकारी होते. आरोपीने झाड कापण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावरून आरोपी व लल्लूप्रसादमध्ये २५ जून २०१२ रोजी भांडण झाले. दरम्यान, आरोपीने कट्यारीने हल्ला करून लल्लूप्रसाद यांची हत्या केली असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. ८ जानेवारी २०१५ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)