खिचडी राष्ट्रीय पदार्थ व्हावा : कार्तिकेय साराभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 09:20 PM2018-01-11T21:20:51+5:302018-01-11T21:22:17+5:30

आपण खिचडीचा गर्व बाळगला पाहिजे व हा पदार्थ राष्ट्रीय पदार्थ झाला पाहिजे, असे मत अहमदाबाद येथील ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेन्ट एज्युकेशन’चे संस्थापक व संचालक कार्तिकेय साराभाई यांनी व्यक्त केले.

Khichdi should be a national food: Kartikeya Sarabhai | खिचडी राष्ट्रीय पदार्थ व्हावा : कार्तिकेय साराभाई

खिचडी राष्ट्रीय पदार्थ व्हावा : कार्तिकेय साराभाई

Next
ठळक मुद्देनागपुरात गृहविज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशात अनेक मौलिक आहारपद्धती आहेत. मात्र पाश्चिमात्यांकडून एखादी गोष्ट आल्यावरच त्याचे महत्त्व कळते. आपल्या आहारपद्धतीतील खिचडीमध्ये प्रचंड पौष्टिक घटक असतात. मात्र सणसमारंभाला खिचडी दिसून येत नाही. आपण खिचडीचा गर्व बाळगला पाहिजे व हा पदार्थ राष्ट्रीय पदार्थ झाला पाहिजे, असे मत अहमदाबाद येथील ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेन्ट एज्युकेशन’चे संस्थापक व संचालक कार्तिकेय साराभाई यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गृहविज्ञान विभागातर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचे गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. साराभाई हे देशाला अंतराळविज्ञान क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करुन देणारे विक्रम साराभाई यांचे चिरंजीव आहेत हे विशेष.
‘सोशिओ-इकॉनॉमिक चेंज थ्रू इनोव्हेशन : इम्पॅक्ट आॅन एन्व्हायर्नमेन्ट अ‍ॅन्ड वेलनेस आॅफ कम्युनिटी’ या विषयावरील या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, ‘नीरी’च्या वैज्ञानिक डॉ.आत्या कपले मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सोबतच विभागप्रमुख व परिषदेच्या संयोजिका डॉ.कल्पना जाधव, डॉ. प्राजक्ता नांदे यादेखील उपस्थित होत्या. सद्यस्थितीत आपल्या पृथ्वीच्या दीडपट संसाधनांची गरज आहे व २०५० मध्ये हाच आकडा अडीच पटांवर जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या तुलनेत आशियामध्ये प्रतिव्यक्ती फारच कमी जमीन उपलब्ध आहे व भविष्यात हे प्रमाण आणखी घटत जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण, अर्थशास्त्र व समाज यांचा एकत्रित विचार करून पावले टाकण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कार्तिकेय साराभाई यांनी केले. सामाजिक बदल आणि पर्यावरण यांचा समतोल बनून रहावा यासाठी संशोधन व नव्या शोधांवर जास्त भर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित पुढाकार घेतला पाहिजे, असे डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले. डॉ.आत्या कपले यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात ‘नीरी’ने घेतलेल्या पुढाकारांबाबत भाष्य केले. विज्ञान व समाज यांचा मेळ झाला पाहिजे. यासाठी वैज्ञानिकांनी समाजातून सल्ले विचारण्यावर भर दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. यावेळी डॉ.कल्पना जाधव यांनी प्रास्ताविक केले. विभागातील ‘रिसर्च स्कॉलर’ प्राजक्ता नवरे-सदाचार यांनी विद्यापीठ गीत सादर केले. शुभदा जांभुळकर यांनी संचालन केले तर डॉ. प्राजक्ता नांदे यांनी आभार मानले. परिषदेच्या पहिल्या दिवशी चार तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. देशातून सुमारे २५० प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.
‘लॅक्टोबॅसिलस’ हा तर राष्ट्रीय ‘बॅक्टेरिया’
यावेळी कार्तिकेय साराभाई यांनी एका वेगळ्याच मुद्यावर प्रकाश टाकला. आपल्या देशात राष्ट्रीय पशू, पक्षी आहेत. त्याच धर्तीवर राष्ट्रीय ‘बॅक्टेरिया’देखील घोषित झाला पाहिजे. याचा मान ‘लॅक्टोबॅसिलस’लाच जाईल व लवकरच ही घोषणा होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
कीटकनाशके म्हणजे विषाचाच प्रकार
कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या स्पर्धेमुळे कृषी क्षेत्रदेखील प्रभावित झाले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे कृषी उत्पादनांची मागणी वाढली आहे. मात्र शेतांमध्ये वापरण्यात येत असलेली कीटकनाशके ही औषधे नसून तो विषाचाच एक प्रकार असून त्यामुळे पर्यावरणाला धोका आहे. यासंदर्भात सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साराभाई यांनी केले.

 

Web Title: Khichdi should be a national food: Kartikeya Sarabhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.