Ganesh festival 2018 : नागपुरात ‘श्री’च्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 08:20 PM2018-09-22T20:20:55+5:302018-09-22T20:32:17+5:30

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिके ची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील तलाव परिसर, चौक व वस्त्यात ठिकठिकाणी २५१ कृत्रिम तलाव लावण्यात आलेले आहेत. विसर्जनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७०० कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. सोबतच सेवाभावी संस्थांचे शेकडो स्वयंसेवक मदतीला आहेत. स्वयंसेवी संस्थांवर तलावांची जबाबदारी सोपविण्यात आली असून कोणत्या ठिकाणी कोणत्या संस्थेचे स्वयंसेवक राहतील याचे नियोजन करण्यात आले आहे.

Ganesh Festival 2018: Prepare the Machinery for the Immersion of 'Shri' in Nagpur | Ganesh festival 2018 : नागपुरात ‘श्री’च्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

Ganesh festival 2018 : नागपुरात ‘श्री’च्या विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

Next
ठळक मुद्दे२५१ कृत्रिम तलावांची व्यवस्थामनपाचे ७०० कर्मचारी व सेवाभावी संस्थांचे शेकडो स्वयंसेवक मदतीलाकृत्रिम तलावातील विसर्जनाला भाविकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिके ची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील तलाव परिसर, चौक व वस्त्यात ठिकठिकाणी २५१ कृत्रिम तलाव लावण्यात आलेले आहेत. विसर्जनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७०० कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. सोबतच सेवाभावी संस्थांचे शेकडो स्वयंसेवक मदतीला आहेत. स्वयंसेवी संस्थांवर तलावांची जबाबदारी सोपविण्यात आली असून कोणत्या ठिकाणी कोणत्या संस्थेचे स्वयंसेवक राहतील याचे नियोजन करण्यात आले आहे.
जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. महापालिकेच्या वतीने दहाही झोन मिळून शनिवारपर्यंत सुमारे २५१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव येथे गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी असली तरी या ठिकाणी मोठे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहते. या तलावांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
फुटाळा तलावावर वायुसेनेच्या दिशेने होत असलेले गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक दक्ष आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच ते या तलावावर सेवा देत आहेत. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करीत आहेत. निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. फुटाळा तलावाच्या वायुसेनानगरच्या दिशेने ठेवलेल्या कृत्रिम टँकमध्ये १४ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरदरम्यान १७३४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. आजपर्यंत या एकाच ठिकाणी १८ टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे.

फुटाळ्याच्या चौपाटीवर कृत्रिम तलाव
दरवर्षी फुटाळा तलावाच्या दोन बाजूने गणेश विसर्जनाची व्यवस्था केली जात होती. मात्र यावेळी तलावाच्या चौपाटीच्या बाजूनेही कृ त्रिम तलाव लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी गर्दी होणार नाही. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी कलश व ड्रम ठेवण्यात आलेले आहेत.

झोन निहाय कृत्रिम तलावांची व्यवस्था
झोन                    तलाव
लक्ष्मीनगर             २०
धरमपेठ                ३२
हनुमाननगर         ३३
धंतोली                  ३०
नेहरूनगर            ५१
गांधीबाग               २१
सतरंजीपुरा           १३
लकडगंज             २६
आसीनगर              ७
मगंळवारी            १८
एकूण                 २५१

धरमपेठ झोनमध्ये मोबाईल टँक
महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील नागरिकांना सुविधा व्हावी. यासाठी घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी झोन कार्यालयातर्फे फिरते मोबाईल टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी टँक व्यवस्थेसाठी नागरिकांनी झोन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपर्क साधावा, असे आवाहन झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धनाला सहकार्य करा
नागपूर शहरातील विविध पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंमसेवक महापालिका कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अखेरच्या दिवशी सेवा देणार आहेत. सोबतच स्वयंसेवक विविध ठिकाणी पर्यावरण जागृती करण्यासाठी भाविकांना मार्गदर्शन करतील. निर्माल्य कलशात निर्माल्य दान करण्यासाठी आणि कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करतील. भाविकांनीही पर्यावरण संवर्धनाला सहकार्य करावे.
डॉ. प्रदीप दासरवार आरोग्य अधिकारी (स्वच्छता) 

 

Web Title: Ganesh Festival 2018: Prepare the Machinery for the Immersion of 'Shri' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.