अखेर रातुम नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 09:49 AM2018-02-27T09:49:52+5:302018-02-27T09:50:09+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनावर एकेकाळी वर्चस्व असलेल्या डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यावर सोमवारी नामुष्कीची वेळ आली. वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात त्यांची गांधी विचारधारेची स्नातकोत्तर पदविका रद्द करण्यात आली.

Finally, Dr. Ved Prakash Mishra's Diploma is Cancelled | अखेर रातुम नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द

अखेर रातुम नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द

Next
ठळक मुद्दे२७ वर्षांनी रामभाऊ तुपकरी खरे ठरलेविद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनावर एकेकाळी वर्चस्व असलेल्या डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यावर सोमवारी नामुष्कीची वेळ आली. वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात त्यांची गांधी विचारधारेची स्नातकोत्तर पदविका रद्द करण्यात आली. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या शिफारशींवर तब्बल २७ वर्षांनी अंमलबजावणी झाली. परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणारी कुठलीही व्यक्ती आढळली तरी कारवाई करू व कुणाचीही गय करण्यात येणार नाही, असा इशारा कुलगुरूंनी दिला आहे. डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यासाठी ही कारवाई म्हणजे मोठा धक्का मानण्यात येत आहे.
गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली होती. तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी यासंदर्भात विद्यापीठाकडे तक्रार केली होती.
डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती हे सांगणाऱ्या न्या.रत्नपारखी यांच्या चौकशी अहवालाला १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने मान्यदेखील केले. हे प्रकरण परत एकदा समोर आल्यानंतर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे डॉ.मिश्रा यांनी दिवाणी न्यायालयात जुनी याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला. मागच्या आठवड्यात त्यांनी स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले होते. परंतु त्यांना तसा अधिकारच नसल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ.मिश्रा यांची स्पष्टीकरण देण्यासंदर्भातील मुदत सोमवारपर्यंत वाढविण्यात आली होती तसेच परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांना स्वत: उपस्थित राहायचे होते. परंतु डॉ.मिश्रा यांनी स्पष्टीकरणदेखील सादर केले नाही व ते उपस्थितदेखील झाले नाही. अखेर सोमवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत डॉ.मिश्रा यांची पदव्युत्तर पदविका काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कुलगुरू डॉ.काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली.

मिश्रा कार्यरत असलेल्या संस्थांना कळविणार
न्या.रत्नपारखी समितीने १९९२ साली सादर केलेल्या अहवालातील शिफारशींमध्ये डॉ.मिश्रा यांनी केलेला गैरप्रकार ते कार्यरत असलेल्या आस्थापना व संस्थांना कळविण्यात यावा, असे नमूद होते. त्यानुसार डॉ.मिश्रा कार्यरत असलेल्या आस्थापना व ते ज्या ज्या ठिकाणी प्राधिकरण किंवा समितीवर आहेत, त्या ठिकाणी वाङ्मय चौर्यप्रकरणात त्यांची पदविका परत घेण्यात आली असल्याचे कळविण्यात येईल, असे डॉ.काणे यांनी स्पष्ट केले. शिवाय डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांचे पुरस्कारदेखील वापस घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ हे करणार

  • पदविका रद्द केल्याचा निर्णय डॉ.मिश्रा यांना कळविणार
  • डॉ. मिश्रा कार्यरत असलेल्या आस्थापना व संस्थांना माहिती देणार
  • डॉ. मिश्रा यांना विद्यापीठाने दिलेले पुरस्कार परत घेणार
  • तत्कालीन परीक्षक डॉ.के.एस.भारथी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविणार


डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी विद्यार्थी म्हणून वाङ्मय चौर्यकर्म केले होते. त्यांनी त्यानंतर अनेक मोठमोठी पदे भूषविली. मात्र विद्यापीठाने त्यांच्यावर एक विद्यार्थी म्हणूनच कारवाई केली आहे. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी जर चूक केली असेल तर नियमानुसारच कारवाई होईल. कुणाचीही गय करण्यात येणार नाही. या प्रकरणात चौकशी समितीने फौजदारी कारवाईसंदर्भात कुठलीही शिफारस केली नव्हती.
- डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू

Web Title: Finally, Dr. Ved Prakash Mishra's Diploma is Cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.