मध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले राजभवनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:00 PM2019-02-06T23:00:55+5:302019-02-06T23:03:44+5:30

ऐतिहासिक व समृद्ध वास्तुकलेचा वारसा लाभलेल्या नागपूरच्या राजभवन परिसरातील सुमारे एक एकर परिसरात मध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले आहे. विविध रंगांची तसेच विविध प्रजातींची सुमारे पाच हजारपेक्षा अधिक गुलाब फुले बहरली आहेत. यामध्ये २५० प्रकारच्या गुलाबांच्या प्रजाती असून सुमारे १ हजार ७७१ गुलाबांच्या झाडांवर रंगांची उधळण करत गुलाबांचा राजा डौलाने उभा असल्याचा भास होतो.

The largest 'Rose Garden' in central India was started in Raj Bhawan | मध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले राजभवनात

मध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले राजभवनात

Next
ठळक मुद्दे२५० प्रकारच्या विविध प्रजातींची १७७१ गुलाबांची झाडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐतिहासिक व समृद्ध वास्तुकलेचा वारसा लाभलेल्या नागपूरच्या राजभवन परिसरातील सुमारे एक एकर परिसरात मध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले आहे. विविध रंगांची तसेच विविध प्रजातींची सुमारे पाच हजारपेक्षा अधिक गुलाब फुले बहरली आहेत. यामध्ये २५० प्रकारच्या गुलाबांच्या प्रजाती असून सुमारे १ हजार ७७१ गुलाबांच्या झाडांवर रंगांची उधळण करत गुलाबांचा राजा डौलाने उभा असल्याचा भास होतो.
विविध जैवविविधतेने नटलेल्या व समृद्ध परंपरा लाभलेल्या राजभवनच्या परिसरातील रोज गार्डन हे मुख्य आकर्षण ठरत आहे. नागपुरात सध्या चांगलीच थंडी पडत असल्यामुळे गुलाब अत्यंत बहारावर आलेला आहे. २५० प्रकारच्या गुलाब फुलांच्या झाडांना मनमोहक सप्तरंगी फुले बहरली असल्यामुळे हा संपूर्ण परिसर गुलाबमय झाला आहे. गुलाबांच्या फुलांमध्ये कुठलीही परंपरागत प्रजाती नसून नागपूरच्या उन्हाळ्यातही गुलाबांच्या झाडांचा सांभाळ करता येईल, अशाच प्रकारच्या प्रजाती येथे विकसित करण्यात आल्याची माहिती राजभवनचे प्रमुख रमेश येवले यांनी यावेळी दिली.
राजभवन परिसरात अनेक वर्षांपासून असलेल्या सुबाभूळच्या जंगलात ‘रोज गार्डन’ तयार करण्यात आले आहे. यासाठी पूर्वी बंगळुरु, म्हैसूर आदी ठिकाणाहून गुलाबांची झाडे आणण्यात आली होती. परंतु येथील ४७ डिग्री तापमानामध्ये त्यांचा सांभाळ करणे शक्य नसल्यामुळे येथील गुलाबप्रेमी मुकुंद तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबाच्या झाडांचे बडिंग, ग्राफ्टटिंग करुन येथील हवामानात बहरु शकतील, अशा प्रकारच्या गुलाब फुलांच्या जाती विकसित करण्यात आल्या आणि हे संपूर्ण रोज गार्डन जैवविविधतेची काळजी घेतानाच सेंद्रिय पद्धतीने गुलाब विकसित करण्यात आले आहे. गुलाबाच्या झाडांना कडूनिंबाचे तेल व खाण्याच्या सोड्याचे मिश्रण फवारण्यात येते. यामुळे परागकणाच्या माध्यमातून मधमाशांना अन्नद्रव्य उपलब्ध होत आहे.
राजभवनच्या रोझ गार्डनमधील गुलाबाच्या विविध फुलांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात पारितोषिके मिळविली आहेत. सध्या सहा महिन्याच्या गुलाब फुलांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. हा बहर साधारणत: १५ दिवसांपर्यंत झाडांवर बघायला मिळतो. रोझ गार्डनमध्ये गुलाब फुलांच्या प्रजातीपैकी हायब्रीड टी या प्रजातीच्या १२५ प्र्रकारच्या एक हजारपेक्षा जास्त फुलांची झाडे असून फ्लोरिबंडा, मिनिएचर, क्लायंबर रोझेस (वेलीवर्गीय) १२५ प्रकार आहेत. या फुलांची ८०० पेक्षा जास्त झाडे असून प्रत्येक झाडाला दोनपेक्षा जास्त व काही झाडांना ४० फुलांचे गुच्छ बघणे हे मनाला वेगळा आनंद देऊन जातात. गुलाबांची झाडे काश्मीरसारख्या थंड प्रदेशात २५ वर्षांपर्यंत बहरतात. परंतु नागपूरसारख्या वातावरणात त्यांचे वय केवळ सहा वर्षांचे असते. हेल्दी फ्लॉवरिंगसाठी ऑगस्टपासून गुलाब फुलांची झाडे लावायला सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या थंडीमध्ये सर्व गुलाबांच्या झाडांना चांगला बहर येतो. तसेच उन्हाळ्यातही अशा झाडांचा सांभाळ करणे सुलभ होते. मध्य भारतातील सर्वात मोठ्या रोझ गार्डनची देखभाल करतानाच फुलांचा बहर सांभाळणे महत्त्वाचे असते. राजभवन येथील दुर्मिळ अशा गुलाब फुलांच्या झाडांचा अनोखा खजिना पाहणे ही पर्वणीच आहे. राजभवनचे प्रभारी अधिकारी रमेश येवले हे प्रत्येक गुलाबाच्या झाडांचा सांभाळ करतानाच राजभवनच्या सौंदर्यात भर घालण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. त्यामुळे राजभवनचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

 

Web Title: The largest 'Rose Garden' in central India was started in Raj Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.