‘फेक आयडी’द्वारे मुलींना ओढले जातेय जाळ्यात; पंजाबमध्ये सापडली नागपुरातील मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:16 AM2019-07-13T11:16:13+5:302019-07-13T11:16:41+5:30

सोशल मीडियावर मानव तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे. ते ‘फेक आयडी’ तयार करून अल्पवयीन मुलींना हिरोईन बनविण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. शहरातील एक उच्चभ्रू कुटुंबातील अल्पवयीन विद्यार्थिनीसुद्धा या टोळीच्या जाळ्यात अडकली.

Girls trapped by 'Fake ID'; Nagpur girl found in Punjab | ‘फेक आयडी’द्वारे मुलींना ओढले जातेय जाळ्यात; पंजाबमध्ये सापडली नागपुरातील मुलगी

‘फेक आयडी’द्वारे मुलींना ओढले जातेय जाळ्यात; पंजाबमध्ये सापडली नागपुरातील मुलगी

Next
ठळक मुद्देमानव तस्करी टोळी सक्रिय  

जगदीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियावर मानव तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे. ते ‘फेक आयडी’ तयार करून अल्पवयीन मुलींना हिरोईन बनविण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. शहरातील एक उच्चभ्रू कुटुंबातील अल्पवयीन विद्यार्थिनीसुद्धा या टोळीच्या जाळ्यात अडकली. मुलगी बेपत्ता होताच आईवडिलांनी तत्परता दाखविल्याने तिची सुटका करता आली. तिला पंजाबमधील रोपड येथील एका गावातून मुक्त करण्यात आले. या प्रकरणामुळे सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.
पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनीचे आईवडील शिक्षक आहेत. त्यांनी मुलीला मोबाईलसुद्धा दिला नव्हता. ती आजोबांच्या मोबाईलचा वापर करायची. तिला नवनवीन भाषा शिकण्याची आणि अ‍ॅक्टींगची आवड होती. ती सोशल मीडियावर ‘अ‍ॅक्टीव’ राहायची. दोन महिन्यांपूर्वी तिची जस्सी सिंग गिल नावाच्या एका बोगस आयडी चालवणाऱ्या व्यक्तीसोबत मैत्री झाली. कथित जस्सीने स्वत:ला पंजाबी सिंगर असल्याचे सांगितले. त्याने पंजाबी फिल्म आणि मनोरंजन इंडस्ट्रीशी जुळला असल्याचे सांगत तिलाही काम मिळवून देण्याचे आमिष दिले. विद्यार्थिनीने त्याच्याशी मैत्री केली. त्याने पंजाबला आल्यावर काम देण्याचे आमिष दिले. पीडित मुलगी त्याच्यासोबत जायला तयार झाली. ठरलेल्या योजनेनुसार जस्सी नागपूरला आला. त्याच्या इशाºयावरच ८ जुलै रोजी सकाळी विद्यार्थिनी बॅगची शिलाई करण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. जस्सी तिला रेल्वेने रोपडला घेऊन गेला.
या दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याने चिंतेत पडलेल्या शिक्षक दाम्पत्यांनी तिचा शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्हीवरून मुलगी फरार झाल्याचे आढळून आले. त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
तिच्या फेसबुक अकाऊंटवरून जस्सी गिलसोबत ती रोपडला गेल्याची माहिती मिळाली. मुलीचे कुटुंबीय सामाजिक कार्यकर्ता अरविंदकुमार रतुडी आणि पोलिसांच्या चमूसोबत रोपडला पोहोचले. तेथील पोलिसांनी घटनेची माहिती देताच जस्सी फरार झाला. त्याची आई विद्यार्थिनीला घेऊन ठाण्यात पोहोचली. नागपूर पोलिसांनी विद्यार्थिनीला ताब्यात घेतले.
सिंगर नव्हे बीअर शॉपीत करायचा काम
रोपडला पोहोचल्यावर धक्कादायक बाब उघडकीस आली. जस्सी हा सिंगर नाही. पंजाबी संगीत व फिल्म इंडस्ट्रीशी त्याचा कुठलाही संबंध नाही. तो रोपड येथील एका बीअर शॉपीमध्ये काम करतो. त्याला दारु व मादक पदार्थाचे व्यसन आहे. तो मानव तस्करी करणाऱ्या टोळीशी जुळला असल्याचेही उघडकीस आले. रोपडमध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना विकणाऱ्या किंवा सौदेबाजी करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यामातून मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात. यासाठी त्यांच्याशी लग्नही करतात. जेव्हा पीडित मुलींचे कुटुंबीय त्यांच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्याशी सौदेबाजी करतात. मुलीचे कुटुंबीय गरीब असल्यास तिला देहव्यवसाय करणाऱ्यांना विकतात.

उडता पंजाबचे दर्शन
विद्यार्थिनीचे कुटुंबीय आणि नागपूर पोलीस जेव्हा रोपडला पोहोचले. तेव्हा त्यांना उडता पंजाब या चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात नशेमुळे पंजाबचे कसे नुकसान होत आहे, ते दर्शविले आहे. रोपडमध्ये त्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणी बीअर शॉपी आणि नशेचे अड्डे दिसून आले. विद्यार्थिनीचा शोध घेत असतानाच अन्य तीन कुटुंबीयसुद्धा भेटले. ते सुद्धा पोलिसांसोबत आपल्या मुलींच्या शोधासाठी आले होते. यापैकी एका कुटुंबालाच त्यांची मुलगी सापडली.

Web Title: Girls trapped by 'Fake ID'; Nagpur girl found in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.