नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापूस घरातच साठवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:43 AM2018-01-30T10:43:26+5:302018-01-30T10:44:52+5:30

भिवापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या तावडीतून वाचलेला कापूस घरी आणला. मात्र, कापसाचे बाजारभाव वाढत नसल्याने तसेच मिळणाऱ्या भावात उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील हजारो क्विंटल कापूस घरीच साठवून ठेवला आहे.

The farmers of Nagpur district stored thousands of quintals of cotton in the house | नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापूस घरातच साठवला

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापूस घरातच साठवला

googlenewsNext
ठळक मुद्देदरवाढीची प्रतीक्षाउत्पादन खर्च भरून निघण्याची शक्यता मावळली

राम वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भिवापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या तावडीतून वाचलेला कापूस घरी आणला. मात्र, कापसाचे बाजारभाव वाढत नसल्याने तसेच मिळणाऱ्या भावात उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील हजारो क्विंटल कापूस घरीच साठवून ठेवला आहे. विशेष म्हणजे, भिवापूर व उमरेड तालुक्यात खासगी जिनिंग व प्रेसिंग नसून, शासकीय खरेदी केंद्रदेखील नाही.
यावर्षी कापसाची खरेदी प्रति क्विंटल ४,५०० रुपयांपासून सुरू झाली होती. मध्यंतरी हा दर प्रति क्विंटल ५,५०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मात्र भावात घसरण झाली. सध्या उमरेड आणि हिंगणघाट (जिल्हा वर्धा) बाजारपेठेत ५,००० रुपये ते ५,१०० रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी सुरू आहे. हा दर परवडण्याजोगा नसल्याने त्यातून कापसाचा उत्पादन खर्च भरून निघणे शक्य नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

उत्पादन खर्चात वाढ
कपाशीचे पीक सहा ते आठ महिने शेतात राहात असल्याने त्या शेतात कपाशीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पीक घेता येत नाही. या हंगामात सुरुवातीला कपाशीचे पीक जोमदार होते. शेतकऱ्यांनी कापसाचा पहिला वेचा घेतल्यानंतर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. या बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या नानाविध कीटकनाशकांची फवारणी केली. परंतु, फारसा उपयोग झाला नाही. शिवाय, यावर्षी कापूस वेचणीची मजुरी प्रति किलो १० रुपये होती. मागील वर्षी शेतकऱ्यांनी सात ते साडेसात रुपये प्रति किलो कापसाची वेचणी केली होती. महागडे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके तसेच शेत तयार करण्यापासून तर कापूस वेचणीपर्यंतचा संपूर्ण खर्च विचारात घेता यावर्षी कापसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत कापसाला मिळाणारा बाजारभाव हा कमी आहे.

शासकीय खरेदी नाही
राज्यात शासनाच्यावतीने सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) आणि कापूस एकाधिकार योजनेंतर्गत कापूस खरेदी केली जाते. त्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले जाते. मात्र, उमरेड व भिवापूर तालुक्यात केंद्र शासनाच्या सीसीआय आणि राज्य शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेंतर्गत कधीच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव उमरेड किंवा हिंगणघाट बाजारपेठेत कापूस न्यावा लागतो.

बाजारपेठेची वानवा
उमरेड व भिवापूर तालुक्यात कपाशीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत असले तरी या भागात कापसाची हक्काची बाजारपेठ नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना उमरेड किंवा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजारपेठेत कापूस विकायला न्यावा लागतो. नांद परिसरातून हिंगणघाट हे ६५ कि.मी आणि उमरेड हे २५ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही सोसावा लागतो. शिवाय, या दोन्ही तालुक्यांमध्ये खासगी जिनिंग व पे्रसिंग नाहीत.

अपुऱ्या जागेमुळे शेतकरी अडचणीत
नांद व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत त्यांच्याकडील कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कापसामुळे या शेतकऱ्यांच्या घरी साधे निवांत बसण्यासाठीही पुरेसी जागा शिल्लक राहिली नाही. काहींना तर कापसाच्या ढिगावर झोपावे लागते तर काहींना घराच्या बाहेर कडाक्याच्या थंडीत रात्र काढावी लागते. दुसरीकडे या कापसाची प्रत खालावण्याची शक्यता बळावली आहे.

फडतर कापसाचा भाव
यावर्षी कपाशीच्या बीटी वाणावर मोठ्या प्रमाणात गुलाबी व पांढऱ्या बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. वास्तवात या कापसाचा दर्जा चांगला आहे. शेतकरी हाच कापूस बाजारात विक्रीला नेतो, तेव्हा व्यापारी त्यांच्या चांगल्या कापसाला फडतर कापसाचा भाव देतात. एकदा कापूस बाजारपेठेत नेल्यानंतर भाव न परवडल्यास तो बाजारातून घरी परत आणणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. या प्रकारात होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट बघणे लोकप्रतिनिधी पसंत करीत आहेत.

Web Title: The farmers of Nagpur district stored thousands of quintals of cotton in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.