अखेर  चिमुकल्याला मिळाला उपचार : पेडियाट्रिक आर्थाेपेडिक सर्जन आले धावून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 08:06 PM2018-02-12T20:06:37+5:302018-02-12T20:10:17+5:30

अपघातात हात फ्रॅक्चर झालेल्या गरीब चिमुकल्याची अगतिकता आणि मेडिकलने केलेल्या उपेक्षेने अवघे समाजमन गहिवरले. त्याच्या उपचारासाठी शहरातील प्रसिद्ध पेडियाट्रीक आर्थाेपेडिक सर्जन व ग्राहक कल्याण समितीने मदतीचे हात पुढे केले.

Finally, minor trated : The pediatric orthopedic surgeon came to help | अखेर  चिमुकल्याला मिळाला उपचार : पेडियाट्रिक आर्थाेपेडिक सर्जन आले धावून 

अखेर  चिमुकल्याला मिळाला उपचार : पेडियाट्रिक आर्थाेपेडिक सर्जन आले धावून 

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहक कल्याण समितीने घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर  : अपघातात हात फ्रॅक्चर झालेल्या गरीब चिमुकल्याची अगतिकता आणि मेडिकलने केलेल्या उपेक्षेने अवघे समाजमन गहिवरले. तो चिमुकला व त्याचे कुटुंबीय सोसत असलेली वेदना समाजाला हादरवून गेली. त्या चिमुकल्याच्या उपचारासाठी शहरातील प्रसिद्ध पेडियाट्रीक आर्थाेपेडिक सर्जन व ग्राहक कल्याण समितीने मदतीचे हात पुढे केले. समाजाच्या या उदारतेचे दर्शन घडण्यासाठी निमित्त ठरले ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेले सोमवारचे वृत्त.
अमरावती मार्गावरील कोंढाळी गावातील रहिवासी दहा वर्षीय अयाम सलाम शेख शाळेतून घरी येत असताना त्याचा अपघात झाला. डावा हात गंभीर जखमी झाला. चुकीच्या सल्ल्यामुळे त्याच्या वडिलांनी गावातीलच हाडवैद्याकडून उपचार घेतला. परंतु पाच दिवस होऊनही हात ढोपरातून वाकत नव्हता. दुखणेही वाढले होते. मजुरीचे काम करणाऱ्या वडिलांनी उसनवारी पैसे घेऊन नागपूरचे मेडिकल गाठले. १ जानेवारीला अयानला वॉर्ड क्र. १७ मध्ये भरती केले. डॉक्टरांनी तपासून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु पैसे नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज केला. परंतु त्यातही घोळ झाला. दहा दिवस होऊन व विनंती करूनही उपचार झाला नाही. पोराचे दुखणे वाढत होते. खिशात पाच हजार रुपये होते. या पैशात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होतील म्हणून शनिवारी मेडिकलमधून सुटी घेतली. अयामला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखविले. तेथील डॉक्टरांनी ५० हजाराच्यावर शस्त्रक्रियेचा खर्च सांगितला. एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होता. पोरावर विना उपचार गावाला जावे लागणार या भीतीने हे कुटुंब रस्त्यावर बसून होते. ‘लोकमत’ने ‘दहा दिवसानंतरही चिमुकल्याची उपचाराची प्रतीक्षा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताला घेऊन शहरातील लहान मुलांचे प्रसिद्ध आर्थाेपेडीक सर्जन धावून आले. अयामचा ‘एक्स-रे’ व इतरही तपासण्या केल्या. अयामच्या हाताचे हाड चुकीच्या पद्धतीने जुळल्याचे लक्षात आले. परंतु त्यावर शस्त्रक्रिया केल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून अयामला फिजीओथेरपी करण्याचा सल्ला दिला. तसेच दर महिन्याला तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. तर ग्राहक कल्याण समिती, महाराष्ट्र यांनीही त्या चिमुकल्यावर शस्त्रक्रिया झाल्यास त्याचा खर्चाचा भार उचलण्याची तयारी दर्शवली. या संस्थेचे अध्यक्ष आशिष अटलोए यांनी त्याच्यासाठी वेगळा निधीही काढून ठेवला होता. समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेल्या या मदतीच्या ओघाने शेख कुटुंबाने सर्वांचे आभार मानले.

Web Title: Finally, minor trated : The pediatric orthopedic surgeon came to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.