'तो' तब्बल ३० वर्षांनंतर झोपला अन् आईने पेढेच वाटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:25 AM2018-10-23T10:25:34+5:302018-10-23T10:57:27+5:30

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने दीपकवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केली. त्याला नवे जीवन, नवी ओळख दिली. मुलाला पहिल्यांदाच निवांत झोपलेले पाहत त्याच्या आईने अख्य्खा हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले.

He was not asleep for 30 years ... | 'तो' तब्बल ३० वर्षांनंतर झोपला अन् आईने पेढेच वाटले!

'तो' तब्बल ३० वर्षांनंतर झोपला अन् आईने पेढेच वाटले!

Next
ठळक मुद्देडेंटल हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया युवकाला मिळाले नवे जीवन

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीपकच्या जबड्याचा विकासच झाला नसल्याने त्या मागून गेलेली श्वासनलिका दबल्या गेली होती. श्वास घेणे अडचणीचे जात होते. तो झोपला की जबडा मागे सरकायचा आणि तासाभरातच श्वास कोंडून उठून बसावे लागायचे. तब्बल ३० वर्षे तो निवांत झोपलाच नव्हता. या आजारावरील उपचारासाठी काही खासगी हॉस्पिटलने नाकारले होते. परंतु शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने दीपकवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केली. त्याला नवे जीवन, नवी ओळख दिली. याचा सर्वाधिक आनंद त्याच्या आईला झाला. मुलाला पहिल्यांदाच निवांत झोपलेले पाहत तिने अख्य्खा हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले.
दीपक मिसेकर (३१) रा. विश्वकर्मानगर असे त्या युवकाचे नाव. दीपकला जन्मजात ‘ट्रॅचर कॉलिन्स सिंड्रोम’ हा आजार होता. या आजारात वरच्या आणि खालच्या दोन्ही जबड्याचा व गालाच्या हाडाचा विकास होत नाही. यामुळे जबडे मागे आणि डोळे खाली ओढलेले दिसतात. जबड्याचा विकास न झाल्याने त्यामागून गेलेली श्वासनलिका दबल्या गेली होती. दीपक अंथरुणावर झोपला की तासाभरात त्याचा श्वास कोंडायचा. त्याला उठून बसावे लागायचे. दिवसा खुर्चीवर बसला की लगेच पेंगायचा. जोरजोरात घोरायचा. त्याला ‘अ‍ॅडव्हान्स स्लीप अ‍ॅपनिया’ही (निद्रानाश) झाला होता. श्वासनलिका अरुंद झाल्याने मेंदूला आॅक्सिजनचा कमी पुरवठा व्हायचा. जेवण गिळतानाही त्रास व्हायचा. कानाने कमी ऐकू यायचे. विद्रूप चेहरा आणि झोपेच्या समस्येने तो त्रासून गेला होता. दीपकला वडील नाही. सीताबर्डीत चहाची टपरी चालवून त्याची आई कसेतरी घर चालविते. मुलाच्या या आजाराने तिचेही जगणे कठीण झाले होते. उपचारासाठी तिने अनेक खासगी डॉक्टरांना दाखविले. परंतु काहींनी दहा लाखांचा खर्च व जीविताचा धोका तर काहींनी चक्क नकार दिला होता. तिला कोणीतरी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल हॉस्पिटल) जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात मुख शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर व दंत व्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसुंधरा भड यांंना दाखविल्यावर, त्यांनी उपचाराची हमी देत, दीपकला नवे जीवन दिले.

अशी झाली शस्त्रक्रिया
दीपकची दबलेली श्वासनलिका मोकळी करण्यासाठी ‘आॅर्थोग्नॅथिक’ शस्त्रक्रियेद्वारे जबडा समोर आणला जाणार होता. परंतु त्यासाठी जागा तयार करायची होती. यासाठी दीपकचे समोर आलेले दात सरळ करण्यात आले. दोन्ही जबडे मागून कापून तिथे प्लेट बसविण्यात आली. यामुळे साधारण आठ मिलीमीटर जबडा समोर आला. श्वासनलिकेवरील दाब कमी झाला. हनुवटी १० मिलीमीटर समोर आल्याने चेहऱ्याची ठेवण बदलली. एक नवा चेहराही मिळाला.

५० हजारात एक रुग्ण
डॉ. भड म्हणाल्या, साधारण ५० हजारात या आजाराचा एक रुग्ण आढळतो. हा आनुवंशिक आजार आहे. या आजारासोबत जगणे फार कठीण असते. डॉ. दातारकर म्हणाले, ही एक दुर्मिळ व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. या यशस्वी शस्त्रक्रियेने दीपकला नवीन जीवन मिळाल्याचे समाधान आहे.

रुग्णालय वेगळी ओळख निर्माण करते
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय केवळ दाताच्या आजारापुरतेच मर्यादित नाही तर मुखाच्या आजारावरही उपचार करते. गेल्या काही वर्षात या सारख्या अनेक शस्त्रक्रिया होऊ घातल्या आहेत. हे रुग्णालय आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे.
-डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
 

Web Title: He was not asleep for 30 years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य