औद्योगिक विकासाची मानसिकता उद्योजकांमध्ये असावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:25 AM2018-07-19T01:25:18+5:302018-07-19T01:26:41+5:30

छोट्या छोट्या उद्योगातून विदर्भ आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकासाचा शासनाचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, बाजारपेठांसह उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाची मानसिकता असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Industrial development should be in the mentality of entrepreneurs | औद्योगिक विकासाची मानसिकता उद्योजकांमध्ये असावी 

औद्योगिक विकासाची मानसिकता उद्योजकांमध्ये असावी 

googlenewsNext
ठळक मुद्दे सुधीर मुनगंटीवार : व्हीआयए, बीएमए, एमआयएतर्फे सत्कार


 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छोट्या छोट्या उद्योगातून विदर्भ आणि मराठवाड्याचा औद्योगिक विकासाचा शासनाचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा, बाजारपेठांसह उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाची मानसिकता असणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (बीएमए) आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या(एमआयए)वतीने सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात बुधवारी सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर व्हीआयए अध्यक्ष अतुल पांडे, बीएमए अध्यक्ष नितीन लोणकर, एमआयए अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, व्हीआयएचे माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया, सचिव डॉ. सुहास बुद्धे उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात उद्योग येण्यासाठी शासन संवेदनशील आहे. विदर्भाने औद्योगिक विकास करावा, अशी मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांची इच्छा आहे. फ्लाय अ‍ॅश व बांबूचे काही करता येईल का, याचा विचार सुरू आहे. विदर्भात खनिज संपदा मुबलक आहे. त्यापासून महसूल कसा गोळा होईल, यावर अभ्यास करण्याची गरज आहे. अगरबत्तीची काडी जर चीनमधून आणावी लागत असेल तर भारत माता की जय हळू आवाजात म्हणा, असा टोला त्यांनी लगावला. सर्व विभागाच्या समस्या पाठवा आणि त्या बैठका घेऊन सोडवू, असे आश्वासन त्यांनी व्हीआयए पदाधिकाऱ्यांना दिले.
प्रारंभी अतुल पांडे यांनी जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला आणि वीज दरावर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले. रणधीर यांनी हिंगणा एमआयडीसीमध्ये मोठे आॅटोमोबाईल उद्योग आणण्याची मागणी केली. नितीन लोणकर उद्योगांसाठी झुडपी जंगलाच्या जमिनीचा विचार करावा तसेच उद्योगांना बँकांकडून कर्ज मिळत नसल्याचे सांगितले. बुटीबोरी औद्योगिक भागात ५० हजार झाडे लावण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
संचालन डॉ. सुहास बुद्धे यांनी केले. याप्रसंगी डिक्कीचे मध्य भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, विदर्भ प्रमुख गोपाल वासनिक, आयसीएआयचे माजी अध्यक्ष अशोक चांडक, व्हीआयएचे पदाधिकारी पंकज बक्षी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Industrial development should be in the mentality of entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.