सोशल मिडीयावर जमतोय कौटुंबिक गोतावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 08:39 PM2018-05-14T20:39:27+5:302018-05-14T20:39:49+5:30

मोबाईलच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला की काय, अशी भीती जाणवू लागली आहे. ही भीती काही प्रमाणात खरी असली तरी तंत्रज्ञानाचे फायदेही असतातच. आधुनिक पिढीने याच तंत्रज्ञानाचा लाभ घेत दुरावलेल्या नातेवाईकांना सोशल मिडीयावरील ग्रुपच्या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट फोन बाळगणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा एखादा तरी कौटुंबिक ग्रुप आहेतच. यात एकाच शहरात असलेले किंवा वेगवेगळ्या शहरात, इतकेच नव्हे तर देशाबाहेर असणारे नातेवाईक एकमेकांशी संवाद साधू लागले आहेत. या माध्यमातून हा कौटुंबिक गोतावळा जमू लागला आहे.

Family giant gathering on social media | सोशल मिडीयावर जमतोय कौटुंबिक गोतावळा

सोशल मिडीयावर जमतोय कौटुंबिक गोतावळा

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक कुटुंब दिन विशेषकुटुंबाला संयुक्त ठेवण्याचा आधुनिक प्रयत्नदूरवर असलेल्या नातलगांचा कौटुंबिक संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला की काय, अशी भीती जाणवू लागली आहे. ही भीती काही प्रमाणात खरी असली तरी तंत्रज्ञानाचे फायदेही असतातच. आधुनिक पिढीने याच तंत्रज्ञानाचा लाभ घेत दुरावलेल्या नातेवाईकांना सोशल मिडीयावरील ग्रुपच्या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्ट फोन बाळगणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीचा एखादा तरी कौटुंबिक ग्रुप आहेतच. यात एकाच शहरात असलेले किंवा वेगवेगळ्या शहरात, इतकेच नव्हे तर देशाबाहेर असणारे नातेवाईक एकमेकांशी संवाद साधू लागले आहेत. या माध्यमातून हा कौटुंबिक गोतावळा जमू लागला आहे.
पूर्वी कौटुंबिक संवाद समोरासमोर होत होता. परगावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी खास वेळ काढला जायचा. अगदी दूरच्या नातेवाईकांसाठी टपाल, दूरध्वनी अशी साधने उपलब्ध होती. त्यानंतर संवादाचे स्वरूप बदलून गेले. कामाच्या गडबडीत आवर्जून एखाद्याला फोन करायचे दिवस आता राहिले नाहीत. नोकरी-व्यवसायामुळे कुटुंबातील वातावरण विसंवादी बनू लागले आहे. मात्र सोशल मिडियामुळे जगातील कानाकोपऱ्यात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना गप्पाटप्पा मारण्यासाठी हा ई-कट्टा मिळाला आहे. कुटुंबातील बहुतेक प्रत्येक सदस्याच्या स्मार्ट फोनमध्ये या ग्रुपने जागा घेतली असून, कौटुंबिक ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपमध्ये २०० हून अधिक सदस्य सामावून घेण्याची क्षमता असल्याने मोठा ई-गोतावळा तयार झाला आहे. कुटुंबातील तरुण सदस्य त्यासाठी पुढाकार घेत आहेत, हे विशेष.
कुटुंब-नातेवाईकांमधील प्रत्येकाच्या वेळा सांभाळून एखाद्या कार्याचे नियोजन करणे अनेकदा शक्य होत नाही. पण गु्रपमुळे याबाबतच चर्चा मोकळेपणाने होतात. या चर्चेत सर्वच सदस्यांना सहजपणे सहभागी होता येत असल्याने प्रत्येकाला त्याचा आनंद मिळतो. वाढदिवस, लग्न किंवा कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ ग्रुपवर अपलोड केले जातात. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न झालेल्यांनाही त्याचा आनंद घेता येत आहे. कुटुंबातील अनेक सदस्य परगावी किंवा परदेशात असतात. त्यांनाही या ग्रुपमुळे कुटुंबात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये सहभागी होता येते. त्यामुळे दुरावलेली कुटुंबे एकत्र येऊ लागली आहेत. अनेकांना आपल्या कुटुंबातील नातेवाईक गवसले आहेत. शिवाय व्हिडीओ कॉलिंगनेही संवादाचे अंतर जवळ केले आहे.
या ग्रुपमध्येही आई-वडील, बहीण-भावांचा स्वतंत्र गु्रप, त्यानंतर इतर नातेवाईकांचा वेगळा ग्रुप, कुटुंबातील महिला, पुरुष सदस्य, मुला-मुलींचाही वेगळा ग्रुप असतो. प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्या वयानुसार चर्चा होत असतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील सदस्यांना स्वातंत्र्य मिळते. या ग्रुपलाही मजेशीर नावे दिली जातात. अनेक ग्रुपची नावे आडनावाने सुरू होतात. स्वीट फॅमिली, ग्रेट फॅमिली, फॅमिलीज, फॅमिली रॉक्स, पारिवारिक विचार मंडळ, अशी आगळीवेगळी नावेही दिली जातात.
गाव झाले कुटुंब
नोकरी व कामानिमित्त आपापल्या गावातून निघून अनेक जण शहरात आले आणि येथेच स्थायिक झाले. परंतु गावाला मात्र विसरले नाहीत. अशा लोकांनी आपापल्या गावाच्या नावांनीही ग्रुप तयार केले आहेत. नागपूर शहरात ग्रामीण भागातून व विदर्भातील इतरही तालुक्यांमधून आलेल्या मंडळींनी आपापल्या गावांच्या नावांनीही ग्रुप तयार केले आहे. या माध्यमातून ते आपापल्या गावातील मित्र-मंडळींशी संवाद साधतात. गाव हे त्यांच्यासाठी कुटुंब बनले आहे. बहुतेक ग्रुपची नावे ही त्या-त्या गावाच्या नावावरच ठेवण्यात आलेली आहेत.
प्रत्येक सण-उत्सव साजरा होतो
अनेकांप्रमाणे रामकृष्णनगरातील रूपाली धवस यांनीही आपला परिवार नावाने एक ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप तयार झाल्यापासून त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले आहे. प्रत्येक सण आणि उत्सव ते मिळून साजरा करतात. कुठे जायचे, कुणाकडे भेटायचे याची सर्व चर्चा ग्रुपवर होत असते. एकमेकांच्या सुख-दु:खाची जाणीवही होत असते.
संवाद वाढला
सोशल मिडियामुळे परिवारातील संवाद वाढला आहे. ग्रुपमुळे अनेक चर्चा होतात. शिवाय रोज एकमेकांची आठवणही होते. आमचा परिवार मोठा असल्यामुळे पारिवारिक ग्रुपने आम्हाला जवळ आणले आहे, अशी प्रतिक्रिया प्रतापनगरातील कल्याणी लामधरे यांनी व्यक्त केली.

Web Title: Family giant gathering on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.