अखेर नागपुरातील चिमुकलीचा अपहरणकर्ता जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:08 AM2018-03-20T01:08:19+5:302018-03-20T01:09:37+5:30

चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवणे (रा. लाकडीपूल, हत्तीनाला) नामक चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर सहाव्या दिवशी लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.

Finally, the kidnapper of the minor girl of Nagpur arrested | अखेर नागपुरातील चिमुकलीचा अपहरणकर्ता जेरबंद

अखेर नागपुरातील चिमुकलीचा अपहरणकर्ता जेरबंद

Next
ठळक मुद्देपोलिसांनी खरबीत बांधल्या मुसक्या : आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवणे (रा. लाकडीपूल, हत्तीनाला) नामक चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर सहाव्या दिवशी लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. खामदेव श्रीधर मेंडूलकर (वय ३७) असे आरोपीचे नाव असून, तो नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगर, खरबी परिसरात राहतो.
मनपाच्या महाल झोन कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या अरुण सारवणे यांच्या श्रद्धा नामक चिमुकलीचे बुधवारी १४ मार्चला दुपारी ४.३० च्या सुमारास अपहरण झाले होते. ती तिचा चुलतभाऊ यशसोबत खेळत असताना लुनावर आलेल्या आरोपीने कबुतर दाखविण्याच्या बहाण्याने श्रद्धाला दुचाकीवर बसवले आणि पळून गेला. यशने घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या आईला ही घटना सांगितली. त्यानंतर सारवणे दाम्पत्याने लकडगंज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. लकडगंज तसेच गुन्हे शाखेची पथके चिमुकलीला शोधत असताना ती मेडिकलमधील वॉर्ड क्र. ३४ मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुखरूप असलेल्या श्रद्धाला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र तिचे अपहरण करणारा आरोपी मोकाट होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी जागोजागचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत असला तरी तो रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याने त्याची ओळख पटविणे कठीण झाले होते. पोलिसांनी अपहरणकर्त्याचा फोटो लकडगंजच्या लाकडीपुलापासून तो मेडिकलपर्यंतच्या मार्गावर अनेकांना दाखवला, मात्र त्याची ओळख कुणीही पटवली नाही. परिणामी पोलिसांनी त्याला हुडकून काढण्यासाठी लाकडीपूल ते मेडिकल आणि नंतर आरोपी ज्या मार्गाने निघून गेला त्या मार्गावरचे सीसीटीव्ही तपासले. त्यात तो हसनबागकडे जात असल्याचे आढळले. या भागात विचारणा केली असता, सर्वाधिक लुना खरबी परिसरात असल्याचेही पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांनी आरोपीसोबत लुनाचीही माहिती विचारणे सुरू केले.
आरोपीचा धूर्तपणा
आरोपी खामदेव मेंडूलकर विवाहित आहे. त्याला एक १० वर्षांचा मुलगा आहे. तो सलूनच्या दुकानात काम करतो. धूर्त असलेल्या आरोपीने अपहरणाचे वृत्त वाचतानाच आरोपी लुनावर आला होता, असेही वृत्तपत्रात वाचले. त्यामुळे त्याने दुसऱ्या  दिवशीपासून लुना वापरणेच बंद केले. तो पायीच घरी जाणे-येणे करू लागला. मात्र, लकडगंज पोलिसांना त्याचे छायाचित्र मिळाले होते. त्यामुळे हसनबागजवळच्या खरबी चौकात पोलिसांनी जाळे पसरवले होते. सोमवारी रात्री ७ च्या सुमारास आरोपी खामदेव मेंडूलकर पायी जाताना पोलिसांना दिसला. सीसीटीव्हीतील छायाचित्राशी त्याचा चेहरा पुरता जुळत असल्याने पोलिसांनी त्याला जेरबंद करून लकडगंज ठाण्यात नेले. तेथे त्याला बोलते केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत आपण चिमुकल्या श्रद्धाचे अपहरण केले, असे तो सांगतो. त्याने कोणत्या उद्देशाने अपहरण केले, त्याची कबुली देण्यास टाळाटाळ चालवली आहे. रात्री उशिरापर्यंत ठाणेदार संतोष खांडेकर आणि त्यांचे सहकारी आरोपीची चौकशी करीत होते.

Web Title: Finally, the kidnapper of the minor girl of Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.