Good news! Nagpur city free from open toileting | खूशखबर! उपराजधानी झाली ‘हागणदारीमुक्त’; महापालिकेत आनंदाचे वातावरण

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने जाहीर केली यादी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील ३८ शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया,चांदूर रेल्वे, सावनेर आदी शहरांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या पथकाने जुले २०१७ मध्ये नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केले होते. त्यानंतर महापालिकेतर्फे शहरातील ८० ठिकाणे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. याची माहिती केंद्र सरकारला देऊ न पथकामार्फत नागपूर शहराचा दौरा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार २८ ते ३० डिसेंबर दरम्यान केंद्र सरकारच्या एक सदस्यीय पथकाने शहरातील १०० हून अधिक भागाचा दौरा करून पाहणी केली होती.
दौऱ्यानंतर अवघ्या तीन दिवसात नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केल्याने महापालिका प्रशासन व सत्तापक्षात आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसानंतर होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणातही याचा फायदा मिळणार आहे. हागणदारी मुक्त शहराला ३५० गुण मिळतात. त्यामुळे नागपूर शहराला या वर्गात शंभर टक्के गुण मिळणार आहे. अश्विन मुद्गल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी स्वत: शहरातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांसोबत चर्चा केली.
सार्वजनिक व व्यक्तिगत शौचालय बांधण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही या संदर्भात निर्देश दिले. आरोग्य विभागाच्या पथकाला सक्रिय केले. आठ महिन्यात शहरातील संबंधित ठिकाणे निश्चित केली. सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे नागपूर शहर हागणदारीमुक्त झाले.

शहरातील जनतेचे सहकार्यासाठी आभार
हागणदारीमुक्त शहरात नागपूरचा समावेश झाला आहे ही आनंदाची बाब आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करतो. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे हे यश मिळणे शक्य नव्हते. स्वच्छता सर्वेक्षणात याचा फायदा होणार आहे. यामुळे ३५० गुण मिळतील. शहरातील नागरिक स्वच्छतेविषयी जागरूक आहेत. कें द्रीय पथक नागपूर दौऱ्यावर येणार असल्याबाबत आॅनलाईन माहिती मिळाली होती.या पथकाने १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. १७०० जियोटेक फोटो काढले. नागरिकांसोबत चर्चा करतानाचे व्हिडिओ अपलोड केले होेते.
- अश्विन मुद्गल, आयुक्त महापालिका

१०० ठिकाणांची केली पाहणी
नागपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने शहरातील १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. यात स्लम, निवासी, व्यावसायिक,शैक्षणिक, रेल्वे परिसर आदींचा समावेश होता. या पथकाला केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने पाठविले होते.


Web Title: Good news! Nagpur city free from open toileting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.