नागपुरात प्रेमीयुगुलांना लुटणारी सहा आरोपींची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:47 AM2018-01-04T00:47:21+5:302018-01-04T00:58:42+5:30

एकांतात आढळलेल्या प्रेमीयुगुलांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या  टोळीच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. या टोळीने अनेक प्रेमीयुगुलांना लुटले आहे.

Gang of six accused robbery arrested in Nagpur | नागपुरात प्रेमीयुगुलांना लुटणारी सहा आरोपींची टोळी गजाआड

नागपुरात प्रेमीयुगुलांना लुटणारी सहा आरोपींची टोळी गजाआड

Next
ठळक मुद्देदोघे महाविद्यालयीन तरुण : शस्त्राच्या धाकावर लुटायचे

आॅनलाईन लोकमत
नागपूर : एकांतात आढळलेल्या प्रेमीयुगुलांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या  टोळीच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. या टोळीने अनेक प्रेमीयुगुलांना लुटले आहे. प्रेशित राजू डांगरे (वय २६), एफाज शेख अशफाक शेख (वय २१, रा. शिवाजी नगर, एमआईडीसी), आशिष शुभम सिंह (वय २०), रोहित विजय नितनवरे (वय १८ ) रोहित उर्फ गोलू अशोक गायगोले (वय १९) रोहित उर्फ गोलू अशोक गायगोले (वय १८) आणि अशोक रविकांत कोरेकर (वय २६, रा. रमाबाई आंबेडकर नगर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रेशित या टोळीचा म्होरक्या आहे. तर, या आरोपींमध्ये एकाचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.
गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी गस्त करीत असताना आरोपी एजाज आणि प्रेशित त्यांना संशयास्पद अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे महागडे मोबाईल आणि कामधंदा न करताच शानशौकिनीने राहण्याचा प्रकार खटकणारा होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उजेडात आली. आरोपी प्रेशित डांगरे आणि एफाज हे दोघे नेहमी फुटाळा, अंबाझरी, सेमिनरी हिल्स भागात फिरायला जात होते. तेथे त्यांना एकांतात प्रेमीयुगुल अश्लील चाळे करताना दिसायचे. त्यांना लुटल्यास बदनामीच्या धाकाने ते गप्प बसतील, अशी खात्री पटल्याने या दोघांनी अन्य आरोपींना सोबत घेऊन एक टोळी बनविली आणि ते प्रेमीयुगुलांचा वावर असलेल्या भागात गुन्हे करू लागले. एकांतात नको त्या अवस्थेत प्रेमीयुगुल पकडायचे. त्यांच्याच मोबाईलमध्ये त्यांचे फोटो घ्यायचे आणि नंतर त्यांच्याकडून रोख, दागिने व महागड्या चिजवस्तू हिसकावून घ्यायच्या, असे आरोपी करू लागले.
अनेक गुन्हे उजेडात येणार
बदनामीच्या धाकाने प्रेमीयुगुल गप्प बसायचे. त्यामुळे ही टोळी निर्ढावली होती. मात्र, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी गिट्टीखदान तसेच अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना आता पोलिसांच्या हवाली केले असून, त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Gang of six accused robbery arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.