तिसरे अपत्य दत्तक दिले तरी सरकारी सेवेस अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:47 AM2018-04-17T11:47:25+5:302018-04-17T11:47:35+5:30

एखाद्या दाम्पत्याला तीन अपत्ये असतील आणि त्यांनी एक अपत्य दुसऱ्याला दत्तक दिले असेल तरी, ते दाम्पत्य सरकारी सेवेसाठी अपात्र ठरते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी दिला आहे.

Ineligible for government service even if third offspring is adopted | तिसरे अपत्य दत्तक दिले तरी सरकारी सेवेस अपात्र

तिसरे अपत्य दत्तक दिले तरी सरकारी सेवेस अपात्र

googlenewsNext
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय छोट्या कुटुंबाचा नियम लागू होतो

राकेश घानोडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या दाम्पत्याला तीन अपत्ये असतील आणि त्यांनी एक अपत्य दुसऱ्याला दत्तक दिले असेल तरी, ते दाम्पत्य सरकारी सेवेसाठी अपात्र ठरते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी दिला आहे. अशा प्रकरणांना ‘महाराष्ट्र नागरी सेवा (छोटे कुटुंब) नियम-२००५’मधून वगळण्यात आलेले नाही असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. नियम २(डी) मध्ये छोट्या कुटुंबाची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार, छोट्या कुटुंबात पती, पत्नी व दोन अपत्ये यांचा समावेश होतो. दोन अपत्ये असलेल्या दाम्पत्याने दुसऱ्याचा मुलगा किंवा मुलीला दत्तक घेतल्यास, त्या दत्तक मुलाचा किंवा मुलीचा अपत्यांमध्ये समावेश होत नाही. छोट्या कुटुंबाच्या व्याख्येतून दत्तक मुलगा किंवा मुलीला वगळण्यात आले आहे. परंतु, तीन अपत्ये असलेल्या दाम्पत्याने एक अपत्य दुसऱ्याला दत्तक दिल्यास ते कुटुंब छोटे कुटुंब ठरत नाही. अशा दत्तक अपत्याला नियमातून वगळण्यात आलेले नाही असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. राज्य सरकारने १९ जून २०१५ रोजी पोलीस पाटील भरतीसाठी जाहिरात दिली होती. मेंढाळा, ता. नरखेड येथील अण्णा कनिरे यांनी त्याकरिता अर्ज सादर केला होता. जून-२०१६ मध्ये त्यांची पोलीस पाटीलपदासाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तीन अपत्ये असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सरकारने महाराष्ट्र नागरी सेवा (छोटे कुटुंब) नियमानुसार त्यांची निवड रद्द केली. त्या निर्णयाला कनिरे यांनी सुरुवातीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात आव्हान दिले होते. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी न्यायाधिकरणने त्यांचा अर्ज खारीज केला. त्याविरुद्ध कनिरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन त्यांची याचिका फेटाळून लावली.

जाहिरातीनंतर केले दत्तकपत्र
कनिरे यांनी दत्तक दिलेल्या मुलीचा १९ एप्रिल २०१४ रोजी जन्म झाला आहे. त्या मुलीला त्यांनी १२ जुलै २०१६ रोजी नोंदणीकृत दत्तकपत्र करून पत्नीच्या भावाला दत्तक दिले. परंतु, याद्वारे पोलीस पाटीलपदासाठी पात्र ठरण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

Web Title: Ineligible for government service even if third offspring is adopted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.