अत्याचाराच्या काळ्या ऋचा लिहिल्यात माझ्या शरीरावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:08 PM2018-10-22T21:08:43+5:302018-10-22T21:11:41+5:30

साहित्य अकादमी पुरस्कार विजेता गुजराती कवी जयंत परमार अतिशय साधे पण तेवढेच संवेदनशील आणि कठोर व्यक्तिमत्त्व. गुजरातच्या दलित कुटुंबात जन्मल्याने साहजिकच सहन केलेल्या अन्यायाच्या जखमा त्यांच्या काव्यातून व्यक्त होतात.

Interview of poet Jayant Parmar | अत्याचाराच्या काळ्या ऋचा लिहिल्यात माझ्या शरीरावर...

अत्याचाराच्या काळ्या ऋचा लिहिल्यात माझ्या शरीरावर...

Next
ठळक मुद्देसाहित्य अकादमी पुरस्कार विजेता जयंत परमार यांची मुलाखत २००६ ला नाकारला होता गुजरात गौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
निशांत वानखेडे
नागपूर : साहित्य अकादमी पुरस्कार विजेता गुजराती कवी जयंत परमार अतिशय साधे पण तेवढेच संवेदनशील आणि कठोर व्यक्तिमत्त्व. गुजरातच्या दलित कुटुंबात जन्मल्याने साहजिकच सहन केलेल्या अन्यायाच्या जखमा त्यांच्या काव्यातून व्यक्त होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आयुष्यात आल्याने वर्षानुवर्षे होत असलेल्या अत्याचाराची आणि माणूसपणाची जाणीव झाली आणि त्यांची उर्दू ‘नज्म’ या अत्याचाराच्या विरोधातील हत्यार बनली. उर्दू जगतालाही ही जाणीव नवीन असल्याने ती देशात आणि देशाबाहेरही स्वीकारली गेली. आपल्या भावस्पर्शी रचनांनी रसिकांना भुरळ घालणारे गीतकार दस्तुरखुद्द गुलजार हेही परमार यांचे ‘मुरीद’ झाले. २००६ ला गुजरात सरकारने त्यांना गुजरात गौरव पुरस्कार जाहीर केला. मात्र गुजरात दंग्यांनी अस्वस्थ झालेल्या या संवेदनशील कवीने तो पुरस्कार स्वीकारण्यासच नकार दिला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या जयंत परमार यांची लोकमत प्रतिनिधीने घेतलेली ही मुलाखत. />
- तुमच्या काव्यात विद्रोह जाणवतो?
ते साहजिक आहे. माझा जन्म दलित कुटुंबात झाला. जातीभेदाचे चटके मी स्वत: अनुभवले व पाहिले आहेत. आमच्यासाठी शाळेत वेगळी व्यवस्था केली जायची, हीन लेखले जायचे. आजही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. शहरात काही प्रमाणात स्थिती सुधारली आहे, मात्र गावांमध्ये आजही अवस्था वाईट आहे. उणा सारख्या घटना हे त्याचेच उदाहरण आहे. पूर्वी हा अन्याय बाहेर येत नव्हता. मात्र आता समाजात निर्माण झालेली जागृती आणि सोशल मीडियामुळे या घटना बाहेर येत आहेत. हे अस्वस्थ करणारे वातावरण मला गप्प बसू देत नाही. ‘जुल्म की काली ऋचाएँ लिखी गई थी मेरे बदन पर...’

- उर्दू भाषेची निवड का केली?
राहत असलेल्या घराजवळ मशीद आहे. तेथून उर्दू शब्द कानावर पडत होते. मशिदीवर लिहलेल्या उर्दूतील आयाती चित्रांप्रमाणे वाटत होत्या. त्यामुळे या भाषेचे वेगळे आकर्षण निर्माण झाले. सुरुवातीला गुजराती भाषेत लिहायला सुरुवात केली. मात्र माझ्या भावना अधिक व्यापक करण्यासाठी उर्दूतूनच लिहावे असे वाटले. जुन्या पुस्तकाच्या बाजारातून उर्दू व्याकरणाची पुस्तक घेतली आणि स्वत:च उर्दू शिकलो व माझे काव्य उर्दूतून लिहू लागलो. भाषेचा प्रभाव म्हणा की माझ्यातील आंतरिक आवाज, हे काव्य लोकांना आवडले. साहित्य जगतातून प्रतिसाद मिळात गेला व ओळख मिळत गेली. अनेकांनी हे काव्य विविध भाषेत भाषांतरित केले. ‘पेन्सील और दुसरी नज्मे’ या दुसऱ्याच काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे ही सुद्धा माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.

- महाराष्ट्रातील दलित, विद्रोही साहित्याचा प्रभाव?
डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावामुळे ७० च्या दशकात दलित पँथर, दलित व विद्रोही साहित्याची चळवळ महाराष्ट्रात पसरली होती. शरदचंद्र परमार यांनी गुजराती भाषेत अनुवादित केलेले मराठीतील विद्रोही साहित्य पहिल्यांदा वाचायला मिळाले आणि माझ्या भावनांना दिशा मिळाली. नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, त्र्यंबक सपकाळ, बाबुराव बागुल आदी साहित्यिकांच्या काव्यात, लेखनात अस्मितेच्या संवेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. या प्रेरणेतून माझ्यातील संवेदना उर्दू कवितेत उतरू लागल्या. विशेष म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांनी माझ्या कविता अनुवादित करून त्यांच्या अस्मितादर्शमध्ये प्रकाशित केल्या. बंगळुरूच्या मासिकात माझे काव्य प्रकाशित झाले आणि उर्दूतील पहिले दलित काव्य म्हणून गौरवही झाला. मला आवडणारे नागपूरचे कवी लोकनाथ यशवंत यांनीही माझ्या कवितांना मराठीत भाषांतरित केले आहे.

- गुजरात गौरव पुरस्कार परत करण्यामागचे कारण?
२००६ मध्ये साहित्य कार्यासाठी राज्य सरकारकडून ‘गुजरात गौरव’ पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. मात्र गुजरात दंगलीसाठी कारणीभूत असणाऱ्या सरकारच्या नेतृत्वाकडून पुरस्कार स्वीकारणार नाही, या भूमिकेवर मी ठाम होतो. २०१४ मध्ये ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम चालली होती, त्याच्या कितीतरी वर्षाआधी मी ही भूमिका घेतली होती.

- कविता आणि चित्रकलेचे समीकरण
बालपणापासूनच मला चित्रकलेची आवड होती. ही चित्रकारिता काव्यातही उतरली. चित्रांच्या माध्यमातून दलित अस्मिता मांडली आहे. पुढे कॅलिग्रॅफी शिकून घेतली. माझे प्रत्येक पुस्तकांचे डिझाईन व कव्हर मी तयार करीत असतो. ‘नज्म याने’ या काव्यसंग्रहात ५० कवितांसाठी ५० पेंटिंग्ज साकार केल्या होत्या. ही कृती साहित्यप्रेमींना खूप आवडली.

- डॉ. आंबेडकर यांची प्रेरणा
आम्ही लहान असताना त्यावेळीही आमच्या घरी व मंदिरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असायचे. हे आमचे ‘मसिहा’ आहेत, एवढी ओळख होती. मात्र त्यांच्या विचारांबाबत फार जाणीव नव्हती. परंतु साहित्याच्या रूपातील त्यांचे विचार माझ्या अभ्यासात आले, तेव्हा खऱ्या अर्थाने माणूसपणाची जाणीव झाली. वर्षानुवर्षांच्या धार्मिक गुलामी व अत्याचाराने आमच्या भावनाही मेल्या होत्या. पण या महापुरुषाने मृत भावनांना जागे केले. अधिकारांची जाणीव करून दिली व त्याहीपेक्षा स्वाभिमान जागविला. या भागात शिक्षण घेणारी आमची पहिली पिढी असावी. नव्या पिढीमध्ये ही प्रेरणाज्योत पेटायला लागली आहे.

वर्तमान परिस्थितीबाबत काय वाटते?
खरं म्हणजे भयमुक्त वातावरणात प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचे, आंतरिक भावना मांडण्याचे स्वातंत्र असायला पाहीजे. मात्र दुर्दैवाने आजची परिस्थिती त्या दृष्टीने योग्य नाही, असे मला प्रामाणिकपणे वाटते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, ढासळती अर्थव्यवस्था असे गंभीर प्रश्न समोर आहेत. खासगीकरण वाढले आहे, नैसर्गिक संपत्तीचे दोहन होत आहे. मात्र समाजाच्या हिताचे मुद्दे सोडून भलत्याच गोष्टीकडे लक्ष वळवले जात आहे, माणसे मारली जात आहेत. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बोलणाºया दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश अशांची हत्या केली जाते.

Web Title: Interview of poet Jayant Parmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.