नागपूर जिल्ह्यातील ३०१ गावांमध्ये पीकनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:59 PM2019-04-26T22:59:24+5:302019-04-26T23:08:23+5:30

सरासरीच्या तुलनेत केवळ ४० दिवसांत ९४ टक्के पाऊस पडूनही भाताच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. कापूस, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात खरीप हंगामात वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच शेतकरी शेतीशाळेच्या माध्यमातून ३०१ गावांत पीकनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

Guidance for crop farmers in 301 villages of Nagpur district: Ashwin Mudgal | नागपूर जिल्ह्यातील ३०१ गावांमध्ये पीकनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन : अश्विन मुदगल

खरीप हंगामाचा आढावा घेतांना जिल्हाधिकरी अश्विन मुदगल. सोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पंचभाई, अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे

Next
ठळक मुद्देजिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावाखरीप कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजनसोयाबीन क्षेत्रात वाढ, २० टक्के बीबीएफ लागवडपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरासरीच्या तुलनेत केवळ ४० दिवसांत ९४ टक्के पाऊस पडूनही भाताच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. कापूस, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात खरीप हंगामात वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच शेतकरी शेतीशाळेच्या माध्यमातून ३०१ गावांत पीकनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
बचत भवन सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व पीकनिहाय आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पंचभाई, अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, कृषी उपसंचालक डी. एस. कसरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्वसाधारण खरीप हंगामाध्ये ४ लक्ष ७९ हजार २१० हेक्टर क्षेत्र असून सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकासह इतर पिके जिल्ह्यात घेतली जातात. मागील वर्षीच्या तुलनेत कापसाखाली २२ हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १० हजार हेक्टर, भाताखाली ९४ हजार २०० हेक्टर, तुरीखाली ६ हजार ५०० हेक्टर आदी पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात येत असून पीक पद्धतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज पुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावा, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, जिल्ह्याला खरीप हंगामात ९ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून आतापर्यंत २० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांमार्फत वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करावा, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा पुरवठा सुलभपणे होईल यादृष्टीने नियोजन करताना निकृष्ट प्रतीचे बियाणे कृषी केंद्रांमार्फत विकल्या जाणार नाहीत. याची खबरदारी घेण्यासाठी भरारी पथके तयार करावीत व या पथकांच्या माध्यमातून या केंद्रांची तपासणी करावी, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात ५ हजार ६३ क्विंटल कापूस, ३ हजार १२० क्विंटल तूर, ६३ हजार ४५० क्विंटल सोयाबीन व २१ हजार १५० क्विंटल भात या बियाण्यांची मागणी असून त्याप्रमाणे महाबीज व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.
पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक बदल करुन कमी कालावधीच्या धानाचे वाण लागवड करण्याबाबत २१३ गावात शेतकऱ्यांना नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सोयाबीन पिकामध्ये २० टक्के क्षेत्रात बीबीएफ पद्धतीने लागवड तसेच भात पिकाच्या १० टक्के पिकावर पट्टा पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. कापूस पिकामध्ये ५० टक्के क्षेत्रावर सरी वरंभा पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामूहिक शेततळे, संरक्षित शेती, पाली हाऊस, शेडनेट गृह, प्लास्टिक मल्चिंग, यांत्रिकीकरण, पॅक हाऊस आदी एकात्मिक फलोत्पादन विभाग कार्यक्रमासाठी ७ हजार ४६५ अर्ज शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. तसेच कृषी सहायकांच्या क्षेत्रावर प्रत्येकी १० हेक्टरप्रमाणे कडबा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
१ लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचन
जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा १०७ प्रकल्पांमधून मागील वर्षी १ लाख ८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या होत्या. परंतु यावर्षी पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्यामुळे ८६ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १२ हजार विहिरींच्या माध्यमातून पूरक सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे.
१०० टक्के शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका
शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्यात येत असून त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४४८ जमीन मृद पत्रिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७१३ गावातील ३८ हजार ८४६ मृद नमुने तपासण्यात आली आहेत. यावर्षी १ हजार १८६ गावांतील ३९ हजार मृद पत्रिकांच्या वितरणाचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.

 

Web Title: Guidance for crop farmers in 301 villages of Nagpur district: Ashwin Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.