ठळक मुद्देनितीन गडकरी : मातृ सेवा संघ, महालच्या नवीन वास्तूचे लोकार्पण व कमलाताई होस्पेट यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगा नदीच्या प्रवाह मार्गावर ठिकठिकाणी घाट, मोक्षधाम व सौंदर्यीकरणासाठी मी पाच हजार कोटींची विशेष योजना तयार केली असून हा संपूर्ण निधी लोकांकडून देणगीच्या स्वरूपात मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. केवळ आठच दिवसात एक हजार कोटीची व्यवस्था झाली आहे. उर्वरीत लोकनिधीही वेगाने उभारला जाईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मातृ सेवा संघ, महालच्या नवीन वास्तूचे लोकार्पण व कमलाताई होस्पेट यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या अध्यक्षतेत झाले त्यावेळी ते बोलत होते. कवी सुरेश भट सभागृहात शुक्रवारी सकाळी आयोजित या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गडचिरोलीतील सर्च या संस्थेच्या सहसंचालक डॉ. राणी बंग उपस्थित होत्या. गडकरी पुढे म्हणाले, माझा जन्मही मातृ सेवा संघातील आहे. त्यामुळे या संस्थेशी माझे एक भावनिक नाते आहे. गरीब महिलेची प्रसुती सुखरूप व्हावी, यासाठी अशा संस्थांची संख्या वाढायला हवी.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही अशी सेवा मिळावी यासाठी माझ्या खात्यामार्फत पाच कोटी रुपये दिले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात कांचन गडकरी यांनी मातृ सेवा संघाच्या नवीन इमारतीसाठी कसे परिश्रम घेतले याची माहिती देत या सेवाभावी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
मातृ सेवा संघ, महालच्या अध्यक्ष कांचन गडकरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून या संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी या संस्थेला आर्थिक मदत करणाºया व्यक्ती व संस्था यांचा पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर ज्योती बावनकुळे, मातृसेवा संघाच्या सचिव वैदेही भाटे, कोषाध्यक्ष इरावती दाणी, डॉ. अरुणा बाभुळकर, डॉ. लता देशमुख, जाई जोग उपस्थित होत्या. संचालन रेणुका देशकर यांनी केले.
सेवेचा आव नको, सेवाभाव हवा
आज अनेक धर्मादाय संस्था सेवाभावाच्या नावावर बक्कळ पैसा कमावत असतात. हे योग्य नाही. सेवेचा आव नको, सेवाभावच हवा. मातृ सेवा संघाने सेवाभावाने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. सरकार म्हणून आम्ही कायम मातृ सेवा संघाच्या पाठीशी आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संस्थेचा गौरव केला.
माता बनण्यास असमर्थ मुलींना दिव्यांग श्रेणीत टाका
ज्या मुलींना गर्भाशयच नाही, मासिक पाळी येत नाही अशा मुली समाजात थट्टेचा विषय ठरतात. त्यांचे लग्न होत नाही. आयुष्यभर परावलंबी जीवन जगावे लागते. अशा मुलींसाठी दिव्यांगांची व्याख्या आणखी विस्तारित करून त्यात या मुलींना समाविष्ट करावे, अशी मागणी सर्च या संस्थेच्या सहसंचालक व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही नागपूरच्या मेडिकलमध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला कधीच मातृसेवा संघाचे कार्य दाखविण्यात आले नाही. नवीन पिढीला तरी ते दिसावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ८५ टक्के बाळंतपण घरीच सुखरूप होऊ शकतात. फक्त १५ टक्के केसेसमध्ये रुग्णालयाची गरज पडते. परंतु आज पैशांसाठी सगळ्यांनाच रुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.