खासदार महोत्सव : ‘गंगा...’ : अद्भूत, अविस्मरणीय अन् रोमांचकही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:28 PM2018-12-15T23:28:15+5:302018-12-15T23:33:44+5:30

१४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, त्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे सामूहिकपणे केलेली नृत्याची अद्भूत अशी कलाकारी, रबराप्रमाणे लवचिक शरीर असलेल्या कलावंतांकडून ३५ फूट उंचावरून सादर झालेला व केवळ सर्कसमध्येच बघावयास मिळणारा एरियल अ‍ॅक्ट..., प्रत्येक कृती होताना पाहून प्रेक्षकांचा प्राण कंठाशी आणणारे मलखांब क्रीडा प्रकाराचे रोमांचक सादरीकरण, अशा कलावंतांची क्रीडा, नृत्याची वेगवेगळी कला पाहून केवळ, अद्भूत... रोमांचक...अविस्मरणीय... हेच शब्द प्रेक्षकांच्या तोंडून बाहेर पडत होते. अनादी काळापासून भारतभूमीत वाहणाऱ्या गंगा नदीच्या प्रवाहाला मानवंदना देणाऱ्या कलावंतांचे नेत्रदीपक असे सादरीकरण शनिवारी खासदार महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरकरांनी अनुभवले.

Khasdar Festival: 'Ganga ...': Awesome, unforgettable and exciting ... | खासदार महोत्सव : ‘गंगा...’ : अद्भूत, अविस्मरणीय अन् रोमांचकही...

खासदार महोत्सव : ‘गंगा...’ : अद्भूत, अविस्मरणीय अन् रोमांचकही...

googlenewsNext
ठळक मुद्देगंगेच्या पवित्र प्रवाहाचे नेत्रदीपक सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, त्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे सामूहिकपणे केलेली नृत्याची अद्भूत अशी कलाकारी, रबराप्रमाणे लवचिक शरीर असलेल्या कलावंतांकडून ३५ फूट उंचावरून सादर झालेला व केवळ सर्कसमध्येच बघावयास मिळणारा एरियल अ‍ॅक्ट..., प्रत्येक कृती होताना पाहून प्रेक्षकांचा प्राण कंठाशी आणणारे मलखांब क्रीडा प्रकाराचे रोमांचक सादरीकरण, अशा कलावंतांची क्रीडा, नृत्याची वेगवेगळी कला पाहून केवळ, अद्भूत... रोमांचक...अविस्मरणीय... हेच शब्द प्रेक्षकांच्या तोंडून बाहेर पडत होते. अनादी काळापासून भारतभूमीत वाहणाऱ्या गंगा नदीच्या प्रवाहाला मानवंदना देणाऱ्या कलावंतांचे नेत्रदीपक असे सादरीकरण शनिवारी खासदार महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरकरांनी अनुभवले. 


ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार खासदार महोत्सवात शनिवारी ‘गंगा :राष्ट्र की जीवनधारा’ हा अलौकिक असा कार्यक्रम सादर झाला. लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी रोमांचक अनुभव देणारी सांगितिक मेजवानी ठरली. शतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग असे चार युग बदलत गेल्याचे आपण ऐकतो. या चार युगांच्या बदलणाऱ्या संस्कृतीची साक्ष देणारा एकमेव प्रवाह गंगा. वर्षे, युग आले आणि गेले, पण अनादी काळापासून गंगेची धारा अविरतपणे वाहत राहिली. 

ज्या राज्यांमधून गंगेचा प्रवाह वाहतो अशा उत्तराखंड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आदी राज्यातील ख्यातनाम कलावंतासह दिल्ली, मुंबई तसेच क्रोएशिया, मंगोलिया व जर्मनीच्या कलावंतांनी संगीताच्या माध्यमातून नेत्रदीपक असे सादरीकरण केले. वाद्यांच्या धडधडणाऱ्या संगीतावर नयनरम्य नृत्यासह ‘जिम्नास्टिक’ खेळाडूप्रमाणे वाटणारी कला कलावंतांनी सादर केली. यानंतर ‘इंडियाज गॉट टॅलेन्ट’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये लक्ष वेधणाऱ्या ‘मल्लखांब’ ग्रुपच्या कलावंतांनी गंगा प्रवाह दर्शविणाऱ्या संगीतावर चित्तवेधक असे मल्लखांबचे थरारक प्रात्याक्षिक सादर करून प्रेक्षकांना संमोहित केले. परिश्रम आणि प्रचंड सरावाच्या जोरावर प्राप्त केलेल्या या कलावंतांची प्रत्येक कृती पाहताना प्रेक्षकांचा प्राण कंठाशी यावा, अशी अवस्था झाली होती. 

यानंतर गंगेचे आध्यात्मिक, भौगोलिक, सांस्कृतिक, प्राकृतिक आणि आर्थिक महात्म्य दर्शविणाऱ्या अतिशय देखण्या नृत्याचे आकर्षक सादरीकरण दुसऱ्या ग्रुपच्या कलावंतांनी केले. हिमालयातून खळखळ करीत निघणारी गंगा, वाराणसीचा घाट, बंगालमधील सुंदरबन, कुंभमेळा, कालचक्र व सृष्टी निर्मितीपासूनचे अनेक प्रसंग मनमोहक अशा सादरीकरणातून प्रेक्षकांनी अनुभवले. याशिवाय इथिओपिया या देशातील नर्तक कलावंतांनी ‘अघोरी नृत्य’ हा आगळावेगळा नृत्य प्रकार प्रथमच नागपुरात सादर केला. या कलाकारांचे नृत्य थक्क करणारेच होते. या प्रत्येक सादरीकरणाचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी लुटला. 

तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, संस्कार भारतीच्या महानगर अध्यक्ष कांचन गडकरी, शालिनी मेघे, ऊर्मिला अग्रवाल, डॉ़ मंजुषा मार्डीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आर्यन गुप्ता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
कतृत्ववान महिलांचा सत्कार 

महोत्सवात शनिवारी कतृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला़ दिना राजेश पारेख, डॉ़ मंगला केतकर, डॉ़ छाया चौरसिया, डॉ़ वैशाली खेडीकर, मैमूना हक, भरतनाट्यम गुरू रत्नम जनार्दनम, अंजली मिसाळ यांचा कांचन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ निवेदन मनिषा काशिकर यांनी केले़.

 

Web Title: Khasdar Festival: 'Ganga ...': Awesome, unforgettable and exciting ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.