उद्योगांना विजेची अडचण जाणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:36 PM2018-04-07T23:36:56+5:302018-04-07T23:37:08+5:30

विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन आणि बंद उद्योग सुरू करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Industries will not have any problem with electricity: Chandrasekhar Bavankule | उद्योगांना विजेची अडचण जाणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

उद्योगांना विजेची अडचण जाणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देव्हीआयएतर्फे पालकमंत्र्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन आणि बंद उद्योग सुरू करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर व अमरावती विभागातील सर्व केंद्र एकमेकांना जोडणारा महत्त्वाकांक्षी ट्रान्समिशन रिंगमेन तयार करण्यात येत आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये खर्च येणार आहे. शेतकऱ्यांना सौरऊर्जा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग भवन, सिव्हील लाईन्स येथील व्हीआयए सभागृहात शनिवारी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशन, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, लघु उद्योग भारती, विदर्भ डिस्पोजेबल अ‍ॅण्ड ट्रेडर्स असोसिएशन, पॅकेज ड्रिकिंग वॉटर असोसिएशन, नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन, डिक्की विदर्भ चॅप्टर, कळमेश्वर इंडस्ट्रीज एमआयडीसी असोसिएशन, नागपूर होलसेल होजिअरी अ‍ॅण्ड रेडिमेड गारमेंट मर्चंट असोसिएशन, होलसेल क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन, व्हीआयए महिला विंग, महिला गृहउद्योग आदी संघटनांतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, सचिव सुहास बुद्धे, एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, बीएमचे सचिव सीए मिलिंद कानडे, चंद्रपूर इंडस्ट्रीज असो.चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, विदर्भ प्लास्टिक असो.चे माजी अध्यक्ष श्रीकांत धोर्डीकर आणि रमेश मंत्री उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेली तीन हजार मेगावॅट विजेची मागणी सौर उर्जेवर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. येत्या २०२२ पर्यंत संपूर्ण कृषी पंप सौरऊर्जेवर आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सोलर कृषी फिडर योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याची ही योजना संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील बंद उद्योग अ‍ॅमिनिटी योजनेंतर्गत सुरू करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असून यासाठी योजना जाहीर करण्यात येईल. औद्योगिक विकास महामंडळाच्या उद्योगक्षेत्रातील सार्वजनिक उपयोगाच्या जमिनी अथवा जेथे अद्याप उद्योग सुरू होऊ शकले नाहीत,अशा जागांवर सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येईल. त्यामुळे उद्योजकांना मागणीपेक्षाही जास्त वीज उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोराडी येथील महालक्ष्मी मंदिराचा विकास करताना वृद्धाश्रम, अनाथालय, ध्यान साधना केंद्र, अपंग पुर्नवसन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. यावेळी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Industries will not have any problem with electricity: Chandrasekhar Bavankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.