सुखी आयुष्य नाकारून पत्करली कठोर साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:59 AM2017-10-18T00:59:17+5:302017-10-18T01:00:36+5:30

श्रीकांत व प्रशांत दोेघेही तसे अभियंते. पण, उंचच उंच मशीन्सच्या खडखडाटापेक्षा तालवाद्यांचा हळवा नाद त्यांना सारखा खुुणावत असायचा.

The harsh practice of rejecting a happy life | सुखी आयुष्य नाकारून पत्करली कठोर साधना

सुखी आयुष्य नाकारून पत्करली कठोर साधना

googlenewsNext
ठळक मुद्देविविध तालवाद्यांवर प्रभुत्व : ध्येयवेड्या श्रीकांत व प्रशांतचा सुरेल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीकांत व प्रशांत दोेघेही तसे अभियंते. पण, उंचच उंच मशीन्सच्या खडखडाटापेक्षा तालवाद्यांचा हळवा नाद त्यांना सारखा खुुणावत असायचा. सुखवस्तू भविष्य नाकारून बिनभरोशाचे संगीत स्वीकारायचे का? प्रश्न खरंच कठीण होता. अखेर एक दिवस निर्णय झाला. सर्वांगात रुणझुणणाºया संगीताचा नाद बक्कळ पैशांंच्या आकर्षणावर भारी पडला आणि श्रीकांत सूर्यवंशी, प्रशांत मिसार यांनी स्वयंप्रेरणेणे विविध तालवाद्यांवर प्रभुत्व मिळवून संगीत क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्रीकांत आणि प्रशांत यांच्यामध्ये वयाची तफावत सोडली तर इतर बाबतीत कमालीची समानता आहे. दोघेही अभियंता आणि संगीत क्षेत्राची आवड निर्माण होण्यामागे वडील हीच त्यांची प्रेरणा. श्रीकांत यांनी संगीतासाठी सुरू असलेली नोकरी सोडली तर प्रशांतने इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला शिक्षणावर पाणी सोडले. घरच्यांची नाराजी पत्करली, खस्ता खाल्ल्या. प्रवास खडतर आहे याची जाणीव असूनही आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्थान निर्माण करायचे ही एकच जिद्द त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरली.

देश-विदेशात साडेचार हजार कार्यक्रम
शास्त्रीनगर निवासी श्रीकांत सूर्यवंशी संगीत शिक्षक म्हणून ओळखले जातात. श्रीकांतचे वडील संतोष सूर्यवंशीही संगीत शिक्षक होते. भजनांच्या कार्यक्रमासाठी ते अनेक ठिकाणी जात असताना श्रीकांतही त्यांच्यासोबत जायचे. यातूनच तबला वादन शिकण्याची आवड निर्माण झाली. बारावीनंतर मायनिंग इंजिनिअरिंग झाल्यावर वेकोलिमध्ये नोकरी मिळाली. मात्र नोकरीत मन रमत नव्हते. वर्षभरातच त्यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि परत संगीत साधनेसाठी नागपूरचा रस्ता धरला. या काळात त्यांनी पं. प्रभाकर धाकडे, अरविंद उपाध्याय यांच्यासमवेत अनेक मान्यवरांकडे संगीताचे धडे घेतले. गायनासह व्हायोलीन, हार्मोनियम, किबोर्ड, ढोलक, जॅम्बे आणि आता बासरी अशा अनेक वाद्ययंत्रावर प्रभुत्व मिळवले. या काळात भारतासह बँकाक, दुबई, इस्रायल आदी देशात त्यांनी सादरीकरण केले. ४५०० च्या जवळपास कार्यक्रम झाले. सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे, स्वप्नील बांदोडकर, राहुल सक्सेना, सचिन पिळगावकर अशा नामवंत कलाकारांसोबत त्यांची मंच गाजवला.
इंजिनियर नाही, साऊंड इंजिनियर
श्रीकांत यांच्याप्रमाणे प्रशांतही अभियांत्रिकीचा विद्यार्थी. प्रशांतचे आईवडील दोघेही शिक्षक. वडील तेजराम मिसार यांची नाटकात पायपेटी वादक म्हणून ओळख होती. प्रशांतही त्यांच्यासोबत नाटक बघायला जायचा व तेव्हापासूनच मनात पायपेटी व तबला शिकण्याची आवड निर्माण झाली. त्याने ती शिकून घेतली. बारावीनंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मात्र मनात काही वेगळेच सुरू होते. अखेर अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात शिक्षणावर पाणी सोडले. शहरातील संगीत कार्यक्रमात जाऊन संगीतकारांना वाद्य शिकवण्यासाठी विनंती करायला लागला. अनेकांनी नकार दिला. मात्र कुणी एखादे वाद्य दिलेच तर त्या संधीचे सोने करायचे एवढे त्याला ठाऊक. अशाप्रकारे तो पायपेटी व किबोर्ड शिकला. याच काळात त्याची श्रीकांत सूर्यवंशी यांच्याशी ओळख झाली आणि पुढे दोघांनीही मागे वळून पाहिले नाही. तबला, हार्मोनियम, माऊथ आॅर्गन अशा वाद्यावर जम बसविला. त्याला पुणे, मुंबईसह राज्यभरात अनेक कार्यक्रमात संधी मिळाली. एवढेच नाही तर शंकर महादेवन, आघाडीचे संगीतकार विशाल शेखर, कनिका कपूर, रितू पाठक, राहुल सक्सेना आदी नामवंत कलाकारांसोबत काम करता आले. एक साऊंड इंजिनियर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. प्रशांतने आतापर्यंत तीन नाटकांचे संगीत आणि गाणी कम्पोज केली असून मराठी गीतांचा स्वत:चा एक अल्बम येऊ घातला आहे.

Web Title: The harsh practice of rejecting a happy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.