India should not be loved on sports, but playing country: Sachin Tendulkar | भारत खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा:सचिन तेंडुलकर
भारत खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा:सचिन तेंडुलकर

ठळक मुद्देखासदार महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘भारत हा केवळ खेळावर प्रेम करणारा नव्हे तर खेळ खेळणारा देश व्हावा. युवा, तंदुरुस्त आणि सुदृढ भारत घडविण्यासाठी खेळावर प्रेम करणारा ते खेळ खेळणारा देश हे स्थित्यंतर येण्याचे काम प्रत्येक नागरिकांनी करायला हवे,’ असे आवाहन दिग्गज क्रिकेटपटू,‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने शनिवारी नागपुरात केले. आपले हेच स्वप्न असल्याचे सचिनने सांगताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा गजर करीत सचिनला जोरदार साथ दिली. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दुसऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन सचिनच्या हस्ते यशवंत स्टेडियम येथे झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार आणि अन्य आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या साक्षीने जवळपास पावणेतीन तास चाललेल्या या सोहळ्यात सचिनने उपस्थितांना मराठीतून संबोधित केले.
इतर देशांच्या तुलनेत भारतात आरोग्याचे प्रश्न मोठे असल्याचे सांगून सचिन म्हणाला,‘आम्ही खेळांवर प्रेम तर करतो, पण खेळत नसल्याने आरोग्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. युवा असणे याचा अर्थ फिट असणे असा नाही. खेळाच्या माध्यमातून आयुष्याला शिस्त लावण्याचे काम प्रत्येकाने केलेच पाहिजे. आम्ही सुदृढ राहू आणि इतरांनादेखील प्रोत्साहन देऊ, हा मंत्र पेरण्यासाठी राजदूत बनायला हवे. आरोग्यसंपन्न जीवनमान ठेवायचे झाल्यास इतकेच म्हणेन की खेळत राहा..., खेळत राहा...’
खेळाडूंना युक्तीच्या गोष्टी सांगताना सचिन म्हणाला,‘तुमच्याकडे योजना असतील तरी त्या अंमलात आणणे शिका. खेळ लाईव्ह अ‍ॅक्शन असल्याने त्यात रिटेक नसतो. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात प्रगती साधायची कला अवगत करा. यश हे कायमस्वरूपी नसते. जय-पराजय पचविण्याची तुमच्यात तयारी असावी. मनासारखे होत नसेल तरी शॉर्टकट वापरू नका. करियरवर फोकस करा. चढ-उतार येतच राहील, पण डगमगू नका. काही निर्णय मनाविरुद्ध गेले तरी ते खेळाडूवृत्तीने घेणे गरजेचे आहे, मी अनेकदा आऊट नव्हतो. मलादेखील राग यायचा. पण आपण कुणाचे तरी हिरो आहोत हे ध्यानात असू द्या. आपल्यासारखे वागण्याचा त्यांचाही प्रयत्न असतो, त्यामुळे त्यांचे आदर्श बनायला शिकले पाहिजे.’क्रिकेटमुळे माझे आयुष्य बदलले, असे सांगून खासदार महोत्सवामुळे अनेक युवा खेळाडूंच्या करियरला वळण लाभेल, अशी अपेक्षा सचिनने व्यक्त केली. रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाच्या कामगिरीचे कौतुक करीत सचिनने दिव्यांग आणि नेत्रहीन क्रिकेटपटूंची पाठ थोपटली. डोळे बंद करुन बॅटिंग करणे किती कठीण आहे, याचे सचिनने उदाहरण सांगितले. या खेळाडूंमध्ये इतरांच्या तुलनेत कौशल्य असल्याचे सांगून सचिनने नागपूरची माणसं आणि त्यांच्या आदरातिथ्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
तो पुढे म्हणाला,‘गेल्यावर्षी याच कार्यक्रमाला मी येणार होतो. मात्र, त्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने येऊ शकलो नव्हतो. येथे आल्यानंतर खेळायचो त्यावेळचे दिवस आठवले. ऑरेंजसिटीशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. महोत्सवात पुढील १५ दिवसांत ४२ हजार खेळाडूंना ‘चियर करा’. त्यांना प्रोत्साहन देत भविष्यातील खेळाडू घडविण्याचे साक्षीदार व्हा.’    
तत्पूर्वी, सचिनचा आयोजकांकडून आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सचिनच्या हस्ते विदर्भ रणजी संघाचा आणि महाराष्ट्रअपंग आणि नेत्रहीन मुलामुलींच्या संघाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम आटोपताच तो मुंबईकडे रवाना झाला. 


Web Title: India should not be loved on sports, but playing country: Sachin Tendulkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.