नागपुरातील विद्यार्थी अपहरण प्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:53 PM2018-03-05T22:53:16+5:302018-03-05T22:53:37+5:30

फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून त्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला भेटायला बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि त्याला मुक्त करण्यासाठी १ लाख, २० हजारांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अखेर गुन्हे शाखा (युनिट क्रमांक तीन) पथकाने अटक केली.

Gajad, accused in the kidnapping of students in Nagpur | नागपुरातील विद्यार्थी अपहरण प्रकरणातील आरोपी गजाआड

नागपुरातील विद्यार्थी अपहरण प्रकरणातील आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देमुलीच्या नावे व्हॉटस्अ‍ॅपवर मैत्रीचंद्रपूरचे आरोपी, मुंबईत कटपाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून त्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला भेटायला बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि त्याला मुक्त करण्यासाठी १ लाख, २० हजारांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अखेर गुन्हे शाखा (युनिट क्रमांक तीन) पथकाने अटक केली. सूरज राजू कृष्णापूरकर (वय २६), मतिन फारूख शेख (वय २१) आणि राज विनोद खनके (वय १९) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही बाबूपेठ चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. त्यातील सूरज आणि मनित या दोघांना कुलाबा आणि दादर (मुंबई) येथून तर राजला मानकापुरातून ताब्यात घेण्यात आले.
एखाद्या सिनेमात शोभावे तसे हे अपहरण प्रकरण मंगळवारी २७ फेब्रुवारीला पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले होते. अशोक गणपतराव देवकर (वय ५३, रा. तुकारामनगर) यांचा मुलगा मयूर (वय १७) बारावीचा विद्यार्थी आहे. आठ दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलवर एका युवतीच्या नावे व्हॉटस्अ‍ॅप मेसेज आला. मुलीने आपले नाव काजल बावणे सांगितले. त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर रोज आॅनलाईन चॅटिंग सुरू झाली. मयूरचा एक मित्र मोहसिन पाचपावलीतील लष्करीबागेत राहतो. त्याला भेटण्यासाठी मयूर २७ फेब्रुवारीला दुपारी १.१० वाजता गेला. तेथे त्याला काजलच्या मोबाईलवरून पुन्हा मेसेज आला. तिने त्याला सेंट्रल एव्हेन्यूवरून वॉकर रोड, सिव्हिल लाईनमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मयूर त्याच्या प्लेझरने ठरलेल्या ठिकाणी काजलला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी मुलीऐवजी मयूरजवळ दोन तरुण आले. आम्ही काजलचे भाऊ आहोत, तू तिला फोनवरून का सारखा त्रास देतो, असे म्हणत आरोपी मयूरच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसले. त्यांनी त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला सिव्हिल लाईन्स, सदर, झिंगाबाई टाकळी, गिट्टीखदान परिसरात जबरदस्तीने फिरवू लागले. या दरम्यान आरोपींनी मयूरच्याच मोबाईलवरून त्याचे वडील अशोक देवकर यांना फोन केला. मयूरचे अपहरण केले असून, त्याची सुखरूप सुटका करून घ्यायची असेल तर १ लाख, २० हजारांची खंडणी द्यावी लागेल, असे म्हटले. पोलिसांना माहिती दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. या प्रकाराने घाबरलेल्या मयूरच्या वडिलांनी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली.
माहिती कळताच पाचपावली आणि गुन्हे शाखेचे पोलीस अपहृत मयूर प्रकरणाचा समांतर तपास करू लागले. मयूरच्या वडिलांना त्यांनी आरोपींना खंडणीची रक्कम देण्यास होकार द्यायला लावला. त्यानुसार अशोक देवकर त्यांना रक्कम देण्यासाठी कुठे यायचे, असे विचारत होते. आरोपी वारंवार स्थान बदलवत होते. त्यांना खंडणीची रक्कम देण्यासाठी मयूरच्या वडिलांसोबत पोलीस असल्याचा संशय आल्याने त्यांनी तब्बल सहा तासानंतर मयूरला गिट्टीखदानमध्ये सोडून दिले. त्याचा मोबाईल मात्र स्वत:जवळच ठेवून घेतला. याच मोबाईलवरून खंडणीसाठी त्यांनी पुन्हा फोन केला. मात्र, रक्कम मिळणार नसल्याचे लक्षात आल्याने सूरज आणि मतिन मुंबईला पळून गेले. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनवरून ते मुंबईत असल्याची खात्री पटताच गुन्हे शाखेचे पथक मुंबईला रवाना झाले. त्यांनी तेथे जाऊन या दोघांना कुलाबा व दादर भागात अटक केली.
कर्ज फेडण्यासाठी अपहरणाचा कट
आरोपी सूरज हा या गुन्ह्यातील मास्टर मार्इंड आहे. तो चंद्रपुरातून पळून मुंबईत आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे कामाच्या शोधात गेला. बदलापूरच्या एका बीअरबारमध्ये त्याला वेटरचे काम मिळाले. व्यसन आणि अवगुणामुळे तेथे त्याने अनेकांकडून रक्कम उधार घेतली. ३५ ते ४० हजार रुपये कर्ज झाल्यानंतर देणेकºयांनी तगादा लावला. त्यामुळे त्याने अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट रचला. त्यानुसार, त्याचा चंद्रपुरातील मित्र, जो सध्या रिलायन्स प्रॉडक्शनमध्ये स्पॉट बॉयचे काम करायचा, त्याने मतिनच्या नावे दोन आठवड्यांपूर्वी एअरटेलचे नवीन सीमकार्ड विकत घेतले. त्याचा वापर करून सूरजने काजल बावणे नावाने बनावट फेसबूक आयडी आणि व्हॉटस्अ‍ॅप प्रोफाईल तयार केले. त्यावर एका सुंदर मुलीचे छायाचित्रही लावले. त्यानंतर त्याने मयूरला सावज म्हणून हेरले. फ्रेण्डशिप करायची आहे, असे मेसेज पाठवत एक आठवडा सतत चॅटिंग केल्यानंतर मयूर जाळ्यात आल्याचे पाहून सूरज नागपुरात आला. तो एका लॉजवर मुक्कामी थांबला. कटानुसार त्याने नंतर मुंबईहून मतिनलाही बोलवून घेतले. या दोघांना अपहरण आणि खंडणी वसूल करण्यासाठी एका मोटरसायकलची गरज होती. त्यासाठी त्यांनी राज खणकेलाही कटात सहभागी करून घेतले.
रिकाम्या हाती मुंबईला पलायन
त्यानुसार या तिघांनी मयूरचे अपहरण केले आणि त्याच्याच मोबाईलचा वापर करून त्याच्या वडिलांना आरोपी सूरज वारंवार खंडणीसाठी फोन करू लागला. परंतु खंडणी मिळणार नाही, पकडले जाऊ, अशी शंका आल्याने राजला नागपुरातच ठेवून सूरज आणि मतिन मुंबईला पळून गेले. मात्र, त्यांनी या गंभीर गुन्ह्यात अनेक धागेदोरे मागे सोडले. त्या आधारे पोलिसांनी तिघांनाही अटक केली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हेशाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, साहयक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, कमलाकर गड्डीमे, संजय चव्हाण, उपनिरीक्षक मंगला मोकाशे, हवालदार शत्रुघ्न कडू, शैलेश ठवरे, अनिल दुबे, नायक मनीष भोसले, श्याम कडू, अतुल दवंडे, सूरज भोंगाडे आणि शरीफ शेख यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Gajad, accused in the kidnapping of students in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.