The investigation of squash contest in Aurangabad will be completed till 19th | औरंगाबाद येथील वादग्रस्त स्क्वॅश स्पर्धेची चौकशी १९ पर्यंत होणार पूर्ण

ठळक मुद्देनागपूर हायकोर्टात माहिती : स्पर्धेत ‘सेटिंग’ झाल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्य शासनाच्या आदेशावरून १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी येत्या १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली आहे.
ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली. स्पर्धेचा पाचवा विजेता ठरविण्यासाठी ‘सेटिंग’ करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाने स्पर्धेची चौकशी सुरू केली आहे. स्पर्धेचा रेकॉर्डही न्यायालयासमक्ष सादर करण्यात आला होता. न्यायालयाने आवश्यक पडताळणी करून रेकॉर्ड शासनाला परत केला आहे. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार रेकॉर्ड सादर केला होता.
स्पर्धेत सहभागी खेळाडू आरब जांभुळकरचे वडील अशोक जांभुळकर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक आर. डी. महादवाड यांचा मुलगा रितेश महादवाड याला सामना न खेळविताच पाचवा विजेता ठरविण्यात आले. आरबने पाचवा विजेता ठरविण्यासाठी सामना खेळविण्याची विनंती आयोजकांना केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणावर आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.