नागपुरात मोतीबिंदूमुक्त मोहिमेला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:21 AM2018-10-20T10:21:39+5:302018-10-20T10:22:01+5:30

महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे. परंतु या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ‘लेन्स’ व इतर साहित्याचा पुरवठा आरोग्य विभागाकडूनच गेल्या सहा महिन्यांपासून देणे बंद झाल्याने या मोहिमेला ग्रहण लागले आहे.

Eclipse in the cataract-free campaign in Nagpur | नागपुरात मोतीबिंदूमुक्त मोहिमेला ग्रहण

नागपुरात मोतीबिंदूमुक्त मोहिमेला ग्रहण

Next
ठळक मुद्देशासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया अडचणीत

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे. परंतु या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ‘लेन्स’ व इतर साहित्याचा पुरवठा आरोग्य विभागाकडूनच गेल्या सहा महिन्यांपासून देणे बंद झाल्याने या मोहिमेला ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे, यासाठी जबाबदार असलेल्या ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’ला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्याची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी साधारण ७२ टक्के आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला घेऊन ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ‘रिजीड लेन्स’सोबतच ‘व्हीस्कोमॅट’ व ‘डिस्पोजेबल सर्जिकल ब्लेड’ मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जाते. परंतु एप्रिल २०१८ पासून साहित्याचा पुरवठाच झाला नाही.

लक्ष्य दिले, परंतु साहित्यच नाही
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मिळून महिन्याकाठी साधारण हजारावर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात. या दोन्ही रुग्णालयाला ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’कडून दरवर्षी या शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले जाते. या वर्षी मेयोला २०००, मेडिकलला २५००, उपजिल्हा रुग्णालय कामठी, उपजिल्हा रुग्णालय रामटेक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे डागा हॉस्पिटल (ओटी) व शासकीय आयुर्वेदीक कॉलेज व रुग्णालय मिळून ३८२५ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात आले आहे. परंतु साहित्यच नसल्याने हे लक्ष्य पूर्ण होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

उसनवारीवर कारभार
इतर रुग्णालयांच्या तुलनेत नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये सर्वाधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात. सूत्रानुसार, या रुग्णालयाने या वर्षी एक हजार लेन्सची मागणी केली होती. ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्हा नेत्रशल्यचिकित्सकांनी आजू-बाजूच्या जिल्हांकडून उसनवारीने लेन्स घेऊन या रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या. मेडिकलला नुकतेच गडचिरोली जिल्ह्याकडून १५० लेन्स उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.


एप्रिल महिन्यापासून पुरवठा नाही
आरोग्य विभागाकडून या वर्षात म्हणजे एप्रिल महिन्यापासून मोतीबिंदूसाठी लागणारे लेन्स व इतर साहित्य उपलब्ध झाले नाही.
-डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर

हाफकिनकडूनच खरेदी नाही
सर्व शासकीय रुग्णालयांना लागणारी औषधे खरेदी व वितरणाची जबाबदारी हाफकिन कंपनीला देण्यात आली आहे. या कंपनीकडून अद्यापही ‘लेन्स’ व इतर साहित्याची खरेदी झाली नाही. यामुळे नुकतेच स्थानिक पातळीवर ‘लेन्स’ खरेदीच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत, तसा निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
-डॉ. साधना तायडे, सहायक संचालक (राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम)

 

Web Title: Eclipse in the cataract-free campaign in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य