Hot puffs, legumes and tatter flavors; Organizing of pigeon peas during the month of Poush | गरमागरम पानगे, वांग्याची भाजी आणि घट्ट वरणाचा आस्वाद; पौष महिन्यानिमित्त वर्ध्यात वनभोजनाचे आयोजन

ठळक मुद्देनाचणगाव परिसरात सुरू आहे वनभोजनाची परंपरा

आॅनलाईन लोकमत
श्रेया केणे
वर्धा: थंडीला सुरूवात होताच वर्धा जिल्ह्यात वनभोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात होते. यात शेतात शेणाच्या गोवऱ्यांवर कणकेचे गोळे खरपूस भाजून घेतले जातात. त्यांना स्थानिक भाषेत पानगे असेही म्हटले जाते. या गरमागरम पानग्यांसोबत वांग्याची भाजी आणि घट्ट वरण तसेच सोबतीला पातीचा कांदा असा फक्कड बेत असतो. सुटीच्या दिवशी एखाद्या शेतात जाऊन गावकरी या वनभोजनाचा आपल्या नव्या पिढ्यांसोबत आस्वाद घेताना दिसत असतात. वर्धा जिल्ह्यातल्या नाचणगाव परिसरात शेतकरी महिलांनी असाच हा पानगे बनविण्याचा कार्यक्रम घेतला. रोजच्या कामातून थोडा वेळ काढून या महिला वनभोजनात सहभागी झाल्या होत्या.
थंडीत पौष्टिक भोजन घेतले पाहिजे असे आहारशास्त्र सांगते. त्याकरिताही हे वनभोजनाचे आयोजन महत्त्वाचे ठरते. एरव्ही स्त्रियांना असे शास्त्रशुद्ध जेवण घेणे रोजच्या धकाधकीत अवघडच ठरते. निखाऱ्यांवर खरपूस भाजलेले पानगे आणि वांग्याची भाजी असा मेनू असल्यावर दुसऱ्या कुठल्याच पक्वान्नाची गरज उरत नाही असे खवैय्यांचे मत असते.