सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची ‘ग्रीनडिस्पो’ने लावणार विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:34 PM2019-05-20T12:34:20+5:302019-05-20T12:39:18+5:30

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने ‘ग्रीनडिस्पो’ ही पर्यावरणीय आणि ऊर्जा कार्यक्षम विद्युत सॅनिटरी पॅड भट्टी तयार केली आहे.

'Green Dispos' will be disposed of sanitary napkins' waste | सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची ‘ग्रीनडिस्पो’ने लावणार विल्हेवाट

सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची ‘ग्रीनडिस्पो’ने लावणार विल्हेवाट

Next
ठळक मुद्देनीरी व इतर संस्थांनी बनविली इलेक्ट्रॉनिक्स भट्टी ।एका तासात ३०-६० पॅडचे प्रदूषणमुक्त डिस्पोजल

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतात दर महिन्याला एक अब्ज सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा बाहेर निघतो. मात्र या धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत असलेले अज्ञान तेवढेच उदासीन करणारे आहे. खरं तर या कचऱ्याचा बायोमेडिकल (जैविक) कचऱ्यात समावेश होतो. पण त्याची विल्हेवाट सामान्य कचऱ्याप्रमाणे केली जाते आणि यातून पर्यावरण आणि आरोग्याचेही धोके निर्माण झाले आहेत. यावर वर्षभराच्या परिश्रमानंतर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने ‘ग्रीनडिस्पो’ ही पर्यावरणीय आणि ऊर्जा कार्यक्षम विद्युत सॅनिटरी पॅड भट्टी तयार केली आहे. ही भट्टी किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त असल्याचा दावा नीरीच्या संशोधकांनी केला आहे. स्त्रियांचे अंदाजे ३२ प्रजोत्पादन वर्ष गृहित धरले जातात व या विशिष्ट वेळी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना ८ ते १२ नॅपकिन्सची आवश्यकता असते. म्हणजे एक स्त्री आपल्या संपूर्ण आयुष्यात सरासरी ४,५०० नॅपकिन्सचा उपयोग करते. सीएसई मॅगझिनच्या २०१३ च्या अंदाजानुसार जगात दरमाहा ४३२ दशलक्ष नॅपकिन्सचा उपयोग होतो.
या आकडेवारीनुसार भारतात महिन्याला अंदाजे १ अब्ज व वर्षाला अंदाजे १२ अब्ज नॅपकिन्सचा उपयोग होतो. मासिक पाळीदरम्यान आरोग्यदायी नॅपकिन्सच्या वापराबाबत वाढलेली ही जागृती खरं तर चांगले संकेत आहेत. पण या नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याबाबत कमालिची उदासीनता दिसून येते. हा जैविक कचरा असल्याने त्यानुसार त्याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक आहे.
मात्र अगदी सामान्य कचऱ्याप्रमाणे त्याची विल्हेवाट करण्यात येते. मैदाने किंवा घराच्या छतावर फेकणे, पेपर किंवा प्लास्टिक बॅगमध्ये लपवून बाहेर फेकणे किंवा घरातील कचराकुंडीतच टाकणे, गाडून देणे, शौचालयात फेकणे किंवा जाळण्याचा प्रयत्न केला जातो. शहरी व ग्रामीण भागात उपलब्ध व्यवस्थेनुसार अशाप्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते.
मात्र असे प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे. या कचऱ्यावर जीवाणू जमा होणे, कुत्री किंवा इतर जनावरांच्या पोटात जात असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात; शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा कचरा घातकच ठरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कचरा निघत असल्याने आरोग्य व संशोधन संस्थांसाठीही ते एक आव्हान ठरले होते. यापूर्वी सॅनिटरी नॅपकिन्सच्या व्यवस्थापनासाठी काही उपाय सुचविण्यात आले व काही दहन भट्ट्याही तयार करण्यात आल्या. मात्र संपूर्ण ज्वलनासाठी लागणारे तापमान निर्माण करणे व नियंत्रित करण्यात समस्या येत असल्याने, हे पॅड अर्धवट जळण्याची व प्रदूषित धूर निघण्याची समस्या निर्माण झाली. या पॅडमधील सेल्यूलोज व पॉलिमेरिक पदार्थ धोकादायक तर आहेतच.
त्याशिवाय धुरामधून निघणारे डायआॅक्सिन व सिरॉन हे रासायनिक कॅन्सर आजाराला कारणीभूत ठरणारे आहेत. त्यामुळे अशा भट्ट्यांबाबत अनेक तक्रारीही येऊ लागल्या. यावर उपाय शोधण्याचे आव्हान मागील वर्षी नीरीने स्वीकारले.
नीरीसह हैदराबादच्या इंटरनॅशनल अ‍ॅडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पाऊडर मेटलर्जी अ‍ॅन्ड न्यू मटेरियल्स (एआरसीई) तसेच सोब्बाल एरोथेरॅमिक्सच्या संयुक्त विद्यमाने वर्षभराच्या संशोधन व यशस्वी प्रयोगानंतर ‘ग्रीनडिस्पो’ या आधुनिक विद्युत भट्टीची निर्मिती करण्यात आली आहे. संस्थांनी त्याचे पेटंटही घेतले आहे.
नीरीचे संशोधक डॉ. नितीन लाभशेटवार यांनी या भट्टीची विशेषता सांगितली. हे सुधारित दहन चेंबर आणि पॅडधारक आहे तसेच इंधनाचे अनुकूल प्रमाण कायम राखले जाते. सॅनिटरी नॅपकिन्सच्या ज्वलनाला आवश्यक ८०० डिग्रीपेक्षा अधिक तापमान प्राथमिक दहन चेंबरमध्ये निर्माण करून पॅडमधील उच्च सेल्यूलोज पदार्थ जाळून निर्जंतूक करतो. पॉलिमेरिक व क्लोरिनयुक्त रासायनिक पदार्थांच्या प्रदूषणमुक्त ज्वलनासाठी त्यात सुधारणा करून माध्यमिक चेंबरमध्ये १००० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान वाढ करून ते नियंत्रित करण्याची क्षमता यात आहे. धूर न निघता ज्वलनाचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि निघणाºया थोड्याशा धुरासाठी चिमणीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भट्टी चेंबरमध्ये ५ ते १५ पॅड टाकून १५ मिनिटात दहन करणे, म्हणजे तासाला ३० ते ६० पॅड दहन करण्याची क्षमता ग्रीनडिस्पोमध्ये आहे. कमी ऊर्जा वापर व अधिक तापमान वाढीवर या यंत्रात भर दिला आहे. विविध चाचण्या करून हा प्रयोग यशस्वी करण्यात आला.

नीरीमध्ये याबाबत संपूर्ण माहिती आहे. मोठी व्यावसायिक व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि मुलींची वसतिगृहे यांनी पुढाकार घेऊन ग्रीनडिस्पो लावावा, असा आमचा आग्रह आहे. शिवाय कचरा विल्हेवाट केंद्र व विविध चौकात, बसस्थानक, रेल्वेस्टेशन व विमानतळावर शक्य असेल तिथे ही यंत्रे फिट करण्याचे आवाहन महापालिका पदाधिकाऱ्यांना केले आहे. शासनानेही ग्रीनडिस्पोच्या प्रोत्साहनासाठी पुढाकार घ्यावा, अशी आमची भावना आहे.
- डॉ. नितीन लाभशेटवार, मुख्य संशोधक, नीरी

Web Title: 'Green Dispos' will be disposed of sanitary napkins' waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.