रामटेक गडमंदिरात अतिक्रमण, अवैध बांधकाम : हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:02 AM2019-06-22T00:02:00+5:302019-06-22T00:05:02+5:30

रामटेक येथील गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच, मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून आवश्यक आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Encroachment in Ramtek Gadmandir , illegal construction: Application in the High Court | रामटेक गडमंदिरात अतिक्रमण, अवैध बांधकाम : हायकोर्टात अर्ज

रामटेक गडमंदिरात अतिक्रमण, अवैध बांधकाम : हायकोर्टात अर्ज

Next
ठळक मुद्देनरसिम्हा मंदिरे, प्रवेशद्वारांची देखभाल नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक येथील गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच, मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून आवश्यक आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याविषयी न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २०१० मध्ये गडमंदिराच्या दुरवस्थेवर वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल केली. याप्रकरणात वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल न्यायालय मित्र म्हणून काम पाहतात. त्यांनी सदरहू अर्ज दाखल करून मंदिराशी संबंधित विविध समस्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. मंदिर परिसरात विविध प्रकारची अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मंदिराचा काही भाग अगस्त मुनी आश्रमच्या ताब्यात आहे. त्याची वैधता तपासणे आवश्यक आहे. तसेच, मंदिर परिसरात दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्याकडून मंदिराला काहीच आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांना अटी व नियमांसह नियमित करणे गरजेचे आहे. धक्कादायक म्हणजे, सीतामाता रसोई घरातही अतिक्रमण करण्यात आले आहे.
मंदिरापर्यंत जाण्यासाठी वराह, शिरपूर, भैरव व गोकुल ही चार प्रवेशद्वारे ओलांडावी लागतात. या प्रवेशद्वारांची अवस्था चांगली नाही. प्रवेशद्वारांना जागोजागी भेगा गेल्या आहेत. गडाच्या पायथ्याशी रुद्र नरसिम्हा व केवल नरसिम्हा यांची १५०० वर्षे जुनी मंदिरे आहेत. त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. परंतु, दोन्ही मंदिराच्या देखभालीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मंदिरे खराब होत आहेत. मंदिरातील देणगीचा वाद अद्याप निकाली निघालेला नाही भाविकांच्या सुविधेकरिता मंदिराजवळ स्वच्छतागृह बांधणे गरजेचे आहे. नगर परिषदेद्वारे मंदिराला पुरेसे पाणी पुरविले जात नाही. तसेच, मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे अशी माहिती अर्जाद्वारे न्यायालयाला देण्यात आली आहे. न्यायालयाने अर्ज रेकॉर्डवर घेऊन त्यावर ३ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. रामटेक नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.
गड बळकटीकरण पूर्ण नाही
गडमंदिराचा गड ढासळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे गडाला बळकटी देण्याचे काम हातात घेण्यात आले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण झाल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर अ‍ॅड. जयस्वाल यांनी आक्षेप घेतला आहे. गड बळकटीकरणचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. काही भागाचे काम अद्याप झालेले नाही असे त्यांनी अर्जात नमूद करून यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

Web Title: Encroachment in Ramtek Gadmandir , illegal construction: Application in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.