भारतीय रंगभूमी अस्तित्ववादात बांधली गेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:51 AM2019-05-13T11:51:00+5:302019-05-13T11:51:33+5:30

अस्तित्ववाद किंवा आदर्शवाद मनुष्याला एका कंसात बंदिस्त करण्यासारखे आहे. मनुष्याला एका निश्चित रूपात बांधणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्याला बांधणे होय.

Indian theater has not been built on existence | भारतीय रंगभूमी अस्तित्ववादात बांधली गेली नाही

भारतीय रंगभूमी अस्तित्ववादात बांधली गेली नाही

Next
ठळक मुद्देसतीश पावडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अस्तित्ववाद किंवा आदर्शवाद मनुष्याला एका कंसात बंदिस्त करण्यासारखे आहे. मनुष्याला एका निश्चित रूपात बांधणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्याला बांधणे होय. अस्तित्ववादाने सामाजिक अंतरसंबंधांना धक्का लावला होता. आदर्शवादाच्या विपरीत निरर्थकता किंवा मिथ्यावाद मनुष्याच्या जीवनाला अर्थ देणारा असतो. भारतीय रंगभूमीने नेहमीच या मिथ्यावादाला महत्त्व दिले आहे, असे मत वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने रविवारी नाटककार डॉ. सतीश पावडे यांच्या ‘दि थिएटर आॅफ दि अ‍ॅब्सर्ड’ आणि ‘नाट्यप्रसंग’ या दोन पुस्तकांचे धनवटे सभागृह, शंकरनगर येथे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गिरीश गांधी, प्रसिद्ध साहित्यिक अरुण वेलणकर, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, श्रीपाद अपराजित, प्रेमबाबू लुनावत, सलीम शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. शुक्ल यांनी डॉ. सतीश पावडे यांच्या पुस्तकातील रंगभूमीच्या अ‍ॅब्सर्ड प्रवाहावर मुख्यत्वे भाष्य केले. आधुनिकतेने व्यक्तीचे महत्त्व संपविले आहे. राज्य व विधीचे महत्त्व वाढले आहे. मनुष्याच्या संवेदना, संवेदनशील जीवन व आतमध्ये असलेले आनंदाचे प्रवाह मशीनप्रमाणे प्रस्तुत होऊ लागले. मनुष्याच्या अस्मितेला निर्धारीत करणाऱ्या या विकासाच्या मॉडेलचा महात्मा गांधी यांनी विरोध केला होता. विकासाचे मॉडेल विध्वंसक होतात तेव्हा ही निरर्थकता, अ‍ॅब्सर्डिटी महत्त्वाची वाटते. भारतीय रंगभूमीने नेहमीच या अ‍ॅब्सर्ड प्रवाहाचा स्वीकार केल्याचे ते म्हणाले. अस्तित्ववादाचे दुष्परिणाम पाश्चात्त्यांपूर्वी भारतीयांना भोगावे लागतात. आधुनिकतेच्या दबावात वैयक्तिक अनुभव व विविधतेला विद्रुप रूपात प्रस्तुत केले जाते. मिथ्यावादाचा स्वीकार करून आनंद घेण्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे व रंगभूमी याच प्रवाहात अभिव्यक्त झाली आहे. डॉ. पावडे यांनी रंगभूमीचा हा प्रवाह मांडण्याचा चांगला प्रयत्न केला, असे मनोगत त्यांनी मांडले.
अरुण वेलणकर यावेळी म्हणाले, सगळ जग अ‍ॅब्सर्ड नाही. अनेकांना अर्थपूर्णता महत्त्वाची वाटते. अनेक पाश्चात्त्य नाटककारांच्या नाटकांनी येथे वादळ उठविली. पण मराठी रंगभूमीने आपले भारतीयत्व पुन्हा शोधले व पुढेही शोधले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. गिरीश गांधी यांनी डॉ. सतीश पावडे हे संवेदनशील लेखक व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी डॉ. पावडे यांनी पुस्तकामागची भूमिका मांडली. संचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले.

Web Title: Indian theater has not been built on existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.