चूक दुरुस्तीसाठी ‘मुंबई’ला जा! ‘यूआयडीएआय’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 09:20 PM2019-04-15T21:20:46+5:302019-04-15T21:22:32+5:30

शासनाने बहुतांश सर्वच महत्त्वाच्या बाबींसाठी आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे. या कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेत व मूळ जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा अधिक तफावत असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला मुंबई येथील विभागीय कार्यालयात जावे लागणार आहे. हा निर्णय ‘युनिक आयडेन्टीफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) अर्थात ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने घेतला असून, याबाबत सहा महिन्यांपूर्वीच तहसील कार्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात अले आहे. या निर्णयामुळे संबंधित व्यक्तींची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

Go to 'Mumbai' to correct the mistake! 'UIDAI' decision | चूक दुरुस्तीसाठी ‘मुंबई’ला जा! ‘यूआयडीएआय’चा निर्णय

चूक दुरुस्तीसाठी ‘मुंबई’ला जा! ‘यूआयडीएआय’चा निर्णय

Next
ठळक मुद्देमहत्त्वाच्या बाबींसाठी आधार कार्डची नितांत गरज

राम वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (नांद) : शासनाने बहुतांश सर्वच महत्त्वाच्या बाबींसाठी आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे. या कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेत व मूळ जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा अधिक तफावत असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला मुंबई येथील विभागीय कार्यालयात जावे लागणार आहे. हा निर्णय ‘युनिक आयडेन्टीफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) अर्थात ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने घेतला असून, याबाबत सहा महिन्यांपूर्वीच तहसील कार्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात अले आहे. या निर्णयामुळे संबंधित व्यक्तींची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून तर बँकांमध्ये खाते उघडण्यापर्यंत महत्त्वाच्या बाबींसाठी ‘आधार कार्ड क्रमांक’ अनिवार्य केला आहे. नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी शासनाने ‘युनिक आयडेन्टीफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ची निर्मितीही केली. त्यासाठी विशेष मोहीम राबवून गावोगाव शिबिराचे आयोजन केले होते. सुरुवातीच्या काळात आधार कार्ड तयार करताना काहीसे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. काही अशिक्षित नागरिकांनी त्यांची जन्मतारीख, महिना व वर्ष सांगताना गफलत केली, तर काहींनी खरी माहिती दिली.
मात्र, अनेकांच्या आधार कार्डमध्ये नमूद असलेल्या माहितीमध्ये चुका असल्याचे प्रकारही चव्हाट्यावर आले. यात सर्वाधिक घोळ जन्मतारखेत झाल्याचे दिसून आले. वास्तवात, बहुतांश चुका ‘यूआयडीएआय’अंतर्गत काम करणाऱ्यांच्या असतानाही त्याचे खापर नागरिकांच्या माथी फोडण्यात आले. पुढे त्या चुका दुरुस्त करण्याची सोय करण्यात आली. यातील काही चुका स्थानिक सेवा केंद्रात आणि काही चुका ‘यूआयडीएआय’च्या मुंबई येथील विभागीय कार्यालयात दुरुस्त करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी प्राधिकरणाने घेतला.
मूळ जन्मतारीख आणि आधार कार्डवर नमूद असलेली जन्मतारीख यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी तफावत असल्यास ती दुरुस्ती स्थानिक सेवा केंद्रात केली जाईल. तीन वर्षांपेक्षा अधिक तफावत असल्यास त्या दुरुस्तीसाठी संबंधित व्यक्तीला ‘यूआयडीएआय’च्या मुंबई येथील विभागीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. यात ग्रामीण भागातील अशिक्षित व कमी शिक्षित नागरिकांची मोठी गोची झाली आहे.
वेळ व पैसा खर्च
आधार कार्डवर जन्माचे वर्ष १९९५ नमूद असेल आणि जन्माचे मूळ वर्ष १९९२ ते १९९५ किंवा १९९५ ते १९९८ या दरम्यान असेल तर ही दुरुस्ती स्थानिक आधार कार्ड केंद्रात करता येते. मात्र, जन्माचे मूळ वर्ष १९९२ च्या आधीचे किंवा १९९८ च्या नंतरचे असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला त्यांच्या जन्मतारखेच्या सबळ पुराव्यासह यूआयडीएआय, रिजनल आॅफीस, ७ फ्लोअर, एमटीएनएल एक्सचेंज, जी.डी. सोमाणी मार्ग, कफ परेड कुलाबा, मुंबई येथे जावे लागणार आहे. त्यामुळे या दुरुस्तीसाठी राज्यभरातील संबंधितांना मुंबईची वारी करावी लागणार आहे. सदर काम एक, दोन दिवसात पूर्ण होईल याची खात्री नाही. यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागणार आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी सोय करा
यात एखादे कागदपत्र कमी असल्यास संबंधिताला गावी परत येऊन मुंबईचे हेलपाटे मारावे लागणार आहे. ही दुरुस्ती न केल्यास त्याचा फटका संबंधित व्यक्तीलाच बसणार आहे. कारण, प्रॉव्हिडंट फंड, निवृत्ती वेतन, निवृत्ती वेतनाचे पाश्चात्य असणारे वारस यांच्या नोंदी यासह अन्य बाबी आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेवर अवलंबून आहे. त्यामुळे या दुरुस्तीची सोय तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी करावी, अशी मागणीही केली जात आहे.

आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा बदल करावयाचा असेल तर, संबंधित व्यक्तीला आता ती दुरुस्ती सुधारण्यासाठी मुंबई कार्यालयात जावे लागणार आहे. तशा लेखी सूचनांचे पत्र ‘यूआयडीएआय’कडून थेट आधार केंद्र चालकांना प्राप्त झाले आहे. भिवापूर तालुक्यात त्या सूचनांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
 साहेबराव राठोड,
तहसीलदार, भिवापूर.

Web Title: Go to 'Mumbai' to correct the mistake! 'UIDAI' decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.