‘त्याच्या’ साहसाने अडीच हजार लोक सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 09:26 PM2018-08-21T21:26:21+5:302018-08-21T21:29:34+5:30

केरळात पुराने थैमान घातले आहे. देशभरातून मदतीचे हात सरसावले असून केरळच्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कॅप्टन प्रशिल ढोमणे यांनी गौरवास्पद कामागिरी बजावली आहे.

'His' courage saved two and a half thousand people | ‘त्याच्या’ साहसाने अडीच हजार लोक सुरक्षित

‘त्याच्या’ साहसाने अडीच हजार लोक सुरक्षित

Next
ठळक मुद्देकेरळ रेस्क्यू आॅपरेशन: रामटेकच्या कॅप्टन प्रशिल ढोमणेंच्या नेतृत्वात पथक

दीपक गिरधर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरळात पुराने थैमान घातले आहे. देशभरातून मदतीचे हात सरसावले असून केरळच्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कॅप्टन प्रशिल ढोमणे यांनी गौरवास्पद कामागिरी बजावली आहे.
रामटेककरांचा सुपुत्र जर देशातील अशी सर्वात्तम कामगिरी बजावत असेल तर गावक ऱ्यांचा उर भरुन येणारच आणि अभिमानाने छाती देखील फुगणार. कॅप्टन प्रशिल ढोमणे यांनी सर्वांना अभिमान वाटावी अशी कामगिरी दुसऱ्यांदा करून दाखविली. सध्या प्रशिल यांचे १९ मद्रास युनिट केरळ मधील एर्नाकुलम जिल्ह्याच्या कोच्छीमध्ये रेस्क्यू आॅपरेशन करते आहे. या युनिटच्या ७५ जवानांनी कॅ.प्रशिल यांच्या नेतृत्वात तेथील अडीच हजार नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढून सुरक्षित पोहोचविले आहे. २ फेब्रुवारी २०१६ ला कॅ.प्रशिल यांच्या टीमने सियाचिनमध्ये आलेल्या हिमवादळात बर्फाखाली दबलेल्या जवानांसाठी रेस्क्यू आॅपरेशन केले होते. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
केरळमध्ये महापूर आलेला आहे. हजारो नागरिक पुरामध्ये अडकले आहे. तेथील प्रशासनाने रेस्क्यू आॅपरेशनसाठी सेनेची मदत मागविली होती. एर्नाकुलम जिल्हा कॅ.प्रशिल ढोमणे यांच्या १९ मद्रास या युनिटला सोपविण्यात आला. या युनिटमध्ये ७५ जवानांचा समावेश आहे.
गेल्या आठवडाभरात कॅ. प्रशिल यांच्या नेतृत्वात कोच्छी,अलुवा आणि परिसरातील गावांमध्ये रेस्क्यू आॅपरेशन करण्यात आले. या गावांमध्ये इडिकू धरणाचे पाणी सोडल्याने महापूर आला. १९६२ नंतर पहिल्यांदाच इडिकू धरणाचे गेट उघडण्यात आले होते. या आॅपरेशनमध्ये अडीच हजार नागरिकांना सुरक्षित पोहोचविण्यात या टीमला यश आले.अक्षरश: रात्रंदिवस या टीमने जीवाची बाजी लावत या आॅपरेशनला यशस्वीपणे पार पाडले. यामध्ये दोनवेळा कॅ.प्रशिल यांच्याच जीवावर बेतले होते. यासंबंधात त्यांचे वडील प्रवीण ढोमणे आणि आई शिल्पा ढोमणे यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी प्रशिलच्या रेस्क्यू आॅपरेशनच्या अंगावर काटा येणाऱ्या साहसी घटना सांगितल्या. या परिसरात आॅपरेशन दरम्यान तीन म्हाताऱ्या आणि तीन बाळंतिणींना सुरक्षित ठिकाणी बोटचा वापर करुन पोहोचविण्यात आले. एका घटनेमध्ये गरोदर असणाऱ्या एका महिलेला पूर्ण दिवस झाल्याने ती कधीही बाळंत होऊ शकते अशा अवस्थेत छातीभर पाण्यातून खाटेवर टाकून जवानांनी दवाखान्यात पोहोचविले. दवाखान्यात पोहोचताच ती महिला बाळंत झाली व तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या महिलेच्या नातेवाईकांनी डोळ्यात अश्रू आणून थँक्यू म्हटले आणि सॅल्युटही केला.
दोनवेळा जीवावर बेतले-रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान या जवानांना दोन दिवस जेवण मिळाले नाही,उपाशी राहूनच त्यांचे आॅपरेशन सुरू होते. एका ठिकाणी छातीभर पाण्यात त्यांना नारळ वाहत जाताना दिसले, ते नारळ जवानांनी भिंतीवर फोडून खाल्ले आणि आपली भूक काहीअंशी शमविली. एका ठिकाणी रोप आॅपरेशन सुरू असताना कॅ.प्रशिल यांचा पाय घसरला, परंतु दुसऱ्या जवानाने सावरल्याने प्रशिल वाचले. दुसऱ्या एका घटनेत रोपच्या साह्याने पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक एका जवानाने आवाज दिला, सर जैसे है वैसे ही खडे रहो, हिलो मत. कारण त्याच रोपवरून प्रशिलपासून अगदी थोड्या अंतरावर एक साप आपला जीव वाचवत पुढे येत होता. या जवानांनी त्याला कसेतरी करून रोपवरून खाली पाडले, परंतु तरीही तो प्रशिलच्या दिशेनेच येऊ लागला. अखेर सर्वांनी मिळून त्या सापाला कसेतरी करून दुर पिटाळले आणि सुटकेचा श्वास सोडला.
कॅ. प्रशिल यांचा फोन नंबर एव्हाना त्या परिसरात व्हायरल झाला होता. एक दिवस रेस्क्यू टीमला नेमके कोठे जायचे याच्या सूचना न मिळाल्याने त्यांना कॅम्पवरच राहावे लागले. यादरम्यान प्रशिल यांना पुरात अडकलेल्या लोकांचे दोनशे ते अडीचशे कॉल आले, ते त्याने अटेंडदेखील केले. प्रत्येकांना जीव वाचविण्यासाठी काय करावे याच्या टीप्स दिल्या. आमची रेस्क्यू टीम दिसल्यास टॉर्च दाखवा,पाणी जपून वापरा, असलेला अन्नसाठा जपून वापरा,थोडे थोडे खा,कुणाचा रेस्क्यूसाठी फोन आला तर तो उचला अशा सूचनाही त्यांनी नागरिकांना दिल्या. रेस्क्यूची मदत मिळाल्यानंतर नागरिकांनी रेस्क्यू टीमला सूचनांमुळे मॉरल सपोर्ट मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
कोण आहेत कॅप्टन प्रशिल?
रामटेक येथील गांधी वॉर्ड येथे राहणाऱ्या प्रवीण ढोमणे आणि शिल्पा ढोमणे यांचा मोठा मुलगा प्रशिल. कॉम्प्युटर इंजिनियर झालेला. मनात मात्र जिद्द होती सेनेत जायची. त्यादिशेने त्याने आपले प्रयत्न जारी ठेवले आणि २०१४ साली त्याची निवड आर्मीमध्ये लेफ्टनंटच्या कोर्ससाठी झाली. दीड वर्षे खडतर ट्रेनिंग  करून तो २०१५-१६ ला लेफ्टनंट झाला. त्यानंतर त्याला २०१६ मध्ये सियाचीन येथे पाठविण्यात आले. २ फेब्रु.२०१६ ला प्रशिल २२ हजार फूट उंचीवर सियाचीनमध्ये ड्युटीवर होता. त्यावेळी आलेल्या हिमवादळात १९ हजार फुटांवर जवानांची एक छावणी बर्फाखाली गाडल्या गेली. यावेळी प्रशिल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २२ हजार फुटांवरून खाली उतरून खडतर असे रेस्क्यू आॅपरेशन केले होते.

 

 

Web Title: 'His' courage saved two and a half thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.