Former minister Ranjit Deshmukh's bungalow confiscation stopped in Nagpur | नागपुरात माजी मंत्री रणजित देशमुखांच्या बंगल्यावरील जप्ती टळली
नागपुरात माजी मंत्री रणजित देशमुखांच्या बंगल्यावरील जप्ती टळली

ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशावरून पथक व पोलीस धडकलेएक लाख भरून सामोपचाराने प्रकरण मिटले

आॅनलाईन लोकमत
नागपूर : माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सावनेर तालुक्यातील हेटी-सुर्ला येथील साखर कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतरही रक्कम न मिळाल्याचे शेतकऱ्याने निदर्शनास आणून दिल्यावर सावनेर येथील दिवाणी न्यायालयाने जप्तीचा आदेश काढला. या आदेशानुसार गुरुवारी शेतकरी, जप्ती पथक व पोलीस देशमुख यांच्या बंगल्यावर धडकले. मात्र, एक लाख रुपये भरून उर्वरित रक्कम लवकरच देण्याची हमी दिल्यामुळे सोमवारपर्यंत जप्ती टळली.
हेटी-सुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याचे रणजित देशमुख हे व्यवस्थापकीय संचालक होते. पुसद येथील शेतकरी धनंजय तडकसे यांच्याकडून २००४ मध्ये कारखान्यातील कामगारांसाठी ज्वारी खरेदी करण्यात आली होती. मात्र, पैसे देण्यात आले नाही. तडकसे यांचे कारखान्याकडे ३ लाख ३६ हजार रुपये थकीत होते. त्यांनी वेळोवेळी अर्ज करून, मागणी करूनही रक्कम मिळाली नाही. शेवटी तडकसे यांनी सावनेरच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तडकसे यांना दिलासा देत संबंधित रकम देण्याचे आदेश कारखान्याला दिले. मात्र, त्यानंतरही देशमुख यांनी संबंधित रक्कम परत केली नाही. शेतकºयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत संबंधित रक्कम वसूल करण्यासाठी देशमुख यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. यानुसार शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास जप्ती पथक देशमुख यांच्या जीपीओ चौकातील बंगल्यावर धडकले. सीताबर्डी पोलिसांचे पथकही सोबत होते. मात्र, कारवाईपूर्वीच देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख तेथे पोहचले. रणजित देशमुख हे अंदमानला गेले असल्याचे सांगत, त्यांनी एक लाख रुपये जमा केले तसेच उर्वरित रक्कम रणजितबाबु परतल्यावर जमा करण्याची हमी दिली. या वेळी झालेल्या तडजोडीनंतर जप्तीची कारवाई सोमवारपर्यंत टाळण्यात आली.

 


Web Title: Former minister Ranjit Deshmukh's bungalow confiscation stopped in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.