EVM Safe, Ramtek Lok Sabha constituency has no impact on the counting of votes | ईव्हीएम सुरक्षितच, रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीवर परिणाम नाही
ईव्हीएम सुरक्षितच, रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीवर परिणाम नाही

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड येथील विधानसभा मतदार संघासाठी तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेले स्ट्राँग रुम पोलिसांच्या सुरक्षिततेत होते. केवळ स्ट्राँग रुमच्या बाहेर पोलीस सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या गार्ड रुममधील दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर गहाळ झाले आहे. परंतु स्ट्राँग रुममधील व्हीडिओ चित्रीकरणाचे कव्हरेज सहायक निवडणूक अधिकारी यांच्या सेफ कस्टडीमध्ये असून या प्रकरणाची ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहे. ही घटना ईव्हीएम मशीन कळमन्यात पोहोचल्यानंतर झाली आहे. सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित आहेत. त्यामुळे या घटनेमुळे रामटेक लोकसभा मतदार संघातील मतमोजणीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले.
उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणाच्या घटनेबाबत पत्रकारांनी फडके यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. फडके यांनी सांगितले की, रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघाकरिता शासकीय तंत्र माध्यमिक शाळाद्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेव रोड, गोटेखणी उमरेड येथे मतदानासाठी प्रत्येक केंद्रांवर ईव्हीएम पोहोचवण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरुपात स्ट्राँग रुम तयार करण्यात आली होती. ती पोलीस नियंत्रणाखाली होती. रामटेक लोकसभेसाठी मिळालेल्या ईव्हीएम मशीन या स्ट्राँग रुममध्ये २६ मार्च २०१९ पासून ठेवणयात आल्या होत्या. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा व पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. १२ एप्रिल रोजी पोलेड ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटसह संविधानिक लिफाफे असलेल्या ट्रंक्स कळमना मार्केट येथील स्ट्राँग रुममध्ये दुपारी जमा करण्यात आल्या. त्याचवेळी रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट कळमन्यातील स्ट्राँग रुममध्ये त्याच दिवशी (१२ एप्रिल रोजी )जमा करण्यात आल्या. स्ट्राँग रुम सील करतांना सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य पोलीस दल व स्थानिक पोलीस अशा त्रिस्तरीय निगराणीमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या. त्यामुळे उमरेड येथील स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम अथवा व्हीव्हीपॅट मशीन नव्हते.
दरम्यान उमरेड येथील तात्पुरते तयार करण्यात आलेले स्ट्राँग रुम पोलिसांच्या सुरक्षिततेत होते. स्ट्राँग रूमबाहेर पोलीस सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या गार्ड रुममधील दोन एलसीडी टीव्ही व डीव्हीआर गहाळ झाल्याची बाब १५ एप्रिल २०१९ रोजी उमरेडच्या सहायक निवडणूक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आली असता तात्काळ संबंधित स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला कळविण्यात आले. तथापी स्ट्राँग रुममधील व्हिडिओ चित्रीकरणाचे कवरेज सहायक निवडणूक अधिकारी यांच्या सेफ कस्टडीमध्ये असल्याचे फडके यांनी स्पष्ट केले.
चौकशी सुरू,कारवाई होईल
दरम्यान या प्रकरणाची चौकशी ग्रामीण पोलीस करीत आहे. सखोल चौकशी झाल्यावर जो कुणी दोषी आढळून येईल, त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असेही अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्पष्ट केले.

 


Web Title: EVM Safe, Ramtek Lok Sabha constituency has no impact on the counting of votes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.