नागपुरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:26 AM2018-09-16T00:26:52+5:302018-09-16T00:28:56+5:30

शहरातील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटविण्यात आली. अपघातात झालाच तर वाहनचालकांचा बळी जाऊ नये यासाठी हेल्मेट न वापरणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. पण अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट गुरांचा शहरातील वर्दळीच्या मार्गावर मुक्त संचार सुरू आहे. याला आवर कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव असल्याने महापालिकेचा कोंडवाडा विभाग मात्र हतबल आहे.

Free wandering of stray cattle in Nagpur | नागपुरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार

नागपुरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार

googlenewsNext
ठळक मुद्देयंत्रणा नसल्याने कोंडवाडा विभाग हतबल : न्यायालयाच्या आदेशानंतरही ठोस कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नाागपूर : शहरातील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटविण्यात आली. अपघातात झालाच तर वाहनचालकांचा बळी जाऊ नये यासाठी हेल्मेट न वापरणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. पण अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट गुरांचा शहरातील वर्दळीच्या मार्गावर मुक्त संचार सुरू आहे. याला आवर कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव असल्याने महापालिकेचा कोंडवाडा विभाग मात्र हतबल आहे.
गोपालक गाई व म्हशी सर्रास मोकाट सोडतात तसेच मोकाट सांडांचीही संख्या मोठी आहे. शहरातील उद्याने, मोकळी मैदाने व रस्त्याच्या बाजूला हिरवळ असलेल्या भागात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे. मोकाट गुरांची महापालिकेच्या कोंंडवाडा विभागाकडे तक्रार केली जाते. परंतु विभागाकडे जनावरे पकडण्यासाठी दोनच गाड्या आहेत. त्यात कर्मचारी नाही. रोजंदारीवर मजुरांना कामावर ठेवले जाते. त्यांना मोकाट जनावरे पकडण्याचा अनुभव नसतो. विभागातील रिक्त पदे मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाही. परिणाम अनेकदा तक्रार करूनही कोंडवाडा विभागाकडून जनावरांवर कारवाई होत नसल्याचा अनुभव लोकांना आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर आता महापालिका आणि दुग्ध विकास विभागाला जाग आली आहे.

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा दबाव
कोंडवाडा विभागाने मोकाट जनावर पकडले की त्याला सोडवण्यासाठी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे फोन येतात. राजकीय दबावामुळे पथकाला कारवाई करता येत नाही. शहरात मोकाट जनावरांची समस्या आहे. शहरातील गोठ्यावर कारवाई केली तर राजकीय दबाव येतो. त्यामुळे आम्हाला कारवाई करता येत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याने मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर आली जाग
दुग्ध विकास विभागाने वर्दळीच्या भागातही गोठ्यांना परवानगी दिली आहे. तसेच परवानगी न घेताही मोठ्याप्रमाणात गोठे आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा गोठे मालकांना दुग्ध विकास विभागाने नोटीस बजावण्याला सुरुवात केली आहे. परंतु नोटीस बजावल्यानंतर पुढे कारवाई करणार की नाही, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

हजाराहून अधिक गोठे
नागपूर शहरात जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी ४५७ गोठ्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु प्रत्यक्षात गोठ्यांची संख्या हजाराहून अधिक आहे. धरमपेठ भागात शहरात सर्वाधिक १८८ गोठे असून त्यानतंर १३३ गोठे आशीनगर झोनमध्ये आहेत. लकडगंजमध्ये ११७ आणि लक्ष्मीनगरमध्ये ११५ गोठे आहेत. सर्वात कमी ६२ गोठे नेहरूनगरमध्ये आहेत. परवानगी न घेता सुरू असलेल्या गोठ्यांची संख्या याहून अधिक आहे.

अंतर्गत भागातही जनावरांची समस्या
मुख्य रस्त्यांसोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. रात्रीच्या सुमारास अंधारात कामावरून परतणाऱ्यांना अपघात होण्याचा धोका असतो. मोकाट जनावरांमुळे अपघात झाल्यास याबाबतची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.

 

Web Title: Free wandering of stray cattle in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.