मेधा खोलेंचाच देव कसा बाटला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:42 AM2017-09-09T01:42:16+5:302017-09-09T01:42:32+5:30

देव कुण्या एका धर्माची मक्तेदारी नाही. तो जसा ब्राह्मणाच्या घरात पूजला जातो तसाच दलिताच्या घरातही पूजला जातो. या देवाला नैवेद्य दाखविण्यासाठी जो स्वयंपाक केला जातो त्यासाठी सगळ्यांच्याच घरी सोेवळे पाळलेच जाते असे नाही.

How can God open the heart of God? | मेधा खोलेंचाच देव कसा बाटला?

मेधा खोलेंचाच देव कसा बाटला?

Next
ठळक मुद्देम्हणे, सोवळे नाही पाळले : नागपुरातील पुरोगामी महिलांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देव कुण्या एका धर्माची मक्तेदारी नाही. तो जसा ब्राह्मणाच्या घरात पूजला जातो तसाच दलिताच्या घरातही पूजला जातो. या देवाला नैवेद्य दाखविण्यासाठी जो स्वयंपाक केला जातो त्यासाठी सगळ्यांच्याच घरी सोेवळे पाळलेच जाते असे नाही. मग, एका विशिष्ट धर्माचे सोवळे न पाळणाºया इतरांच्या देवघरातील देव बाटत नसताना एक ब्राह्मणेतर महिलेने स्वयंपाक केल्याने डॉ. मेधा खोलेंचाच देव कसा बाटला, असा संतप्त सवाल नागपुरातील विविध क्षेत्रात कार्यरत पुरोगामी विचारांच्या महिलांनी केला आहे. हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी जात लपवल्याने सोवळे मोडले असा आरोप करीत आपल्या स्वयंपाकिणीविरुद्ध पुणे पोलिसात तक्रार केल्याने व पोलिसांनीही या तक्रारीच्या आधारे अतितत्परतेने त्या स्वयंपाकिणीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या कृतीवर या महिला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत होत्या. मेधा खोले यांच्या या जातीय मानसिकतेविरुद्ध राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. ज्यांच्या डोक्यात एवढी घाण साठलीय, त्या हवामान खात्यात काय संशोधन करीत असतील, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर लोकमतने शहरातील पुरोगामी महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी या मानसिकतेची किळस येते, अशा शब्दात या कृतीचा निषेध नोंदवला. स्वयंपाकासाठी किरणा घेताना, भाजीपाला घेताना त्यांनी कधी सोवळे बघितले का, पुण्यात राहून खोलेंना सावित्रीबाई फुले कशा आठवल्या नाहीत, आता अशा लोकांची वेगळ्या ग्रहावरच राहण्याची सोय करावी लागेल. शेकडो धर्म, जाती, पंथ असलेल्या या देशात आजही सोवळे मानणाºयांचा निषेधच केला पाहिले, असे खडे बोलही या महिलांनी सुनावले.

आपण २१ व्या आणि पुरोगामी शतकात जगत आहोत. प्रगत तंत्रज्ञानाच्या या काळात सोवळे, जात-पात ही संकल्पनाच मुळात कालबाह्य झाली आहे. मला तर ही विचारसरणीच मान्य नाही. एखाद्याला सोवळ्याचे इतके आकर्षण असेल तर त्याने स्वत: स्वयंपाक करावा. त्यासाठी दुसरी बाई शोधण्याची गरज काय? खरे तर सोवळे वगैरे हा सर्व प्रकार फारच खासगी आहे. त्याचे असे अवडंबर माजवण्यात काहीच अर्थ नाही.
मीरा खडक्कार, सेवानिवृत्त प्रधान न्यायधीश, कुटुंब न्यायालय
ही पेशवाई आहे का?
अरे, हे काय चालले आहे? माणसाला जात पाहून वागवायला आजही पेशवाई कायम आहे का? खोले बार्इंना त्या महिलेची जात माहीत नसताना त्यांनी तिच्या हातचे जेवण कसे गुमान खाल्ले? जात कळताच त्यांचे सोवळे कसे भंग झाले? या सोवळ्याओवळ्याच्या कल्पना खोट्या पावित्र्याच्या भावनेतून जन्माला आल्या आहेत. याला कुठलाही तर्क नाही. त्यांचे पोलिसात जाणे हीच मुळात निंदनीय घटना आहे. त्यातही पोलिसांनी अशा सोवळे मोडल्याच्या तक्रारीवरून त्या स्वयंपाकी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असेल तर त्या पोलिसांचा मेंदू आधी तपासून पाहिला पाहिजे.
डॉ. रूपा कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका

जात संपेपर्यंत असेच घडत राहणार
जोपर्यंत आपल्या देशातून जात ही संकल्पनाच हद्दपार होत नाही तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार. त्यामुळे आधी जात कशी संपेल, याकडे लक्ष द्यायला हवे. जिने आपली जात लपवली तिला कामाची गरज असेल. पण, तिनेही खोटे बोलायला नको होते आणि पोलिसांसारख्या सरकारी विभागानेही अशा चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणे योग्य नाही.
डॉ. वैशाली खंडाईत
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल केला?
रोजगार मिळावा म्हणून कुणी जात लपवली असेल तर हा काही गुन्हा नाही. या देशात इतके मोठे-मोठे गुन्हे घडतात. त्याचा तपास कधीच वेळेत होत नाही. या प्रकरणात पोलिसांनी इतकी तत्परता कशी दाखवली प्रश्नच आहे. त्यातही त्यांनी कोणत्या कलमाखाली त्या स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केला, याचा तपास झाला पाहिजे. या काळात अशा तक्रारीच कालसंगत नाहीत. डॉ. मेधा खोले यांच्यासारख्या सुशिक्षित महिलेकडून अशा प्रकारची कृती अजिबात अपेक्षित नाही.
अ‍ॅड. तेजस्वीनी खाडे,
अध्यक्ष, कुटुंब न्यायालय वकील संघटना.

- तर खोलेंच्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही
जे लोक सोवळे पाळतात त्यांच्याकडे तर मी जेवायलाच जात नाही. सोवळ्याचे हे अवडंबर आता थांबले पाहिजे. उच्चशिक्षित लोकही असा सोवळ्यासाठी आग्रह धरत असतील तर हे फारच धक्कादायक आहे. डॉ. मेधा खोले या वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित आहेत, स्वत: संशोधिका आहेत. असे असताना त्या सोवळे पाळले नाही म्हणून पोलिसात तक्रार करत असतील तर त्यांच्या शिक्षणाला काहीच अर्थ उरत नाही.
अ‍ॅड. पद्मा चांदेकर,
अध्यक्ष, विदर्भ लेडीबार असोशिएशन.

सोवळं हे कुठल्याही जातीशी निगडित नाही
सोवळं म्हणजे शुचिता आणि पावित्र्य. शुचितेला आपण स्वच्छता म्हणतो. सोवळं हे पावित्र्याशी निगडित आहे. तो एक नियम आहे. तो कसा पाळावा हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. हा घटनेने दिलेला अधिकार आहे. प्रत्येक धर्मात, जातीत काही नियम आहेत. त्या नियमाने पूजा झाली पाहिजे, अन्न शिजले पाहिजे. असे नियम म्हणजेच सोवळं. परंतु हे कुठल्याही जातीशी निगडित नाही. सोवळ्याचा स्वयंपाक विशिष्ट जातीने करावा, असाही काही नियम नाही. आपण बाह्य वातावरणात फिरतो, वातावरणातील जीवजंतू आपल्या अंगाखांद्यावर, हातापायावर बसतात. आपल्याबरोबर ते आपल्या घरात,स्वयंपाकात येतात, अन्नात पोहचतात. आपल्या शरीरात जीवजंतूचा प्रवेश टाळण्यासाठी सोवळं आहे. त्याचा जातीशी संबंध नाही. पावित्र्य हे जातीवर आधारित असते तर संत रविदास महाराज, नामदेव महाराज हे एका विशिष्ट पातळीवर पोहचलेच नसते.
श्रीकांत गोडबोले,
धर्म व संत साहित्याचे अभ्यासक

तक्रारीचा अट्टहास कशासाठी?
कुणी जात लपवली म्हणून तो काही गुन्हा ठरत नाही. हे मेधा खोले यांनाही चांगले माहीत असावे. असे असतानाही त्यांनी पोलिसांकडे हट्ट धरून त्या स्वयंपाकी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला, हे योग्य नाही. देशात आधीच जातीपातीच्या कारणावरून सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. अशा स्थितीत आजच्या आधुनिक युगात कुणी असे जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना कवटाळून बसत असेल तर याहून मोठे आश्चर्य नाही.
प्रा. रश्मी पारस्कर,
सामाजिक कार्यकर्त्या
जात विचारलीच कशाला?
सकाळी दैनिकात हा प्रकार वाचला तेव्हापासून मी अस्वस्थ आहे. त्या खोले मॅडम म्हणतात, स्वयंपाकी बार्इंनी आमचे सोवळे नासवले. मला खोले मॅडमला विचारायचे आहे की त्यांनी त्या बाईला जात विचारलीच कशाला? इतकी वैज्ञानिक बाई जातपात बघतेच कशी? जात विचारली या गुन्ह्याखाली आधी खोलेंनाच अटक करायला हवी. पुण्यासारख्या पुरोगामी शहरात असा मूर्खपणा कसा खपवून घेतला जातो, हा तर एका स्त्रीने स्त्रीचाच केलेला छळ आहे.
सीमा साखरे,
ज्येष्ठ समाजसेविका
हा तर संविधानाचा अपमान
भारतीय राज्यघटनेने माणूस म्हणून सर्वांना एका सूत्रात गुंफले आहे. येथे जातपात हा विषयच गौण आहे. अशा स्थितीत मेधा खोलेंसारखी उच्चशिक्षित महिला एखाद्या महिलेवर जात लपवल्याचा आरोप करीत असेल तर तिचा चौफेर निषेधच व्हायला पाहिजे. महाराष्ट्र ही सुधारणावादी विचारवंतांची भूमी आहे. या भूमीत असा प्रकार घडणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे. पुन्हा कुणी असे धाडस करू नये, यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजे.
डॉ. जुल्फी शेख,
माजी प्राचार्य व संत साहित्याच्या अभ्यासिका

खोलेंवरच गुन्हा दाखल व्हायला हवा
एखादी महिला आपली जात लपवून काम मागत असेल तर निश्चितच तिला कामाची नितांत गरज असली पाहिजे. अशा महिलेकडे खरे तर मानवीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ती ब्राह्मण नाही म्हणून आमचे सोवळे मोडले, असा कांगावा करून जर मेधा खोले या पोलिसात जात असतील तर हे चुकीचे आहे. सोवळ्याचा अर्थ स्वच्छता होतो. ते कुणीही पाळू शकते. त्यासाठी कुणी विशिष्ट जातीचा असणे गरजेचे नाही. खोले मॅडम जर असा हट्ट धरत असतील तर त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल व्हायला हवा.
- माधुरी साकुळकर
अध्यक्ष, भारतीय स्त्रीशक्ती (महाराष्ट्र)

Web Title: How can God open the heart of God?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.