महावितरणचा ग्राहक होतोय हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:23 AM2019-04-23T00:23:35+5:302019-04-23T00:24:45+5:30

ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ७५१ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला होता; हा आकडा आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुमारे ८१ लाख ७५ हजार व्यवहारांच्या माध्यमातून ११९४ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला.

Hi-tech becoming a customer of Mahavitaran | महावितरणचा ग्राहक होतोय हायटेक

महावितरणचा ग्राहक होतोय हायटेक

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांच्या संख्येत भरघोस वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ७५१ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला होता; हा आकडा आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुमारे ८१ लाख ७५ हजार व्यवहारांच्या माध्यमातून ११९४ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला.
महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी संकेतस्थळाशिवाय, महावितरण मोबाईल अ‍ॅप, पेटीएम आणि इतरहीऑनलाईन सेवांच्या माध्यमातून वीज बिलांचा भरणा करण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांची व्याप्ती आणि सहज वापर यामुळे ग्राहकांचा कल यांच्याकडे सातत्याने वाढत आहे. शहरी ग्राहकांसोबतच ग्रामीण भागातील वीज ग्राहकही या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसून येत असून, वीज बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे न राहता अवघ्या काही मिनिटांत वीज बिलांचा भरणा करता येणे शक्य झाले आहे. याशिवाय वीज बिलाचा एसएमएस येताच त्याच लिंकवरून वीज बिल भरण्याची सुविधा असल्याने वेळीच बिलांचा भरणा केल्यामुळे ग्राहकांना विलंब आकाराचा भुर्दंडही भरावा लागत नाही. याउपर अनेक ग्राहक वेळीच बिल भरणा करून बिलाच्या रकमेत मिळणारी सवलतही मिळवीत आहेत.
विदर्भातील ११ ही जिल्ह्याचा विचार करता २०१७-१८ मध्ये नागपूर शहर मंडळात ७ लाख ५७ हजार ऑनलाईन व्यवहारांतून ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा केला होता, हा आकडा २०१७-१८ मध्ये तब्बल १० लाख २७ हजारावर गेला असून, नागपूर ग्रामीण मंडलातील ७ लाख ५७ हजाराच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये १० लाख २२ हजारावर गेला आहे. याशिवाय वर्धा जिल्हातील ५ लाख १५ हजाराच्या तुलनेत ६ लाख ६७ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील २ लाख ९१ हजारांच्या तुलनेत ६ लाख ९ हजार, गोंदिया जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजाराच्या तुलनेत ६ लाख २० हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील ५ लाख ५९ हजाराच्या तुलनेत ८ लाख ९४ हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील २ लाख ५३ हजाराच्या तुलनेत ४ लाख ६९ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा केला आहे.
याचसोबत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये अमरावती जिल्ह्यातील ५ लाख ४३ हजार व्यवहार तर २०१८-१९ मध्ये ८ लाख ६९ हजार ऑनलाईन व्यवहारातून तर यवतमाळ जिल्ह्यातीला ४ लाख १० हजार व्यवहाराच्या तुलनेत ६ लाख १० हजार व्यवहारातून ग्राहकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घेत वीजबिलांचा भरणा केला आहे. अकोला जिल्ह्यातील ३ लाख ६८ हजार व्यवहाराच्या तुलनेत ६ लाख २० हजार व्यवहारातून याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील ८ लाख ७४ हजार व्यवहाराच्या तुलनेत १० लाख १० हजार व्यवहारातून तर वाशिम जिल्ह्यातील २ लाख २ हजार व्यवहारातून ग्राहकांनी २०१७-१८ मध्ये ऑनलाईन वीजबिल भरणा केला असताना २०१८-१९ मध्ये हा आकडा २ लाख ८५ हजार व्यवहारांपर्यंत गेला आहे. एकूणच ऑनलाईन वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांची वाढती संख्या बघता महावितरणची ही सेवा दिवसेंदिवस अधिकाधिक लोकाभिमुख होत असल्याचे दिसून येत असून ग्राहकांनी या सेवांचा जास्तीतजास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

 

Web Title: Hi-tech becoming a customer of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.