Electrification of remaining 111 villages in progress; Energy Minister Chandrashekhar Bawankulay | वीज न पोहोचलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर; ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ट्रान्सफॉर्मर

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ९५९ गावांचे विद्युतीकरण झाले असून पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
आमदार शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, मनोहर भोईर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील ६६ तर नंदुरबार जिल्ह्यातील ३४ गावांचे विद्युतीकरण बाकी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ३४ पैकी ३३ गावे ही सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेली आहेत. तसेच अतिदुर्गम, डोंगराळ भागातील ७ तर पालघर, यवतमाळ, पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा १११ गावांचे विद्युतीकरण होणे बाकी आहे. यापैकी ५४ गावांचे विद्युतीकरण हे महावितरण कंपनीमार्फत तर ५७ गावांचे विद्युतीकरण हे महाऊर्जाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. आॅक्टोबर २०१७ अखेर महावितरण कंपनीमार्फत ५४ पैकी १४ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले असून महाऊर्जाद्वारे ५७ पैकी २८ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गावांच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ट्रान्सफॉर्मर
सदस्य सुनील केदार यांनी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोरच ट्रान्सफॉर्मर असून त्यांच्या घराला तेथून वीज मिळत असल्याचा आरोप केला. दरम्यान ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आपल्या घरासमोर कुठलेही ट्रान्सफॉर्मर नसल्याचे स्पष्ट करीत हा आरोप खोडून काढला.

 

 


Web Title: Electrification of remaining 111 villages in progress; Energy Minister Chandrashekhar Bawankulay
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.