नामांतर आंदोलनात नागपुरात झालेले ते पहिले बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 08:47 PM2018-08-03T20:47:07+5:302018-08-03T23:11:28+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. वीर शहिदांना जयभीमची सलामी दिली जाते.

The first sacrifice that took place in Nagpur in the nomination movement | नामांतर आंदोलनात नागपुरात झालेले ते पहिले बलिदान

नामांतर आंदोलनात नागपुरात झालेले ते पहिले बलिदान

Next
ठळक मुद्देमराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीद दिन विशेष : घटनेला ४० वर्षे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. वीर शहिदांना जयभीमची सलामी दिली जाते.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने पारित झाला. परंतु जातीयवादी लोकांना हे पटले नाही. त्यांनी याला तीव्र विरोध करीत मराठवाडा पेटविला. दलितांवर अत्याचार सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला होत असलेला विरोध व दलितांवरील अत्याचार पाहता नागपुरातील आंबेडकरी समाजमन अस्वस्थ झाले होते. याच्या संतप्त प्रतिक्रिया नागपूर शहरात उमटू लागल्या होत्या. ठिकठिकाणी आंबेडकरी युवक, कार्यकर्ते व समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरातील आंबेडकरी जनता हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. इंदोरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चा आटोपून नागरिक समूहाने घराकडे परतत असताना पोलिसांनी या समूहास लक्ष्य केले. पोलिसांनी कामठी मार्गावरील इंदोरा १० नंबर पूल परिसरात आंबेडकरी जनतेवर गोळीबार केला. ४ व ५ आॅगस्ट असे दोन दिवस पोलिसांचा धुडगूस सुरू होता. पोलिसांच्या या गोळीबारात पाच भीमसैनिक शहीद झाले. यात अविनाश डोंगरे या बालकाचाही समावेश होता. या गोळीबारात रतन मेंढे, शब्बीर हुसेन फजल हुसेन, किशोर बाळकृष्ण काकडे, अब्दुल सत्तार, बशीर अली हे शहीद झाले. पोलिसांच्या गोळीबरात अनेक निरपराध नागरिक प्रामुख्याने तरुण जखमी झाले होते. कुणाच्या हातात, कुणाच्या पायात, जांघेत, तर कुणाच्या पोटात गोळी लागून ते जखमी झाले होते.
यानंतर पुढच्या वर्षी ६ डिसेंबर रोजी १९७९ रोजी पुन्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या अंमलबजावणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वेळीही ४ आॅगस्टची पुनरावृत्ती करून पोलिसांनी गोळीबार केला. यात ज्ञानेश्वर बुधाजी साखरे, दिलीप सूर्यभान रामटेके, रोशन बोरकर, डोमाजी भिकाजी कुत्तरमारे हे चार भीमसैनिक शहीद झाले. तर कित्येक जखमी झाले. पुढे आंबेडकरी जनतेच्या आंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावे लागले. १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव अस्तित्वात आले.
त्या भीमसैनिकांच्या स्मृतीस उभारले शहीद मारक
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी महाराष्ट्रात सातत्याने आंदोलन चालले. तब्बल १६ वर्षे हे आंदोलन सुरू होते. या दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ४ आॅगस्ट रोजी १० नंबर पुलावर आंबेडकरी समाज प्रत्येक वर्षी एकत्र येऊन शहीद भीमसैनिकांना आदरांजली वाहत असे. पुढे महापालिकेनेही याची दखल घेत नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद स्मारक उभारले. या स्मारकावर नामांतर आंदोलनातील सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरलेली आहेत.

‘‘आंबेडकरी जनतेच्या १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामांतर अस्तित्वात आले. नामांतरासाठी झालेला अभूतपूर्व लढा व त्यात प्राणाची बाजी लावून लढलेले भीमसैनिक यांच्या त्यागामुळेच नामांतर झाले आहे. या लढ्यात सर्वस्वाचे बलिदान ज्यांनी केले त्या शहिदांना मानाचा मुजरा.’’
अनिल वासनिक, नामांतर लढ्यातील प्रमुख कार्यकर्ते व लेखक

Web Title: The first sacrifice that took place in Nagpur in the nomination movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.