ठळक मुद्देराकेश सिन्हा : अखंड भारत संकल्प दिनानिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे? जगभरातील २२ मुस्लीम देशांच्या राष्ट्रगीतात मातृभूमीला वंदन करण्यात आले आहे. मग भारतात वंदेमातरम् नाकारण्याचे कारण काय? जे असा विरोध करत असतील त्यांना वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू, असे प्रखर विचार दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच संघ विचारांचे अभ्यासक डॉ. राकेश सिन्हा यांनी व्यक्त केले. संवेदना परिवार संस्थतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी चिटणवीस सेंटर येथे ‘वर्तमान परिप्रेक्ष मे अखंड भारत की संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर, प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी उपस्थित होते. डॉ. सिन्हा पुढे म्हणाले, भारतात हिंदू हे बहुसंख्य असल्याचे सांगितले जाते. परंतु हा निकष भारत एकसंध असतानाचा आहे. पुढे पाकिस्तान, ब्रह्मदेश, बांगलादेश, श्रीलंका असे देशाचे अनेक तुकडे पडले. या फाळणीमुळे भारताचा भूभाग लहान झाला आणि परिणामी हिंदूंची संख्याही घटली. इतर समाजाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढतेय ते बघितले तर एक दिवस भारतातील हिंदूच अल्पसंख्यांक ठरतील, अशी स्थिती आहे. त्यात भर घालण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकार सुरूच आहेत आणि आज नाही तर १९११ पासून ‘लव्ह जिहाद’च्या आधारे धर्मांतर घडविले जात आहे. परंतु केंद्रात सत्तांतर झाल्यापासून चित्र बदलायला लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वाढत आहेत.
चाणक्य या देशात खूप झालेत आता चंद्रगुप्तांची गरज आहे. असे चंद्रगुप्त आता संघाच्या शाखांमधून तयार होत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुनील आंबेकर म्हणाले, भारताचा इतिहास पुरुषार्थाचा आहे. आज जगभरातील देश म्हणूनच भारताकडे आशेने पाहत आहेत. जगाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर भारत शाबूत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.