माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:50 PM2018-09-23T17:50:41+5:302018-09-24T05:57:48+5:30

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतारामजी पोटदुखे यांचे आज रविवारी दुपारी नागपूर येथे निधन झाले. ते  85 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

Former Union Minister Shantaram Potdukhe passed away | माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन 

माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन 

Next

चंद्रपूर : चंद्रपूरचे लाडके व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम राजेश्वर पोटदुखे यांचे रविवारी दुपारी ३.२३ वाजता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ज्येष्ठ काँग्रेस नेते असले तरी मूलत: राजकारणात राहूनही कोणतीही संस्था, व्यक्ती आणि समस्या याकडे निरपेक्ष सांस्कृतिक दृष्टीने पाहण्याचा त्यांचा स्वभाव होता. शांताराम पोटदुखे यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याने शांत, संयमी आणि सुस्वभावी नेत्याला गमावले आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
८५ वर्षीय शांताराम पोटदुखे यांना सोमवारी हृदयविकाराचा त्रास झाल्याने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता पोहचताच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा भरत, मुलगी भारती (रिमा) चवरे, स्नुषा रमा गोळवलकर-पोटदुखे, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे.
३० जानेवारी १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला. बी.ए. आणि बी.जे.पर्यंत शिक्षण झाले. विदर्भातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघटनांचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची प्रमुख घटक संस्था विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त होते. १९८० पासून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अधिराज्य गाजविले. या काळात त्यांनी जनतेशी कधीही नाळ तुटू दिली नाही. जनतेनेही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. म्हणूनच १९८०-१९८४, १९८४-९८, १९८९-१९९१ व १९९१-१९९६ असे सलग चारवेळा ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. चौथ्यांदा ते खासदार झाले तेव्हा त्यांचा राजकारणातला दांडगा अनुभव बघता, त्यांच्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. चंद्रपूरच्या राजकारणाचा दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. राजकारणात त्यांना कधीही विरोधकांवर आरोप करताना बघितले नाही. उलट विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांची त्यांनी स्तुतीच केली. सुधीर मुनगंटीवार हे आमदार असताना एकाच मंचावर एकत्र आले असता त्यांनी मुनगंटीवार यांचे जाहीर कौतुक केल्याचेही सर्वश्रुत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते शिक्षण घेत असताना त्या काळात चंद्रपुरात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे नागपूरशिवाय पर्याय नव्हता. मात्र त्यांचे मित्र हुशार असतानाही गरिबीमुळे नागपूरला उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. ही खंत त्यांच्या मनात कायमची घर करून होती. तेव्हापासूनच त्यांनी चंद्रपूरसह ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय करण्याची खूणगाठ बांधली. सर्वप्रथम नेहरू विद्यालय सुरू केले. यापाठोपाठ सर्वोदय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सरदार पटेल महाविद्यालय सुरू केले. विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, मॅनेजमेंट, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांची सोय चंद्रपुरात उपलब्ध करून दिली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आजघडीला सहा शाळा व पाच महाविद्यालये आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठ्या हुद्यावर पोहचली आहे. त्यांनी राजकारणात आणलेले समाजकारण आणि आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यात केलेली शैक्षणिक क्रांती कधीही विसरू न शकणारी आहे. साहित्य क्षेत्राशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यांनी २०१२ मध्ये चंद्रपूर येथे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरविले होते. हे संमेलन चंद्रपूरसह विदर्भातील साहित्य क्षेत्रासाठी मेजवानीच होती. राजकारणात राहूनही साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेली भरीव कामगिरी सुवर्ण अक्षरात नोंद करणारी अशीच आहे. असा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा धनी निघून गेल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

विदर्भाच्या विकासासाठी
धडपडणारा नेता हरपला
मुंबई, : माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे.
पोटदुखे यांनी सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालयांचे एक मोठे शैक्षणिक जाळे विणले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोनवेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यासोबतच विदर्भातील विविध साहित्यविषयक उपक्रमात त्यांचा सातत्याने पुढाकार होता. सक्रि य राजकारणापासून दूर झाल्यानंतरही ते समाजकारण, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रि य होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा एक प्रमुख नेता आपण गमावला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावले
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने आम्ही अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावले. शांतारामजींनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. हे जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या संपन्न करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझे आणि शांतारामजींचे नाते राजकारणापलीकडचे होते. त्यांच्याच सरदार पटेल महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो. राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून नेहमीच कौतुकाची, आशीर्वादाची थाप त्यांनी कायम माझ्या पाठीवर ठेवली. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

सुशील, सुसंस्कृत राजकारणी

शांतारामजी पोटदुखे यांनी आयुष्यभर लोकसेवेचे राजकारण केले. ते अजातशत्रू होते त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविताना राजकीय भेदाभेदाचा विचार त्यांनी कधी केला नाही. सामाजिक चळवळीत प्रामाणिक भावनेतून काम करणाऱ्या अनेक संस्था, कार्यकर्त्यांना त्यांचा आधार होता. साहित्य-संस्कृती हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र होते. अशा अनेक संस्थांचे पालकत्व स्वीकारून त्यांना बळ देण्याचे व्रत त्यांनी अखेरपर्यंत जोपासले. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. शांतारामजींच्या निधनाने राजकारणातील एक सुसंस्कृत मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. ‘लोकमत’ परिवाराकडून त्यांना विनम्र श्रद्धांजली.
- विजय दर्डा
माजी खासदार आणि चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड

Web Title: Former Union Minister Shantaram Potdukhe passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर