लोकप्रतिनिधींना ‘शासकीय’ उपचाराची सक्ती करा; विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:42 AM2018-12-17T11:42:45+5:302018-12-17T11:43:06+5:30

ग्रामपंचायत सदस्यांपासून ते संसद सदस्यांपर्यंत आणि ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनाही शासकीय रुग्णालयातूनच उपचार घेणे बंधनकारक करावे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.

Force people's representatives to 'government' treatment; Vijay Darda | लोकप्रतिनिधींना ‘शासकीय’ उपचाराची सक्ती करा; विजय दर्डा

लोकप्रतिनिधींना ‘शासकीय’ उपचाराची सक्ती करा; विजय दर्डा

Next
ठळक मुद्दे पं. दीनदयाल थाळीच्या वर्षपूर्तीनिमित्त रुग्णांसाठी ४६०० कपड्यांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय सेवा ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे. तो त्यांचा हक्कच आहे. ती सेवा पुरविणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. शासकीय रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपासून ते संसद सदस्यांपर्यंत आणि ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनाही शासकीय रुग्णालयातूनच उपचार घेणे बंधनकारक करावे, असे झाल्यास रुग्णालयांचा विकास होईल. यासाठी विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठीही प्रयत्न केले होते, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.
पं. दीनदयाल थाळीच्या वर्षपूर्तीनिमित्त पहिल्या टप्प्यातील २३०० रुग्णांना कपड्यांच्या दोन जोडींचे म्हणजे ४६०० कपड्यांचे वितरण आणि अटल महाआरोग्य शिबिरात मदत करणाऱ्या डॉक्टरांच्या सत्काराचे आयोजन रविवारी मेडिकलच्या परिसरात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंचावर मुख्य अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते.
विजय दर्डा म्हणाले, मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना केवळ १० रुपयांमध्ये ‘हायजेनिक फूड’ उपलब्ध करून देण्याचे संदीप जोशी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. रुग्णांची सेवा हा डॉक्टरांचा धर्म असतो. या धर्मातून कर्म निर्माण होणे महत्त्वाचे आहे. राज्यसभा सदस्य असताना पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनांमधून मेडिकलच्या विकासासाठी १५० कोटी रुपये खेचून आणले. परंतु यातील ५० कोटी रुपये वाया गेले, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, मेडिकलला अद्ययावत सोई उपलब्ध करून दर्जा सुधारण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना अनेक पत्र लिहिली. मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे. येथील डॉक्टरांनीही निर्भीडपणे आपल्या समस्या या दोन नेत्यांकडे मांडायला हव्यात. यामुळे निश्चितच येथील दुरवस्था दूर होईल. रुग्ण हितासाठी शासनाचे धोरण बदलले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. कांचन गडकरी यांनी संदीप जोशी यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे रुग्णांची म्हणजेच देशाची सेवा घडत आहे, असेही ते म्हणाले.

मेडिकलचे किचन सामाजिक संस्थांकडून चालविण्याचा प्रयत्न
डॉ. निसवाडे म्हणाले, मेडिकलमध्ये केवळ विदर्भातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. पूर्वी बाहेरून येणारे रुग्ण चुलीवर स्वयंपाक करून आपली भूक भागवायचे. परंतु पं. दीनदयला थाळी उपक्रम सुरू झाल्यापासून हे दृश्य कमी झाले. बी.जे. मेडिकलमधील ‘किचन’ची जबाबदारी श्रीमंत दगडू शेट हलवाई या संस्थेने घेतली आहे. नागपूर मेडिकलचाही याच धर्तीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रास्ताविक महापालिकेचे सत्तापक्ष नेते व युवा झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले. ‘लोकमत’ वृत्तामुळेच मेडिकलमधील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या फाटक्या कपड्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करता आले, असे मत मांडले. त्यांनी पं. दीनदयाल थाळीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व दानदात्यांचे व कार्यकर्त्यांचे आभारही मानले. संचालन नीरज दोन्तुलवार यांनी केले तर आभार भवानजीभाई पटेल यांनी मानले.

रुग्णालयाच्या अव्यवस्थेवर दर्डा यांनी उपस्थित केले प्रश्न
विजय दर्डा म्हणाले, रुग्णालयातील यंत्रसामुग्री, शस्त्रक्रिया गृह, वॉर्ड, ‘मेस’व स्वच्छतेसाठी मोठा निधी मिळतो. परंतु राजकीय व डॉक्टरांमधील राजकारणामुळे अनेकवेळा याचा फायदा सामान्यापर्यंत पोहचत नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या कापडांची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे एखाद्या खासगी संस्थांनी समोर येऊन ते उपलब्ध करून देणे योग्य नाही. शासनाने आपली जबाबदारी घ्यायला हवी. यातील काही उणिवा असतील त्या दूर करायला हव्यात. एक चांगली व्यवस्था साकारायला हवी.

या डॉक्टरांचा गौरव
डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. राज गजभिये, डॉ. अशोक मदान, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. सजल मित्रा, डॉ. प्रमोद गिरी, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. नरेंद्र तिरपुडे, डॉ. निकुंज पवार, डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. मो. फैजल, डॉ. हेमंत भानारकर, डॉ. शिरीष धांदे, डॉ. अतुल डाखोळे, डॉ. अनुप मरार, डॉ.सुपे, डॉ. धुरट, डॉ. नीलेश, डॉ. सागर, डॉ. आशुतोष जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.

दखल ‘लोकमत’ची
रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या फाटक्या कपड्यांमुळे महिला रुग्णांची कुचंबणा व्हायची. ‘लोकमत’ने हा प्रकार सामोर आणला. याची दखल युवा झेप प्रतिष्ठानने घेतली. त्यांनी २३०० रुग्णांच्या कपड्यांचे दोन जोड उपलब्ध करून दिले. रविवारी पं. दीनदयाल थाळीची वर्षपूर्तीनिमित्त या कपड्यांची भेट मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्याकडे सुपूर्द केले.

Web Title: Force people's representatives to 'government' treatment; Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य