ठळक मुद्देमहापौरांचे निर्देश : धम्मचक्र प्रवर्तन दिन तयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाला देशभरातून येणाºया भाविकांची उत्तम व्यवस्था व्हावी. दीक्षाभूमी परिसराची स्वच्छता आणि सुरक्षा चोख ठेवा. कुठलीही अनुचित घटना होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठक घेण्यात आली.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेता संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, अतिरिक्त आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार आदी उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी आय.टी.आय कारागृह परिसर, माता कचेरी, दीक्षाभूमी यासह इतर ठिकाणी ७१० शौचालये, ७० स्नानगृहांची व्यवस्था के ली जात आहे. आयटीआय येथे सुमारे सात हजार चौरस फुटाचा पेंडाल टाकण्यात येत असून तेथे भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. आरोग्य विभागाचे पथक २९ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या कालावधीत २४ तास नागरिकांच्या सेवेत राहील.पाण्याची व्यवस्था करण्यासाठी २२० तात्पुरते नळ बसविण्यात येणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी भोजनदान आहे तेथे आणि प्याऊसाठी टँकरने पाणी पुरविण्यात येणार आहे. काही ठिकाणी नळ असलेल्या पीव्हीसीच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. दीक्षाभूमीपर्यंत येण्यासाठी नागरिकांसाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहे.
सुमारे २२५ ते २५० फ्लड लाईट, १० जनरेटर तसेच पोलीस विभागाकडून देण्यात येणाºया सूचना भाविकांपर्यंत पोहोचण्यासाठी लाऊ डस्पीकर व्यवस्था प्रकाश विभागातर्फे करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीची व्यवस्था यापूर्वीच झालेली आहे. दीक्षाभूमीकडे येणाºया रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजविण्यात येईल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.
अग्निशमन विभाग पोलिसांच्या सहकार्याने आपत्ती निवारण कक्ष उभारणार आहे. पोर्टेबल फायर एक्स्टिंग्युशर आणि स्वयंसेवक ठिकठिकाणी कार्यरत राहणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी. डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस. बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (हॉटमिक्स प्लान्ट) राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विकास अभियंता सतीश नेरळ, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.
रस्ते तातडीने खुले करा
दीक्षाभूमीकडे येणाºया सेंट्रल बाजार रोडवरील फुटपाथचे काम, महाराजबागकडून कल्पना बिल्डिंगकडून येणाºया रस्त्याची दुरुस्ती करून रस्ते दुहेरी वाहतुकीसाठी खुले करा, असे निदेंश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. रहाटे कॉलनी ते अजनी रेल्वेस्टेशनकडे जाणाºया रस्त्यासंदर्भात मेट्रोला पत्र देऊन तातडीने त्याचे सपाटीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शासकीय इमारती, महापालिका आणि खासगी शाळांची माहिती घेऊन त्या ताब्यात घ्या. अतिरिक्त मोबाईल शौचालय, प्रत्येक दिवशी परिसराची स्वच्छता होईल त्याची काळजी, आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवा, नागरिकांच्या सुविधेसाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.