बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:38 PM2018-01-17T19:38:28+5:302018-01-17T19:40:14+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.

FIR lodged in Jigaon irrigation project scam in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात एफआयआर

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात एफआयआर

Next
ठळक मुद्देहायकोर्टात उत्तर : खर्च वृद्धीची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.
आरोपींमध्ये कंत्राटदार बाजोरिया कन्स्ट्रक्शनचे संचालक सुमित बाजोरिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, जलसंसाधन विभागाचे माजी मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता एस. आर. सूर्यवंशी, बुलडाणा सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता शरद गावंडे, अधीक्षक अभियंता बी. एस. वावरे, अधीक्षक अभियंता भीमाशंकर पुरी व कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या खर्च वृद्धीची चौकशी सुरू असून ती लवरकच पूर्ण केली जाईल असेही न्यायालयाला सांगण्यात आले आहे.
बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील अन्य तीन प्रकल्पांबाबत राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विदर्भातील ३८ सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहाराची खुली चौकशी करीत असून त्यात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती शासनाने दिली आहे. तसेच, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प व दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची अमरावती जलसंसाधन विभागातील दक्षता केंद्राचे अधीक्षक अभियंत्यांनी चौकशी केली आहे. त्याचा अहवाल ७ आॅक्टोबर २०१७ रोजी सादर करण्यात आला आहे. शासन त्या अहवालाची पडताळणी करीत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले आहे.
या चारही प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात कंत्राटदार अतुल जगताप यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व राज्य शासनाच्या उत्तरावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी याचिकाकर्त्याला दोन आठवड्यांचा वेळ दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी बाजू मांडली.

Web Title: FIR lodged in Jigaon irrigation project scam in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.